Tuesday, February 8, 2011

कलिंगड लागवड कधी करावी? योग्य जाती कोणत्या? कीड-रोग व काढणीविषयी मार्गदर्शन करावे.

बी. जी. इनामदार, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर
क लिंगडाची लागवड 17 अंश ते 18 अंश से. तापमानात थंडी कमी झाल्यावर करावी. फळ लागल्यापासून ते फळ विक्रीसाठी तोडेपर्यंत किमान 40 ते 45 दिवस तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे आवश्‍यक आहे. पिकाचा कालावधी जातीपरत्वे 90 ते 110 दिवसांचा असतो.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर व स्फुरद जिवाणू खताची 250 ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. लागवडीसाठी चार मीटर अंतरावर रुंद सऱ्या कराव्यात. सरीच्या दोन्ही बाजूंस 90 सें.मी. अंतरावर खड्डे करून त्यात दोन किलो चांगले कुजलेले शेणखत आणि दहा ग्रॅम कार्बारिल पावडर टाकून खड्डे भरून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात दोन ते तीन बिया एकमेकांपासून तीन ते चार सें.मी. अंतरावर दोन ते अडीच सें.मी. खोलीवर पेराव्यात. एक हेक्‍टर लागवडीसाठी साधारण अडीच किलो बियाणे लागते. माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 15 ते 20 टन शेणखत, 15 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. खते देताना संपूर्ण शेणखत, स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा व नत्राची 1/3 मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. उरलेले नत्र दोन समान हप्त्यांत लागवडीनंतर एक आणि दोन महिन्यांनी द्यावे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे फळे तडकतात. तेव्हा पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे. फळे काढणीस तयार झाली किंवा नाही हे ओळखण्यासाठी फळावर टिचकी मारल्यास तयार झालेल्या फळाचा बदबद असा आवाज येतो व अपक्व फळांचा टणटण असा आवाज येतो. तयार फळांचा जमिनीलगतचा रंग किंचित पिवळसर होतो. फळाच्या देठाजवळील लतातंतू सुकलेले असतात. काढणी सकाळी करावी. त्यामुळे फळांचा ताजेपणा व आकर्षकता टिकून राहते व ती चवीला चांगली रुचकर लागतात.
कलिंगड पिकावर भुरी, करपा व मर रोगांचा आणि तांबडे व काळे भुंगेरे, फळमाशी, मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची अथवा ट्रायकोडर्मा जैविक रोगनियंत्रकाची पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. किडींच्या नियंत्रणासाठी बिगर हंगामात शेतीची चांगली नांगरट व कुळवणी करावी. म्हणजे तांबडे भुंगेरे, फळमाशी इ. किडींच्या सुप्त अवस्था नष्ट होऊन त्याच्या बंदोबस्तासाठी मदत होईल.
ः प्रा. प्रभाकर रसाळ, 9766042997
विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे

शेतात फणसाची जुनी झाडे आहेत, त्यांचे व्यवस्थापन कसे करावे?

अमोल गणेश राऊत, मु.पो. ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद
जुन्या फणसाच्या झाडांची काळजी
घेण्याबाबत उद्यानविद्या विभाग, कृषी
महाविद्यालय, दापोली येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती ः फणसाचे मुख्य खोड व फांद्या सशक्त करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे. फणसाच्या फांद्या जाड करण्यासाठी संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा महत्त्वाचा आहे. एका पूर्ण वाढलेल्या फणसाच्या झाडाला सुमारे 20 ते 30 किलो शेणखत किंवा कंपोस्ट द्यावे. तसेच 500 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद व 250 ग्रॅम पालाश प्रति झाडाला द्यावे. फणसाच्या झाडाला खोडावर फुले व फळे लागतात, म्हणजेच झाडाच्या स्वतःच्या सावलीत लागतात. बऱ्याचदा असे आढळून येते, की फुले आल्यानंतर नर फुले काळी पडून गळून पडतात. नर फुलांच्या लगत असलेली किंवा नर फुलाला चिकटून असलेली मादी फुलेदेखील काळी पडतात. जर फणसाच्या खोडावर सावलीचे प्रमाण जास्त असेल, तर अशा ठिकाणी फळे काळी पडण्याचे प्रमाण वाढते. म्हणूनच फणसाच्या मधल्या खोडावर पडणाऱ्या सावलीचे नियोजन करावे. झाडाची सरसकट छाटणी न करता तुरळक प्रमाणात फांद्यांची विरळणी केली, तर झाडाच्या आत पडणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण वाढेल. ही विरळणी करताना कमकुवत फांद्यांची करावी. फणसाला साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांत फुले लागतात. फळधारणेनंतर फळ तयार होण्यासाठी सुमारे 130 ते 140 दिवसांचा कालावधी लागतो.
ः 02358 - 282415, 282130, विस्तार क्र. ः 250, 242
उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी

गावठी कोंबडीपालनात पक्षी व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या बाबी कोणत्या?

राजू सोनवणे, मेहकर, जि. बुलडाणा
क्रां तिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती ः गावठी कोंबड्यांमध्ये सुरवातीचे चार आठवडे पिल्लांची योग्य प्रकारे जपणूक करावी. पिल्ले आकाराने व वजनाने कमी (25 ते 27 ग्रॅम) असतील तर सुरवातीच्या काळात कृत्रिमरीत्या पुरविण्यात येणारी ऊब कमी पडू देऊ नये. नाहीतर पिल्लांमध्ये मरतूक होते. खासकरून नदीप्रवाहाच्या जवळचा भाग किंवा जास्त थंड हवेच्या ठिकाणी वीजकपातीच्या कालावधीमध्ये मरतुकीचे प्रमाण 50 टक्के अधिक असते. शेतकरी यावर उपाय म्हणून पेट्रोमॅक्‍सच्या साह्याने उष्णता देण्याचा प्रयत्न करतात; परंतु एकंदरीत सर्व विचार केला तरी 10 ते 15 टक्के मर पिल्लांमध्ये निश्‍चितच धरावी लागते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या कोंबड्या बंदिस्त पद्धतीने पाळताना, त्यांना देण्यात येणारी जागा, खाद्य, पाणी अपुरे पडल्यास कोंबड्यांमध्ये मूलतः असलेल्या विकृतीला चालना मिळते. शेडमध्ये प्रखर प्रकाश किंवा कोंबड्यांची गर्दी जास्त असल्यास कोंबड्या एकमेकांची पिसे उपटतात. काही वेळा एकमेकांना घायाळही करतात. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी पिल्ले 10 ते 12 दिवसांची असताना एकदा व त्यानंतर एक ते दीड महिने वयाच्या कालावधीत चोची बोथट करणे आवश्‍यक आहे. असे केल्यास बोचण्याचे प्रमाण कमी होते. कोंबडी घरात वायुविजन चांगले असणे आवश्‍यक आहे. वाढीच्या कालावधीत प्रखर उजेड येणार नाही, खाद्याची भांडी बराच काळ रिकामी राहणार नाहीत याची काळजी घेऊन योग्य व्यवस्थापन असल्यास या विकृतीवर पूर्णपणे मात करता येते. या प्रमाणात कोंबड्या पाळताना गॅस ब्रुडरचा वापर करणे व्यापारी तत्त्वावर अधिक योग्य होईल. अधिक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
ः 02169 - 244214
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा

परसबागेतील भाजीपाल्याला चव न्यारी...

मी लातूर शहरात बारा वर्षांपूर्वी घर बांधले. घराच्या बाजूला शिल्लक जागेत लॉन व भाजीपाला लागवडीचे नियोजन केले. बागेच्या दोन कोपऱ्यांत सेंद्रिय खताचे खड्डे घेतले. घरातील चौघांना पुरतील अशा पद्धतीने भाजीपाला लागवडीचे नियोजन केले. घर बांधण्याच्या काळात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष होते. त्या वेळी घेतलेली कूपनलिका कोरडी निघाली. पुढच्या काळातील पाण्याच्या संकटाची ही नांदी होती. म्हणून छतावरील सर्व पाणी व उघड्या प्लॉटमधील जादाचे पाणी बोअर भोवती मुरविण्यासाठी पाच ु चार फुटांचा फिल्टर खड्डा पाणी मुरण्यासाठी तयार केला. त्या खड्ड्यामध्ये लहान- मोठे दगड, वाळू भरून फिल्टर चेंबर बनविला. अशा तऱ्हेने पहिल्या पावसात बोअरचे पुनर्भरण झाले. त्यामुळे आजपर्यंत कूपनलिकेचे पाणी कमी झाले नाही.

भाजीपाल्याचे नियोजन :
घरातील तांदूळ, डाळी, भाज्या, धुतलेले पाणी परसबागेतील भाज्यांना वापरतो. तसेच भांडी धुतलेले पाणी देखील झाडांना वापरले जाते. सध्या माझ्याकडे जूनपासून भेंडी, वांगी, गवार, फुलकोबी, पत्ताकोबी, नवलकोल, चवळी या भाज्या दर महिन्याला थोड्या थोड्या लावल्या जातात. कंपाउंडवर कारले, तोंडले, दोडके, हिरवा भोपळा लागवड केली जाते. परसबागेत थोड्या भागात पालकाची दर महिन्याला नवीन लागवड करतो. कांदा, मेथी बरोबरीने वाफ्यामधील मधल्या मोकळ्या जागेत कोथिंबीरही वर्षभर ताजी मिळते.

बागेत एक लिंबाचे आणि कढीपत्त्याचे झाड आहे. आवळा, अंजिराचे झाड लावले आहे. परसबागेत भाजीपाला लागवड करण्यासाठी हंगामानुसार कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये रोपे करून घेतो. रोपे योग्य कालावधीची झाल्यावर बागेतील वाफ्यात लावतो.

थोड्या सावलीच्या कोपऱ्यात आले, पुदिना, गवती चहा लागवड केली आहे. सांडपाण्याचा वापर अळूसाठी केला आहे. भाजीपाल्याच्या बरोबरीने निशिगंध, अबोली, मोगरा, सदाफुली, जास्वंद, शेवंती लागवड केली आहे. कुंड्यांत गुलाब व इतर फुलांची शोभेची झाडे लावली आहेत. कंपाउंडच्या कडेने तुळशीची रोपे, कोरफड, गुळवेल, अश्‍वगंधा लागवड केलेली आहे. टोमॅटो, मिरची, झेंडू, शेवगा, स्वीट कॉर्न, मका याचीही लागवड बागेत केली आहे. फुलझाडे, भाजीपाला आणि फळझाडांना मी रासायनिक खतांचा वापर करीत नाही.

हंगामी भाज्या काढल्यानंतर राहिलेली खोडे, पानांचे तुकडे करून सेंद्रिय खतनिर्मितीच्या खड्ड्यात टाकतो. तसेच शेणखत, खरकटे अन्न खड्ड्यातच जिरविले जाते. खड्ड्यामध्ये गांडुळे सोडली आहेत, त्यामुळे खत लवकर तयार होते. हे तयार झालेले सेंद्रिय खत दर दोन महिन्यांनी भाजीपाला, फळझाडांना देतो. भाजीपाल्यावर सहसा कुठली रोग-कीड पडत नाही. कीड, रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर लिंबोळी अर्क फवारतो. रोगग्रस्त पाने पुरून टाकतो. दररोज बागेत झाडाचे निरीक्षण असते. त्यामुळे कोणाच्या शेजारी कोणती कीड येते. कशावरचा रोग दुसऱ्यावर पसरतो हे कळते.

आनंददायी बाग...
आपल्याला पुरेल व एकानंतर दुसरी भाजी उपलब्ध होईल अशा पद्धतीने भाजीपाला लागवड केली जाते. त्यामुळे फार फार तर महिन्यात एखादी दुसरी भाजी आणावी लागते. शिल्लक भाजी राहिली तर शेजाऱ्यांना देतो. असा वर्षभर मिळणारा सेंद्रिय ताजा भाजीपाला हा चवदार व पौष्टिक तर आहेच, त्याचबरोबरीने आर्थिक बचतही होते. फावल्या वेळेत बागेची मशागतही होते. परसबागेमुळे घराचा परिसर सुंदर राहतो. लॉन भोवती फुलझाडे असल्याने मुलांना खेळायला जागा झाली आहे. बागेतील झाडावर चिमण्या, कावळे वेगवेगळ्या हंगामांतले पाहुणे पक्षी चिवचिवतात, झाडावर त्यांच्यासाठी मडक्‍यात पाणी ठेवतो, तसेच पक्ष्यांना खाण्यासाठी दाणेही ठेवतो. त्यामुळे वेगवेगळे पक्षी बागेत पाहायला मिळतात.

- रमेश चिल्ले, लातूर

शंका-समाधान

आम्हाला बागेच्या कडेने शोभेची झाडे लावायची आहेत, यासाठी कोणती झाडे निवडावीत? या झाडांची काय वैशिष्ट्ये आहेत?
तुषार पेटकर, धुळे
परदेशी शोभेच्या वनझाडांमध्ये प्रामुख्याने टॅबेबिया, कॅशिया, जॅकारंडा, कॉपर पॉड, गुलमोहर, पतंगी, पिचकारी, ब्ररदंडी, कैलासपती, काशीद, मलेशिया, चेंडूफळी, जंगली बदाम व कांचन इत्यादी लागवड केलेल्या आढळतात; परंतु या झाडांपेक्षाही सुंदर असलेली झाडे आपल्या जंगलांमध्ये आढळतात.

आपटा ः
हा मध्यम उंचीचा पर्णझडी वृक्ष असतो. याचे खोड वेडेवाकडे वाढलेले असते. खोडावर भरपूर फांद्या असून, त्या जमिनीच्या दिशेने झुकलेल्या असतात. पाने रुंद, पसरट, दोन खंडांत विभागलेली, सात ते नऊ मुख्य शिरायुक्त असतात. पानाच्या खालच्या भागावर लव असते. फांद्यांच्या शेंड्यात किंवा पानासमोर उन्हाळ्यात फुलांच्या मंजिऱ्या येतात. फुलांच्या पाकळ्यांचा रंग पांढरा असतो.

बहावा ः
मध्यम उंचीचा हा वृक्ष दहा मीटरपर्यंत वाढतो. पर्णझडी जंगलांत आढळणाऱ्या या वृक्षाची लागवड बियांपासून रोपे तयार करून करतात. लांबलचक मोठ्या पिवळ्या रंगांचे फुलांचे घोस व त्यानंतर येणाऱ्या दीड ते दोन फुटांच्या शेंगा यामुळे हा वृक्ष सर्वांना आकर्षून घेतो.


कांचन ः
मध्यम उंचीचा हा वृक्ष आहे. गुलाबी फुले व पानांचा आकार यामुळे सर्वांनाच मोहात टाकतो. या वृक्षाच्या पाकळ्या गुलाबी, पांढऱ्या व एक पाकळी थोडीशी तांबडी असते. कांचनचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो.

सोनचाफा ः
दिसण्यास अतिशय सुंदर असणारा हा मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष आहे. गुटी कलम पद्धतीच्या रोपांपासून किंवा बियांपासून रोपे करून लागवड केली जाते. सुंदर वासाची, शेंड्याला पिवळ्या रंगाची फुले या झाडाला येतात. देवळाच्या आवारात या झाडांची लागवड करतात.

बकुळ ः
सुमारे १० ते १५ मीटर उंच वाढणाऱ्या या सदाहरित वृक्षाची फुले माळा करण्यासाठी, सुगंधी द्रव्य काढण्यासाठी वापरतात. रस्त्याच्या दुतर्फा किंवा बागेत वृक्षाची लागवड केली जाते. चांगले गुणधर्म असलेल्या वृक्षांच्या बियांपासून रोपे तयार करून लागवड करावी. फुले उन्हाळ्यात येतात. फुले अतिशय सुवासिक असतात. लागवड ५ x ५ मी. अंतराने २ x २ x २ फुटांचे खड्डे घेऊन करावी. सुरवातीला हे झाड हळू हळू वाढते, त्यामुळे मोठी रोपे लावावीत.

नागचाफा ः
"नागचंपा', "नागकेशर' या प्रचलित नावांनी हा वृक्ष ओळखला जातो. हा वृक्ष उंच वाढणारा, सदाहरित असून, याची साल राखाडी, गुळगुळीत असते. पाने वैविध्यपूर्ण असतात. फुलांमध्ये मोठ्या चार पाकळ्या, गुच्छात पिवळ्या रंगाचे पुंकेसर असतात. या वृक्षास फुले उन्हाळ्यात येतात. बियाणे परिपक्व झाल्यानंतर ते लगेच पिशवीत टाकून रोपे करावीत. बियाणे जास्त काळ काढून ठेवल्यास उगवणक्षमता नाहीशी होते. रोपे तीन ते चार फूट उंचीची करून लागवड करावी.

सुरंगी ः
"सुरंग', "सुरंगी', "सुलतान चाफा' इत्यादी प्रचलित नावांनी या झाडाला ओळखले जाते. हा सदाहरित असणारा वृक्ष हळूहळू वाढतो, त्यामुळे रोपवाटिकेत याची रोपे मोठी करूनच लागवड करावी. पाने जाडसर, दोही कडा सरळ रेषेत, टोकाला टोकदार किंवा बोथट असतात. फुले पांढरी असून, ती खोडावर फेब्रुवारीपासून येण्यास सुरवात होते. परिपक्व बियाणे पेरून रोपे पिशवीत करावीत. लागवड ५ x ५ मी. अंतराने करावी.

कदंब ः
या झाडाची साल बदामी, रखरखीत असते. पाने समोरासमोर मोठी असतात. वासाची छोटी फुले चेंडूसारख्या आकारात एकवटलेली असतात. बियांपासून रोपे तयार करून लागवड ५ x ५ मी. किंवा ७ x ७ मी. अंतराने करतात.

कुंडीतील झाडांसाठी खत मिश्रण

झाडांच्या वाढीसाठीचे खत मिश्रण वजनाने अतिशय हलके असावे. नाही तर विनाकारण कुंडीचे वजन वाढते. मिश्रणामध्ये झाडांच्या मुळांना गारवा आणि खेळती हवा राहील असे पाहावे. कडक उन्हामध्ये कुंड्या तापतात, त्यामुळे मुळांना चटके बसतात, त्यासाठी कोकोपीट, विटांचे बारीक तुकडे, शेंड्यांची टरफले, नारळाच्या शेंड्या, बारीक वाळू, गांडूळ खत, कुजलेला पालापाचोळा, नीम पेंड आणि माती याचा वापर करावा.

प्रथम कुंडी भरताना ड्रेनेजेस होल बंद नाही ना याची खात्री करावी. त्यावर कौलाचा किंवा कुंडीचा दोन इंचाचा तुकडा ठेवावा. त्यानंतर विटांचा बारीक थर एक ते दीड इंचाचा द्यावा. त्यानंतर पोयटा माती तीन इंच भरावी. चांगली दाबून भरावी. त्यानंतर तयार केलेले मिश्रण (मिश्रणाचे प्रमाण ः 30 टक्के माती + 30 टक्के कोकोपीट + 20 टक्के गांडूळ खत + 20 टक्के कंपोस्ट खत, दोन मुठी निंबोळी पेंड आणि थोडीशी गरजेपुरती बारीक वाळू.) तीन इंच दाबून भरावे. त्यानंतर रोपटे मधोमध ठेवून हलकेच दाबावे.

रोपाच्या मुळाभोवतीचा मातीचा गोळा फुटणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर कुंडीच्या कडेने नारळाच्या शेंड्या रचून घ्याव्यात, हे करीत असताना मिश्रण हलकेहलके दाबून भरावे. साधारणपणे वरती दोन इंच जागा शिल्लक राहील असे पाहावे. एक इंचाचा बारीक वाळूचा थर द्यावा. वाळूमुळे कुंडीतील माती पाणी देताना, उडून बाहेर येत नाही. वरती एक इंचाची जागा कुंडीतील पाणी साठून राहण्यासाठी ठेवावी. कुंड्यांच्या आकारानुसार खत मिश्रण भरावे.

रोपटे लावल्यानंतर हलकेच पाणी घालावे, त्यामुळे मिश्रणातील मोकळी जागा बंद होते. ड्रेनेज होलमधून पाणी झिरपते आहे ना याची थांबून खात्री करावी. गच्चीवरील कुंड्या आठ ते नऊ तास कडक उन्हात राहात असल्याने मिश्रण लवकर सुकते, म्हणून सर्वसाधारणपणे संध्याकाळी कुंड्यांना पाणी घालावे, त्यामुळे रात्रभर कुंडीत चांगला गारवा राहतो.

घराच्या बागेत लॉन करायचे आहे, याबाबत माहिती द्यावी.

ज्या जागेवर लॉन तयार करायचे, ती जागा चारही बाजूंनी मोकळी हवा येईल, जिथे नेहमी सूर्यप्रकाश येत असेल अशी निवडावी. ज्या ठिकाणी लॉन लावायचा आहे ती जमीन उत्तम निचरा करणारी पाहिजे. ज्या जागेवर लॉन लावायचे आहे, तेथे पाण्याची भरपूर उपलब्धता असावी. लॉन लागवडीपूर्वी जमीन कुदळ-फावड्याने खोदून तीन-चार वेळा माती खालीवर करावी. नंतर सपाट करून त्यावर भरपूर प्रमाणात शेणखत मिसळावे. रानटी गवत, अनावश्‍यक असलेली झुडपे तोडून टाकावीत. जमीन तयार करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कीडनाशके मिसळावीत, तसेच लॉनच्या जलद वाढीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा मातीत मिसळावी. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी हरळी गवत लॉनसाठी वापरले जाते. गवताच्या पात्याच्या आकारानुसार विविध प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये ऍग्रिटीस टिनीअस, ऍग्रिटीस कॅनीना, फिस्टूला ओव्हीना, किस्टूला रूबरा, पोरीनिअल रे ग्रास, मेक्‍सिकन गवत हे प्रकार आहेत. लॉन लागवड पेरणी पद्धत, टोकण पद्धत, गादी पद्धतीने केली जाते. पेरणी पद्धतीमध्ये गवताचे बी लागवडीसाठी वापरतात. टोकण पद्धतीमध्ये टोकणाच्या साह्याने छिद्र पाडून 5 ु 5 सें.मी. अंतरावर गवताची लागवड मुळासकट करतात. गादी पद्धतीने लागवड करताना गवताची विशिष्ट आकाराच्या गादीची लागवड करण्यात येते.

लॉन जिथे लावायचे असेल त्या जागेवर खत व माती यांचे मिश्रण जमिनीवर समांतर पसरावे व नंतर निवडलेल्या गवताचे छोटे छोटे हिस्से (मुळासकट) ठराविक अंतराने जमिनीत दाबून टाकावे. जवळ जवळ गवत लावल्याने लॉन लवकर तयार होते. गवत लावल्यानंतर पाणी शिंपडणे आवश्‍यक आहे. लॉनला रोज सायंकाळी पाणी द्यावे. पावसाळ्याच्या सुरवातीला लॉनची लागवड केल्यास वाढ झपाट्याने होते. लॉन लावल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी त्यावरून रोलर फिरविला, तर गवताची मुळे सगळीकडे सारख्या प्रमाणात जमिनीत जातील व समप्रमाणात रुजतील. शिवाय लॉन सर्वत्र सारखे होण्यास मदत होईल. तयार झालेले लॉन मशिनच्या साह्याने कापायला हवे, गवत कापताना मशिन एका बाजूने सरळ राहील, तसेच मध्ये कोणतीही जागा सुटणार नाही याची काळजी घ्यावी. गवत कापून झाल्यावर लॉनची कडा सुटणार नाही, याची काळजी घ्यावी. गवत कापून झाल्यावर लॉनच्या कडा खुरप्याने कापून टाकाव्यात. लॉनला नियमित सकाळ-संध्याकाळ पाणी द्यावे. हिवाळ्यात एक दिवसाआड, तसेच पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे.सुंदर लॉन तयार करण्यासाठी लॉनला लागणाऱ्या खताकडे वेळोवेळी लक्ष देण्याची गरज असते. त्यासाठी गवत कापणीनंतर शेणखत व मातीचे मिश्रण पसरविणे फायदेशीर असते. हे मिश्रण फेब्रुवारी-मार्च महिन्यात गवताला दिले पाहिजे. बाजारात लॉनसाठी लागणारी खते उपलब्ध आहेत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांचा वापर करावा.

आमच्याही कुटुंबाचा वार्षिक ताळेबंद आहे

बारा जणांचं आमचं कुटुंब आहे. आई-वडील आम्ही नवरा-बायको, दोन भाऊ, शंभरी गाठलेली आजी, मला दोन मुलं आहेत, एक मुलगी आहे. एक मुलगा आहे. एका भावाचं नुकतंच लग्न झालं आहे. तीन नंबर भाऊ शिकतो आहे, दोन म्हशी आहेत, एक गाय आहे, एक बैलजोडी आहे. पाच शेळ्या आहेत, सुगीत आमचं कुटुंब शेतावरच वस्तीला असतं. वस्तीपुरतं शेतावर झोपडीवजा घर आहे. गावातल्या घरी आजी एकटी राहते, तिच्याबरोबर माझी शाळेत शिकणारी पोरं असतात. आजीला पोरांखेरीज करमत नाही. आम्ही दररोज गावातील घराकडे येत- जात असतो. मोटरसायकल आहे. दोन न ंबरचा भाऊ मोटरसायकल वरून भाजीपाला रोज बाजारात घेऊन जातो. तीन भावांत चार एकर शेती आहे. विहीर आहे. विहिरीला भरपूर पाणी आहे. माझे एक चुलते आहेत. चुलत चुलते. माझ्या वडिलांना सख्खा भाऊ नाही. चुलत चुलत्याची तेरा एकर शेती आहे. ती भागाने आम्हीच कसतो. त्याला मूलबाळ नाही. त्यांचा सांभाळ आम्हीच करतो. त्याचे वडील लहानपणी वारले त्याचा सांभाळ आमच्या आजीनेच केला. त्यामुळे आजीवर त्याची फार मर्जी आहे. अजून काहीही करायचं असेल तर तो आजीला विचारतो. तो शिकला आहे. काही वर्षे तलाठी होता. राजकारणाचा त्याला नाद आहे. पक्षाचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी नोकरी सोडली. त्याची राहणी फारच साधी आहे. गरजा फारच कमी आहेत. त्यानं गरिबांच्या कल्याणासाठी सगळं आयुष्य वेचलं. त्याने पक्षाकडून कधीच मानधन घेतलं नाही. तो सांगतो. वडिलोपार्जित शेतीवाडी आहे. जगण्यापुरतं मिळतं. अनेकांना त्याने मदतही केली आहे. त्याने मला सांगितले आहे. माझ्या माघारी माझ्या उत्पन्नातील काही भाग गोरगरिबांना मदत करा. त्याच्या शेतीचा आम्हाला मोठा आधार आहे. त्याने आम्हाला एक शिकवलं आहे. सगळा खर्च रोजच्या रोज लिहून ठेवायचा. दोन नंबरचा भाऊ घरातील सगळा खर्च लिहून ठेवतो. त्यानं दुसरं एक शिकवलं. आपला वार्षिक ताळेबंद तयार करायचा. याचा अर्थ आम्ह
ाला कळायचा नाही. तो सांगतो. राष्ट्र जसं आपला अर्थ संकल्प तयार करतं, तसा आपलाही अर्थसं कल्प तयार केला पाहिजे. भविष्यात काय करणार आहोत, त्याची तरतूद कशी करायची. तातडीची गरज कोणती? ऐनवेळी येणाऱ्या संकटासाठी तरतूद केली पाहिजे. आपण शेतकरी भरपूर राबतो. राबूनही आपल्या पदरी काही पडत नाही. भूमी तर दरवर्षी देत आहे. तिचा काही दोष नाही. आपल्या जिवावर, आपल्या कष्टावर दुसरे गब्बर झाले. ते गब्बर का झाले, त्यांनी हिशेब ठेवला. नफा-तोटा त्यांना रोज कळतो. आपण कुठे आहेत हे कळावं लागतं. त्यानतर कुठे जायचं हा विचार सुचतो. आपण हिशेबी नाही. आपल्याकडे कोणताच ताळेबंद नाही. आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं. अशी आपल्या शेतकरी समाजाची गत आहे. आपली जी आजची परिस्थिती आहे. त्या विषयी इतरही घटक जबाबदार आहेत. त्यामध्ये आपणही जबाबदार आहोत, आपला शेतकरी शिक्षित झाला पाहिजे. तो साक्षर झाला पाहिजे. आपली उन्नती आपण करू शकतो, निसर्गाची आपल्याला साथ आहे. ज्या देशांना निसर्गाची साथ नाही. ते पाणीही आयात करतात, ती राष्ट्रे पुढे जात आहेत. शेती कसणे हे कमीपणाचं आहे, हा एक गैरसमज पसरला आहे. तो गैरसमज पसरायला आपणच जबाबदार आहोत, निसर्गाचा एक नियम आहे. निसर्गाने सर्वांना जगता येईल, एवढं दिलं आहे. भेदाभेद आपण केला आहे. निसर्गाने प्रत्येक जिवाला जन्म दिला. त्याला कोणती ना कोणती कला दिली आहे. आं धळे, पांगळेही याला अपवाद नाहीत. आमची मिळकत, आमचा खर्च याचा ताळेबंद तयार करतो. दरवर्षी प्रगती होत आहे. गावातील इतर कुटुंबांत असं घडत नाही. याचं कारण त्यांनी नियोजन केले नाही. एक खरं आहे. प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शकाची गरज आहे. पंतप्रधान जरी असला तरी त्याला अनेक लोक सल्ला देण्यासाठी असतात. आ मच्या चुलत भावाने केवळ शेती दिली नाही, त्याने कसं जगावं हेही शिकवलं हे अधिक महत्त्वाचं आहे, प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून काम करावे, हे सूत्र आहे. अडीअडचणीला एकमेकांचा हात द्यावा, माणूस कितीही मोठा होऊ द्या. त्याला इतरांची गरज भासते, आम्हाला कुणाची गरज नाही, ही भावना फसवी आहे.

बांबू लागवड यशस्वी होण्यासाठी...

शेत व पडीक जमिनीवरही बांबू लागवड यशस्वीपणे करता येते. त्यासाठी लागवडीच्या पद्धती, पीक संरक्षण आणि बांबू कापणी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. याविषयीची माहिती करून घेतल्यास बांबूपासून चांगले उत्पादन मिळविता येईल.

बांबूच्या लागवडीसाठी किमान नऊ अंश से. तापमानाची आवश्‍यकता असते. बांबूच्या व्यावसायिक पद्धतीने लागवडीसाठी साधारणतः खोल गाळाची व पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयुक्त असल्याचे आढळून आलेले आहे. बांबू लागवडीच्या दोन पद्धती आहेत : १) कंद काढून लागवड करणे. २) बियांपासून रोपे तयार करून लागवड करणे. याशिवाय उतिसंवर्धन पद्धतीने बांबूची अभिवृद्धी यशस्वी ठरलेली आहे.

कंदाद्वारे लागवड ः
बांबूच्या वाढणाऱ्या खोडास कंद असे म्हणतात. एक वर्षाच्या आतील दोन-तीन बांबू काढून लागवडीच्या ठिकाणी जमिनीत गाडून लावावे. जमिनीच्या वर १०-१२ सें.मी. बांबू ठेवून त्यावरील भाग छाटावा. किमान दोन-तीन डोळे असणारा कंद लागवडीकरिता वापरावा.

बियांपासून बांबूची लागवड ः
रोपवाटिकेत पिशव्यांमध्ये किंवा गादी वाफ्यावर रोप तयार करून लागवडीसाठी वापरता येतात. पेरणीसाठी बियाण्याला कुठल्याही प्रकारची पूर्वप्रक्रिया करण्याची आवश्‍यकता नसते; परंतु उधईपासून बियाण्याचे संरक्षण करण्यासाठी पेरणी करताना गादी वाफ्यावर दहा टक्के लिंडेन पावडर शिंपडावी. पेरणीनंतर दहा दिवसांत बियाण्याची उगवण होते. नवीन बियाण्याची उगवणक्षमता ७० टक्‍क्‍यांपर्यंत असते. डब्यात बियाण्याची साठवण केल्यास आठ ते दहा महिन्यांपर्यंत बियाणे पेरणीसाठी वापरता येते.

पेरणीची वेळ ः
ज्या ठिकाणी पेरणीसाठी बियाणे उपलब्ध आहे, अशा ठिकाणी मार्च, एप्रिल महिन्यांत पेरणी करावी. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी ३०० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीत लागवड करावयाची असल्यास त्या ठिकाणी उन्हाळ्यात पाच मीटर अंतरावर आखणी करून ६० ु ६० ु ६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदून ठेवावे. पावसाळ्याच्या सुरवातीस भुसभुशीत माती व एक आगपेटी भरून दहा टक्के लिंडेन पावडर टाकून खड्डा भरून घ्यावा. पावसाला सुरवात झाली म्हणून पिशवीतील रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून खड्ड्यात लागवड करावी.

बांबू बेटाची जोपासना व मशागत ः
लागवड झाल्यावर प्रथम वर्षी महिन्यातून एकदा नियमितपणे रोपाभोवतीचे तण काढून माती हलवून घ्यावी आणि रोपांना मातीची भर द्यावी. यामुळे कंद जोमाने वाढण्यास मदत होते. निंदणी आणि भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे. कंदापासून लागवड केल्यास बांबूचे बेट दुसऱ्याच वर्षी तयार होते व पाच-सहा वर्षांत उत्पादनास सुरवात होते. बांबू जमिनीतल्या मूळ खोडापासून वाढतात. त्यामुळे खोडापासून प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नवीन कोंब फुटतात. ज्या दिशेस कोंब फुटतात, त्याला "चाल' म्हणतात. बांबू बेटातील कळकांची वाढ झपाट्याने होते आणि ती एका वर्षात पूर्ण होते. मुली जातीचा बांबू सोडल्यास सर्व बांबूच्या जाती एकत्र बेट किंवा रांजी बनवून वाढतात. बांबूच्या बेटाचे आयुष्य ३० ते ६० वर्षांपर्यंत असते. आयुष्याच्या संपुष्टीनंतर बांबूस फुले येतात. अशा वेळेस बांबू वनातील सर्व बांस वाळतात व मरतात. बियांपासून नवीन रोपे तयार होतात व बांबू वनाचे पुनरुज्जीवन होते. दर वर्षी येणारे नवीन कोंब जतन करून त्यांना वाढायला आधार आणि वाव देऊन फक्त पक्के असे कळक ठराविक पद्धतीने तोडल्यास व मूळ खोडास कोणतीही इजा न पोचविल्यास बांबूच्या बेटापासून त्याच्या स्वाभाविक आयुष्यमानापर्यंत सातत्याने उत्पादन मिळू शकते.
०७१२-२५२१२७६
अखिल भारतीय समन्वित कृषी वनशेती संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर.


बांबू कापणीबाबत नियम ः
१) अविकसित रांजीतून बांबू तोडू नये. ज्या रांजीत दहापेक्षा कमी कळक असतात, त्यांस अविकसित रांजी समजतात. २) वाढीच्या काळात १५ जून ते १५ सप्टेंबरपर्यंत बांबूची कापणी करू नये. ३) दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे बांबू तोडू नयेत. ४) अर्धवट तुटलेले, वेडेवाकडे, मेलेले कळक प्रथम तोडावे. ५) प्रत्येक नवीन कळक आणि कोवळ्या कळकांना आधार देण्यासाठी आणि भविष्य काळाच्या दृष्टीने प्रत्येक कोवळ्या कळकासाठी दोन या प्रमाणात कमीत कमी आठ प्रौढ कळक प्रत्येक रांजीत सोडलेच पाहिजेत. मूळ खोड उघडे पडू नये किंवा त्यास कुठलीही इजा पोचू नये, यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : १) रांजीत राखून ठेवलेले कळक हे रांजीत सारख्या अंतरावर राहतील, या दृष्टीने तोड केली पाहिजे. २) कळकांच्या जमिनी लगतच्या पहिल्या कांड्यावर व जमिनीपासून १५ सें.मी. उंचीवर आणि जास्तीत जास्त ४५ सें.मी. उंचीपर्यंत कळक तोडला पाहिजे. ३) तोड ही अत्यंत तीक्ष्ण धारेच्या पात्याने केली पाहिजे. त्याकरिता विशेष प्रकारे तयार केलेले बांबू कापणी विळे वापरावेत. ४) तोडीनंतर सर्व काडीकचरा रांजीपासून दूर केलाच पाहिजे. त्यामुळे कीटक व वणव्यापासून बांबूवनास धोका राहणार नाही.

उत्तम पोषणासाठी दररोज खा अंडे...

अंडे व अंड्याचे पदार्थ हे आरोग्य संवर्धन व रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यास उपयोगी आहेत. अंडे खाल्ल्यामुळे फक्त आरोग्य सं वर्धनच होते असे नाही तर एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या लोकांमध्ये जर विशेष पोषण तत्त्वाची कमतरता आढळली तर त्या तत्त्वाचे प्रमाण कोंबडीच्या खाद्यात वाढवून दिल्यास मिळणाऱ्या अंड्यांपासून त्या माणसांमधील पोषण तत्त्वाची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
डॉ. आर. एन. वाघमारे, डॉ. सी. एस. शेख

वैज्ञानिकांनी कोलेस्टेरॉलची भीती काढून टाकल्यामुळे बाजारात अंडे व अंड्यांच्या पदार्थांना चांगली मागणी मिळू लागली आहे. अनेक देशांतील आरोग्य संवर्धन करणाऱ्या संस्थांनी प्रत्येक दिवशी एक अंडे खावे असा सल्ला दिला आहे.

उच्चतम दर्जाचे प्रोटिन (प्रथिनयुक्त पदार्थ)
इतर कोणत्याही पदार्थांपेक्षा अंड्यातील प्रथिने (प्रोटिन) हे जास्त प्र माणात व उच्चतम दर्जाचे आहेत आणि ते ऊर्जा व वजन नियंत्रण करण्यास उपयोगी पडतात. त्यांची एक विशेषतः अशी आहे, की हे वृद्धांसाठी पचनास अति सोपे आहे, कारण की वयोमानानुसार होणाऱ्या स्नायूंतील (सारकोपेनिया) या आजाराचे घातक परिणाम ते कमी करते. गरोदर स्त्रियांसाठी अंडे हे किमती, परवडण्यायोग्य उच्चतम दर्जाच्या प्रथिनांचे (प्रोटिन) स्रोत आहे. यात अर्भकाची संपूर्ण वाढ व विकास होण्यास लागणारे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. तसेच गर्भावस्थेत अंडे खाल्ल्यामुळे सरासरी वजनाचे बालक जन्‌ माला येण्यास मदत होते. (कमी वजनाचे बालक जन्मास येत नाही.) अंड्यातील झानतोफील, ल्युटीन आणि झानथिन हे डोळ्यांचे आरोग्य राखतात, तसेच स्नायूच्या सुरकुत्या, आंधळेपणा व मोतीबिंदू कमी करण्यास मदत करते. अंड्यातील ल्युटीन हे दुसऱ्या पदार्थांपासून मिळणाऱ्या ल्युटीनपेक्षा दोन ते तीन टक्के जास्त आहे. कारण ल्युटीनची विरघळण्याची क्षमता ही अंड्यातील पिवळ्या लेसिथिनमध्ये सर्वाधिक आहे. आठवड्यास सहा अंडी खाल्ल्यामुळे रक्तातील झानतोफीलचे प्रमाण तर वाढतेच, शिवाय स्नायूंतील झानतोफील पिगमेंट ही 50 टक्केपर्यंत वाढते. मॅरीगोल्डचा रस कोंबडीच्या खाद्यात मिसळल्यास अंड्यातील ल्युटीन व झानतीनचे प्रमाण हे पाच ते दहा टक्के वाढते. झानतीनचे प्रमाण जास्त असलेली अंडी सध्या मर्यादित प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत.

"ड' जीवनसत्त्व
पुष्कळ लोकांत "ड' जीवनसत्त्व कमतरता असल्याचे आढळून येते. बालकातील "ड' जीवनसत्त्वाची कमतरता 80 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. तर 20 वर्षांच्या आतील वयोगटात ती 42 टक्के पर्यंत आहे. "ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे 26 टक्‍क्‍यांहून अधिक पुरुष व महिला मृत्यूस कारणीभूत ठरतात. अमेरिकेतील एका अभ्यासात 99,745 जणांची आरोग्य तपासणी केली असता त्यात असे आढळले, की "ड' जीवनसत्त्व व जीर्ण (क्रॉनिक) आजाराचा संबंध आढळला आहे. त्यापैकी 33 टक्के हृदयविकाराच्या रोग्यांची संख्या आहे. मधुमेह प्रकार-2 ची 55 टक्के आणि पचन संस्थेशी संलग्न विकारांची संख्या 51 टक्के आहे. कोंबडीच्या खाद्यात (पशू खाद्यात) बदल करून अं ड्यातील "ड' जीवनसत्त्वाचे प्रमाण नैसर्गिकरीत्या तीन ते पाच पट वाढवता येते.

आहारात अंडी उत्तमच
बहुतेक प्रौढ तसेच गरोदर व बाळास दूध पाजणाऱ्या स्त्रियांत को लिनचे प्रमाण कमी आढळते. सर्वाधिक कोलिनचे प्रमाण हे म्हशीचे मा ंस, कोंबडीचे यकृत व अंडे यात आहे. आहारातील अंड्याच्या स मावेशामुळे प्रौढातील कोलिनचे प्रमाण 25 ते 30 टक्के व गरोदर स्त्रियांत 50 टक्केपर्यंत वाढण्यास मदत होते.

अंड्याचे पदार्थ
अंड्याच्या पदार्थांत फक्त पोषण तत्त्वच वाढवायचे नसून त्यात काही खास पोषण घटकही मिसळता येतात. उदा. पातळ अंड्याच्या पदार्थांत डी एच.ए. ल्युटीन, जीवनसत्त्व बी-12, जीवनसत्त्व "ड' व अंड्यातील पांढऱ्या बल्कात प्रोटिन (पिष्टमय पदार्थ) मिसळल्यास ते आहारातील गरज भागविण्यास पुरेसे आहेत. अशाच प्रकारचे पदार्थ हे गरोदर महिला, बाळास दूध पाजणाऱ्या स्त्रिया, वाढणारी बालके, खेळाडू व शरीर सौष्ठव करणाऱ्यांसाठी बनवू शकतो. अंडे हे शरीरास हवे असणारे अन्न घटक इतर कोणत्याही स्रोतांपेक्षा सहज उपलब्ध करून देते.
02452-243375,228176
(लेखक पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य व साथरोग विज्ञान विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत.)

अंड्यातील कोलिनचे फायदे
कोलिन हे अंड्यातील अतिमहत्त्वाचे पोषणतत्त्व आहे. अंडे हे को लिनचे उत्तम स्रोत आहे. कोलिन हे मेंदू व मज्जातंतूचे कार्य, यकृतातील चयापचय, पोषण तत्त्वाचे वहन तसेच शरीरातील प्रत्येक पेशीच्या कार्यात उपयोगी आहे. कोलिन हे बालकाच्या मेंदूची वाढ व विकास तसेच स्मरणशक्ती व शिक्षणास उपयुक्त आहे. त्याचे इतर फ ायदे पुढीलप्रमाणे आहेत.
- स्मरणशक्ती वाढविते : गरोदर मातेच्या आहारात कोलिनचे योग्य प्रमाण असले तर नवजात शिशूची स्मरणशक्ती मजबूत राहते.
- स्तनाचा कर्करोग टळतो : योग्य प्रमाणात कोलिन आहारात असेल तर स्तनाचा कर्करोग होत नाही.
- हृदयविकारास प्रतिबंध : कोलिन हे रक्तातील हिमोस्सिटीनचे प्रमाण कमी करण्यास तसेच हृदयविकार कमी करण्यास मदत करते.

परसबागेत करा औषधी वनस्पतींची लागवड

अनादिकाळापासून मानव आपल्या आरोग्य संतुलनासाठी औषधी वनस्पतींचा वापर करत आला आहे. निसर्गशास्त्र आणि आयुर्वेदाच्या काही सिद्धांतानुसार मनुष्य प्राण्यास होणाऱ्या व्याधी अथवा रोग स्थानानुसार बदलत असतात. अशा या रोगांवर वापरल्या जाणाऱ्या वनस्पती त्या-त्या परिसरात उपलब्ध असतात; मात्र बऱ्याचशा वनस्पती वाढती लोकसंख्या, जंगलतोड आणि अशा कितीतरी कारणांमुळे नष्ट होत आहेत. अशा या वनस्पतींचा आरोग्य संतुलनासाठी वापर व्हावा यासाठी त्यांची आपल्या परसबागेत कमी जागेत, कमी पाण्यात लागवड करता येऊ शकते.
- डॉ. दिगंबर मोकाट

तमिळनाडू, केरळ राज्यांत परसबागेतून सहकारी पद्धतीवर आधारित औषधी आणि सुगंधी वनस्पतींची शेती केली जाते. अशा पद्धतीची "परसबाग शेती' आपल्याकडेही होऊ शकते. परसबागेमध्ये होऊ शकणाऱ्या काही औषधी आणि सुगंधी वनस्पतींची माहिती घेऊ या.

कोरफड - कुमारी, कुवारकांड या नावाने ही वनस्पती सर्वपरिचित आहे. घरगुती उपायांमध्ये डोळ्यांच्या विकारावर कोरफडीच्या रसाची पट्टी डोळ्यांवर ठेवतात. भाजल्यावर होणारी आग कमी करण्यासाठी याच्या रसाची पट्टी भाजलेल्या भागावर ठेवतात. खोकल्यावर - कोरफडीचा गर मधातून देतात. या वनस्पतीची लागवड फुटव्यापासून 60 ु 60 सें.मी. अंतराने गादीवाफ्यावर करावी.

गवती चहा - वातविकारात याचे तेल अंगास चोळल्याने ठणका कमी होतो. सर्दी-पडशावर गवती चहा, आले, तुळस व पुदिना यांचा काढा देतात. रेताड लालसर जमिनीत गवती चहा चांगला वाढतो. 90 सें.मी. अंतराने सऱ्या पाडून 60 सें.मी. अंतराने बियांपासून अथवा ठोंबापासून लागवड करावी.

गुळवेल - काविळीवर गुळवेलीचा रस मधात घालून देतात. जुलाब, पोटातील मुरडा, हगवण, कृमी या विकारात या वनस्पतीचा वापर करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, संधिवात, मधुमेहात या वनस्पतीच्या खोडाचा वापर करतात. लागवड वेलीच्या छाट कलमाद्वारे करावी. कुंपणाच्या बाजूने किंवा मोठ्या झाडांच्या शेजारी लागवड करता येते.

चित्रक - चित्रक अग्निसारखा गरम म्हणजेच अतिविषारी आहे. पोटात देताना त्यासोबत नागरमोथा, वावडिंग यासारखी थंड औषधे द्यावीत. खरूज व चामड्याचे रोग यांवर चित्रकमूळ दूध व मीठ याच्या मलमाने जुने रोग जातात. मूळव्याधीवर चित्रकाची साल, टाकणखार, हळद आणि गूळ समभाग घेऊन वाढून मोडावर लेप करावा. कोकणात सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात ही वनस्पती आढळते. परसबागेत लावताना छाट कलमाद्वारे किंवा रोपाद्वारे 2 ु 2 मीटर अंतराने 30 ु 30 ु 30 सें.मी.च्या खड्ड्यात परसबागेच्या कोपऱ्यात लागवड करावी.

वाळा - या गवतास शीतसुगंधी किंवा खस असे म्हटले जाते. मुळाचे चूर्ण थंड उत्तेजक आणि मूत्रल आहे. चूर्ण अंगाला चोळले तर थंडपणा येतो. वाळा सरबत, वाळा अत्तर आणि थंडाव्यासाठी पंखे तयार करण्यासाठी उपयोगी पडते. कोकण विभागात हे गवत चांगले वाढते. लागवड ठोंबापासून 2 ु 2 फूट अंतराने माहे जून-जुलै महिन्यांत सऱ्या पाडून एका रांगेत करावी.

शतावरी - शतावरीची मुळे औषधात वापरतात. मुळाची पावडर मूत्राशयाचे रोग, सफेद प्रदर आणि शुक्राणू वाढीसाठी उपयुक्त असते. शतावरी दूधवाढीसाठी अति उत्तम समजली जाते. तसेच ती मधुर, शीत, कडू, अग्निदीपक व बलकारक आहे. शतावरीची लागवड ओळीने 1 ु 1 मी. अंतराने सऱ्या पाडून करावी. लागवड बियांपासून रोपे करून किंवा कंदाने करता येते.

कोष्ठ - याचे चूर्ण गरम पाण्यात भिजवून डोक्‍यास लावावे. केस स्वच्छ होतात. खरूज, गजकर्ण यावर याचे चूर्ण तेलात मिसळून लावावे. कोष्ठ पावडर मधात दिल्यास ताप, खोकला, दमा यावर फायदा होतो.

ब्राह्मी - ब्राह्मी रस आणि त्याच्या दहापट तेल एकत्र करून सिद्ध केलेले तेल डोक्‍यास लावण्यासाठी श्रेष्ठ आहे. यामुळे मेंदू थंड राहतो. स्मृती वाढते व केसांची वाढ चांगली होते. पानाचे पोटीस कफ पातळ होण्याकरिता उपयुक्त आहे. फुटव्यापासून लागवड केली जाते. या वनस्पतीस पाणथळ जमीन चांगली मानवते.

माका - केस काळे होण्यासाठी आणि वाढविण्यासाठी ब्राह्मी, माक्‍याचा रस आणि तिळाचे तेल उकळून सिद्ध केलेले तेल रोज डोक्‍यास लावतात. काविळीवर - माक्‍याचा रस, मिरेपूड घालून देतात. भाजलेल्यावर माका व काळी तुळस यांच्या पाल्याचा रस काढून लावावा. कफ-वात कमी करण्यासाठी, कातडीच्या रोगावर, सुजेवर, रक्तप्रवाह या विकारावर या वनस्पतींचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. बियांपासून लागवड 45 ु 30 सें.मी. अंतराने गादी वाफ्यावर करावी.

सदाफुली - मूत्रविकार, हगवण थांबविणे, पांढऱ्यापेशी वाढविणे, जखम बरी करणे, मधुमेह, कर्करोग इत्यादी विकारांत ही वनस्पती वापरली जाते. कॅन्सरमध्ये यांच्या मुळांचा आणि पानांचा उपयोग करतात. मधुमेह, वाढलेले ब्लडप्रेशर व हृदयरोग यावर याची पाने रात्री पाण्यात भिजत ठेवावी व 12 तासांनी ते पाणी पितात. परसबागेत रोपापासून 45 ु 30 सें.मी. अंतराने लागवड करावी. लागवड जून-जुलै महिन्यांत करावी.

सर्पगंधा - 30 प्रकारचे रासायनिक घटक या वनस्पतीत आढळतात. रक्तदाब कमी करण्यासाठी सर्पगंधा फार प्रसिद्ध आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होतात. अभिवृद्धी बियांपासून, खोडापासून किंवा मुळांपासून करता येते. लागवड 30 ु 30 सें.मी. अंतरावर करावी.

अडुळसा - वॅसिसीन हे रासायनिक गुणद्रव्य या वनस्पतीत असते. त्यामुळे खोकला, घशाचे आजार, कफाचा विकार, दमा या रोगांवर रामबाण म्हणून समजले जाते. तसेच संधिवात, गुडघेदुखी यावरही ही वनस्पती वापरतात. कलमाद्वारे परसबागेच्या कुंपणासाठी लागवड करावी. कलमाद्वारे 1 ु 1 मी. अंतरावर लागवड पावसाळ्यामध्ये करावी.

तुळस - आपल्याकडे तुळशीच्या विविध प्रजाती आहेत. त्यामध्ये श्‍वेत तुळस, सब्जा, रानतुळस, तापमारी तुळस, मुत्री तुळस, माळी तुळस, अजगंधा तुळस यांचा समावेश होतो. कफाच्या तापावर - तुळशीचा रस देतात. उचकीवर तुळशीचा रस थोडा मध घालून देतात. पोटदुखीवर - तुळशीचा रस थोडा लिंबाचा रस घालून घेतात. दम्यावर - तुळशीचा रस खडीसाखरेची पूड किंवा मध घालून घेतात. कोरड्या खोकल्यातही तुळशीचा रस आल्याच्या रसातून घेतात. बियांद्वारे किंवा रोपांपासून लागवड 50 ु 30 सें.मी. अंतराने करावी.

निर्गुंडी - निर्गुंडीचा पाला ऊन करून सुजेवर बांधावा. शक्ती येण्यासाठी निर्गुंडीच्या मुळीचा दुधात काढा करून घेतात. वातव्याधीवर निर्गुंडीचा पाला पाण्यात टाकून उकडावा. त्याच्या वाफेवर मिठाची पुरचुंडी गरम करून शेक देतात. सर्दी-पडसे, सांधेदुखी यावर निर्गुंडीचा पाला उपयुक्त आहे. मुरगळण्यावर याच्या पाल्याचे आणि तांबट मातीने शेकतात आणि लेप देतात. या वनस्पतीची लागवड परसबागेच्या कुंपणाला करावी. खोडाच्या कलमाने 1 ु 1 मीटर अंतराने जून-जुलै महिन्यांत करावी.

वेखंड - भूक लागत नसल्यास - वेखंडाची पूड मधातून देतात. लघवी साफ होण्यासाठी - वेखंडाची पूड दूध-साखरेबरोबर द्यावी. बुद्धी वाढविण्यासाठी, तापावर आणि व्रण किंवा जखम भरून येण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. उत्तम निचरा होणारी जमीन या वनस्पतीस चांगली मानवते. 30 ु 30 सें.मी. अंतरावर कंदाने लागवड करावी.

मेंदी - या वनस्पतीची परसबागेच्या कुंपणासाठी लागवड करतात. या वनस्पतींची लागवड बियांद्वारे किंवा छाट कलमांद्वारे केली जाते. लागवड 30 ु 30 सें.मी. अंतराने पावसाळ्यात करावी. या वनस्पतीच्या सालीचा आणि पानांचा उपयोग काविळीवर केला जातो. तसेच साल वाटून जुनाट चामडी रोगावर देतात. संधिवातामध्ये मेंदीची पाने बारीक वाटून त्याचा लेप सांध्यावर लावतात.

जास्वंद - जास्वंदीची फुले आणि मूळ गर्भातील अडचणी, वीर्यातील व्याधी, पोटातील कृमी, स्त्री-पुरुष जननेंद्रियांची व्याधी यावर फार उपयुक्त आहे. तुपात तळलेल्या कळ्या स्त्रियांचा अधिक मासिक स्रावांवर नियंत्रण ठेवते. फुले बलवर्धक, बुद्धिवर्धक, रक्तस्तंभन करणारी आहे. जास्वंद जेलीचा केसांच्या संबंधित तक्रारीवर वापर केला जातो. लागवड छाट कलमाने 2 ु 2 मीटर अंतराने लागवड करावी.

पिंपळी - या वेलीची फळे आणि मुळ्या औषधासाठी वापरतात. पिंपळीचा अर्क उत्तेजक, वायुसारक, स्वास्थ्यकारी, शक्तिवर्धक, कामोत्तेजक, कृमिनाशक व गर्भाशय स्राव रोधक आहे. खोकला आणि दमा या विकारावर अतिशय गुणकारी आहे. चूर्ण मधात मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. या वनस्पतीची लागवड छाट कलमाद्वारे केली जाते. 30 सें.मी. लांबीचे छाट वापरून 30 ु 30 सें.मी. अंतरावर पावसाळ्याचे सुरवातीस लागवड करावी.

कडुनिंब - या वनस्पतींचे सर्व भाग औषधांमध्ये वापरले जातात. खोडाची साल कृमिनाशक आहे. कातडीच्या रोगावर पानांच्या रसाचा वापर करतात. दंतविकार, हिरड्यामधून पू येणे, वास येणे, श्‍वासाची दुर्गंधी या व्याधी बऱ्या करण्यासाठी या वनस्पतींचा वापर केला जातो. ही वनस्पती वृक्षवर्गीय असल्याने परसबागेत कुंपणाच्या बाजूने लागवड करावी. या वनस्पतीस पाणी खूप कमी लागते. त्यामुळे पावसाळ्यात निचरा होईल, असे पाहावे. लागवड 1 ु 1 ु 1 फुटाचे खड्डे करून रोपापासून 7 ु 7 मी. अंतरावर करावी.

आवळा - "क' जीवनसत्त्वाने परिपूर्ण असलेल्या या वनस्पतीच्या फळांचा उपयोग मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक औषधात केला जातो. ताप, कावीळ, आम्लपित्त, हगवण, मधुमेह या विकारांवर आवळा उपयुक्त आहे. आयुर्मान वाढविण्यासाठी या वनस्पतींची फळे खावीत. लागवड रोपापासून अथवा कलमाद्वारे होते. कांचन, बनारसी, एनए-7, एनए-10, कृष्णा या आवळ्याच्या जातींची लागवड 5 ु 5 मीटर अंतरावर 1 ु 1 ु 1 फूट आकाराचे खड्डे घेऊन करावी.

- 02358-282717
औषधी वनस्पती माहिती केंद्र, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी

जॅमचे प्रमाणीकरण

स्क्वॅश, नेक्‍टर सिरप या पदार्थांप्रमाणेच जॅम तयार करतानासुद्धा विविध घटक पदार्थ प्रमाणीकरणानुसार घ्यावे लागतात. जॅम एका फळाच्या गरापासून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फळांपासून मिक्‍स फ्रूट जॅम तयार करता येतो. फळांचा गर, साखर, पेक्‍टीन व आम्ल हे जॅमचे महत्त्वाचे घटक आहेत. घटक पदार्थ योग्य त्या प्रमाणात एकत्र करून घट्टपणा येईपर्यंत (68 अंश ब्रिक्‍स) येईपर्यंत शिजविले जातात. जॅम तयार करताना त्यातील घटकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावा.

जॅम तयार करतानासुद्धा गरातील विद्राव्य घटकांचे प्रमाण हॅण्ड रिफ्रक्‍टोमीटरच्या साह्याने व आम्लता अनुमापन पद्धतीने काढावी. समजा 100 किलो मिक्‍स फ्रूट जॅम तयार करावयाचा आहे म्हणजे जॅममध्ये शेवटी घटक पदार्थ खालीलप्रमाणे असतील.
फळांचा गर ः 45 टक्के म्हणजे 45 किलो
आम्लता ः 0.5 टक्का म्हणजे 0.5 किलो
पेक्‍टीन ः 0.5 टक्का म्हणजे 0.5 किलो
ब्रिक्‍स ः 68 अंश ब्रिक्‍स
सामू ः 3 ते 3.5
स्वाद ः 0.13 टक्के म्हणजे 130 मि.लि.
रंग ः 10 ग्रॅम (दहा मि.लि. ग्रॅम ); म्हणजेच 0.1 ग्रॅम/ किलो
उदाहरणार्थ ः
मिश्र फळांच्या गरामध्ये 12 टक्के एकूण विद्राव्य घटक व आम्लता 0.7 टक्के आहे. या गरापासून 100 किलो जॅम तयार करावयाचा आहे, तर लागणारे घटक पदार्थ खालीलप्रमाणे असावेत.
1) फळांचा गर : 45 टक्के म्हणजे 45 किलो गर
2) फळांच्या गरामधील एकूण विद्राव्य घटक (घनपदार्थ)
100 किलो गरामध्ये 12 किलो एकूण विद्राव्य घटक असतात, त्यामुळे 45 किलो गरामध्ये 5.4 किलो विद्राव्य घटक असतील.
3) फळाच्या गरामधील आम्लता :
100 किलो गरामध्ये 0.7 टक्का आम्लता असते. त्यामुळे 45 किलो गरामध्ये 0.315 किलो आम्लता असेल.
4) लागणारी साखर ः 100 किलो जॅममध्ये 68 अंश ब्रिक्‍स (एकूण विद्राव्य घटक) असले पाहिजेत.
साखर = 68 किलो (घनपदार्थ किंवा विद्राव्य घटक)
=68 - (लागणारे आम्ल + लागणारे पेक्‍टीन + फळाच्या गरातील विद्राव्य घटक)
= 68 - (0.5 + 0.5 + 5.4)
= 61.6 किलो साखर
5) लागणारे ऍसिड = (लागणारे ऍसिड - गरामधील आम्लता)
= 0.5 - 0.315
= 185 ग्रॅम सायट्रिक ऍसिड
6) लागणारे पेक्‍टीन = 0.5 टक्का म्हणजे 0.5 किलो
7) पेक्‍टीनचे द्रावण तयार करणे : 0.5 किलो पेक्‍टीन 2.5 किलो साखरेमध्ये चांगले मिसळावे. त्यामध्ये 9.5 लिटर पाणी मिसळून मिश्रण चांगले ढवळावे. थोडे गरम करावे. साखर चूर्ण विरघळल्यानंतर मलमलच्या कापडाने द्रावण गाळावे, द्रावणाचे वजन करावे. द्रावणाचे वजन 12.5 किलो असावे.
9) सायट्रिक ऍसिडचे द्रावण तयार करणे.
185 ग्रॅम सायट्रिक ऍसिड 185 मि.लि. पाण्यात चांगले मिसळावे. म्हणजे 370 ग्रॅम द्रावण तयार होते.
100 किलो जॅम तयार करण्यासाठी लागणारे घटक पदार्थ
1) फळांचा गर ः 45 टक्के
2) साखर ः 61.6 किलो (पैकी 2.5 किलो पेक्‍टीन द्रावण करण्यास व उर्वरित साखर)
म्हणजेच 61.6 - 2.5 = 59.1 किलो साखर
2) पेक्‍टीन ः 0.5 किलो (12.5 किलो पेक्‍टीन द्रावण)
4) ऍसिड (सायट्रिक ऍसिड) 0.15 कि. (0.370 कि. आम्ल द्रावण)
5) स्वाद ः 130 मि.ली. (0.13 टक्का)
6) रंग ः 10 ग्रॅम (दहा मि.लि. ग्रॅम टक्के) म्हणजेच 0.1 ग्रॅम/ किलो
7) परिरक्षक ः 40 पीपीएम सल्फर डाय ऑक्‍साइड किंवा 200 पीपीएम बेन्झॉरक ऍसिड

एफपीओ प्रमाणीकरणानुसार जॅममधील घटक
1) फळाचा गर ः 40 ते 50 टक्के
2) एकूण विद्राव्य घटक ः 68 टक्के (25 ते 40 टक्के इन्व्हर्ट शुगर)
3) आम्लता ः 0.5 ते 1.0 टक्का
4) सामू ः 3 ते 3.5
5) परिरक्षक ः 40 पीपीएम सल्फर डाय ऑक्‍साईड किंवा 200 पीपीएम बेन्झॉइक ऍसिड.

'स्क्वॅश, सिरप व नेक्‍टर'चे प्रमाणीकरण महत्त्वाचे...

डॉ. गीता रावराणे
विविध प्रकारच्या फळांपासून स्क्वॅश, सिरप व नेक्‍टर तयार करता येते. "फ्रूट प्रॉडक्‍ट ऑर्डर'अंतर्गत या प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

प्रमाणीकरणानुसार पदार्थ तयार होण्यासाठी ज्या फळांपासून पदार्थ तयार करावयाचा आहे, त्यातील विद्राव्य घटकांचे प्रमाण व आम्लता माहीत असणे गरजेचे आहे. "हॅण्ड रिफ्रॅक्‍टोमीटर' या यंत्राच्या साहाय्याने एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण कळते.

आम्लता काढण्यासाठीची पद्धत
1) रासायनिक द्रावण
1) सोडिअम हायड्रॉक्‍साईड = 0.1 प्रसामान्यतेचे सोडिअम हायड्रॉक्‍साईड तयार करावे. यासाठी चार ग्रॅम सोडिअम हायड्रॉक्‍साईड उर्ध्वपातित पाण्यात मिसळून त्याने अंतिम द्रावण एक लिटर तयार करावे.
2) फिनॉलप्थेलिन दर्शक
कृती ः 1) पाच ग्रॅम फळांचा रस / गर शंकूपात्रात घेऊन त्यात 10 ते 15 मि.लि. उर्ध्वपातित पाणी मिसळून द्रावण तयार करावे आणि गाळून घ्यावे.
2) गाळलेल्या द्रावणामध्ये दोन ते तीन थेंब फिनॉलप्थेलिनदर्शक टाकून द्रावण चांगले एकजीव करावे.
3) मोजनळीमध्ये 0.1 प्रसामान्यतेचे सोडिअम हायड्रॉक्‍साईडचे द्रावण भरून, द्रावणाच्या साहाय्याने शंकूपात्रातील द्रावणाचा रंग फिकट गुलाबी येईपर्यंत अनुमापन करावे. खालील सूत्रानुसार रसाची / गराची आम्लता काढावी.
अनुमापन (मि.लि.) ु सोडिअम हायड्रॉक्‍साईड प्रसामान्यता (0.1)ु * मि.लि. इक्‍युव्हलंट ऑफ ऍसिड
रसाचे / गराचे वजन
संदर्भासाठी : * ाश.िं - ाळश्रळशर्िींर्ळींरश्रशपीं ुीं. ेष रलळव.
ाश.िं ुीं. ेष लळीींळल रलळव = 0.06404
ाश.िं ुीं. ेष रलशींळल रलळव = 0.06005
स्क्वॅश, सिरप व नेक्‍टर इ. पदार्थ कोणत्याही फळापासून तयार करताना फळाच्या रसामधील / गरामधील एकूण विद्राव्य घटक व आम्लता काढावी. तयार करायच्या पेयामध्ये आम्लता व साखरेचे प्रमाण संतुलित करताना रसामधील आम्लता व घनपदार्थ (ब्रिक्‍स) वजा करावेत.

स्क्वॅश तयार करण्यासाठी घटक पदार्थांचे प्रमाण कसे काढावे याचे उदाहरण ः
उदाहरणार्थ - समजा, एक किलो फळांचा रस घेऊन त्यात एकूण विद्राव्य घटक 15 डिग्री ब्रिक्‍स व आम्लता 0.3 आहे, असे हॅण्ड रिफ्रॅक्‍टोमीटर व आम्लता काढावयाच्या पद्धतीने समजले. यापासून स्क्वॅश तयार करण्यासाठी 25 टक्के रस, 45 टक्के विद्राव्य घटक व 0.75 टक्के आम्लता या प्रमाणीकरणानुसार घटक पदार्थांचे प्रमाण असे काढावे.
श्र फळांचा रस - एक किलो (म्हणजे 1000 ग्रॅम)
श्र एकूण स्क्वॅश =
स्क्वॅशमध्ये फळंचा रस - 25 टक्के पाहिजे
25 ग्रॅम रसापासून 100 ग्रॅम स्क्वॅश तयार होईल,त्यामुळे
1000 ग्रॅम रसापासून 4 किलो स्क्वॅश तयार होईल.

श्र साखर
अ) 100 ग्रॅम स्क्वॅशसाठी 45 ग्रॅम साखर लागते. त्यामुळे
चार किलो (4000 ग्रॅम) स्क्वॅशसाठी 1.800 किलो साखर
लागेल.
ब) 100 ग्रॅम रसामध्ये 15 ग्रॅम एकूण विद्राव्य घटक असतात. त्यामुळे 1000 ग्रॅम फळाच्या रसामध्ये 150 ग्रॅम घन विद्राव्य घटक मिळतात.

क) साखरेचे प्रमाण
स्क्वॅशसाठी लागणारी साखर - रसामधील विद्राव्य घटक
= 1.800 - 150
= 1.650 किलो साखर

4) सायट्रिक ऍसिड
अ) 100 ग्रॅम स्क्वॅशसाठी 0.75 ग्रॅम सायट्रिक ऍसिड लागते. त्यामुळे चार किलो स्क्वॅशसाठी 30 ग्रॅम सायट्रिक ऍसिड लागते.
ब) 100 ग्रॅम रसामध्ये 0.3 टक्के आम्लता असते. त्यामुळे
एक किलो रसामध्ये 3 ग्रॅम आम्लता राहील.
क) लागणारे ऍसिड =
25 ग्रॅम सायट्रिक ऍसिड - 3 ग्रॅम रसामधील आम्लता
= 25 - 3 = 22 ग्रॅम सायट्रिक ऍसिड.

5) लागणारे पाणी
रस (1 किलो) + साखर (1.650 किलो) +
सायट्रिक ऍसिड (22 ग्रॅम) = एकूण घटक = 2.87 किलो व उर्वरित भाग पाणी
पाणी = एकूण स्क्वॅश - चार किलो
एकूण घटक - 2.87 किलो
पाणी = (4 - 2.87) = 1.13 लिटर
कोणत्याही फळांच्या रसापासून सरबत, स्क्वॅश व सिरप तयार करताना बनवावयाच्या पेयामधील आम्लता व साखरेचे प्रमाण संतुलित करताना रसामधील आम्लता व घनपदार्थ (एकूण विद्राव्य घटक) वजा करावे.
घटक पदार्थ :
रस = एक किलो
साखर = 1.650 किलो
सायट्रिक ऍसिड = 22 ग्रॅम
पाणी = 1.13 लिटर

एकूण स्क्वॅश = चार किलो
वरीलप्रमाणे घटक पदार्थांचे प्रमाण काढावे. तयार झालेल्या पदार्थामध्ये प्रमाणीकरणानुसार घटक पदार्थ आहेत याची खातरजमा करावी. पुन्हा एकूण विद्राव्य घटक (उदा. 45 टक्के व आम्लता 0.75 टक्के) आणि आम्लता पाहावी. त्यानंतर पदार्थाचे वजन घ्यावे तसेच पदार्थामध्ये परिरक्षक घालावे.

वनशेतीत बिब्बा लागवडीचे महत्त्व

डॉ. दिगंबर मोकाट, गणेश भुवड
बिब्बा या वृक्ष प्रजातीचा उपयोग रंगनिर्मिती, रेझीन, औषधी, साबण उद्योग, तणनाशके, आगरोधक, प्लॅस्टिक, वंगण इ. अनेक उद्योगांसाठी होतो. मात्र जंगलामध्ये आढळणारी ही प्रजाती सध्या दुर्मिळ होत चालली आहे. या प्रजातीच्या फळांचा उपयोग अनेक उद्योगधंद्यात होत असल्याने पडीक जमिनी, माळराने, शासकीय जमिनी, नदीकाठ, बागबगीचे इ. ठिकाणी लागवड करणे आवश्‍यक आहे.

बिब्बा या वृक्षाला हिंदीत "भिलावा', मराठी "बिबू', "बिबा', "बिबवा' संस्कृतमध्ये "भल्लातक' असे म्हटले जाते. शास्त्रीय भाषेत "सेंमीकार्पस ऍनाकार्डीयम' या नावाने ओळखले जाते. आंब्याच्या "अनाकार्डेशी' या कुळातील ही पर्णझडी प्रजाती उष्ण कटिबंधातील पर्णझडी जंगलामध्ये आढळते. हिमालयाच्या पायथ्यापासून ते मध्य भारतातील बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश इ. राज्यांतही मोठ्या प्रमाणात आढळते.

वनस्पती शास्त्र ः
हा मध्यम उंचीचा वृक्ष असून पाच ते सात मीटरपर्यंत वाढतो. याची पाने साधी, शेंड्याला गोलाकार, पृष्ठभाग, गुळगुळीत, पाठीमागून खडकाळ असतात. पाने काहीशी हृदयाकृती, पानांचा कडा काहीशा सरळ रेषेत ओल्या असतात. पानांत मुख्य शिरेवर 15 शिरा असतात. फुले हिरवट- पांढरट, छोटीशी देठ असतात. फळे एक इंच आकाराची असतात. काळ्या रंगाची बी यास "नट' असे म्हणतात. काजू प्रमाणे बिब्ब्याचे बोंड येते, ते पिकल्यानंतर पिवळे होते. हे भाजून खाल्ले जाते. बिब्ब्याला जुलै-ऑगस्टमध्ये फुले येण्यास सुरवात होते आणि परिपक्व फळे जानेवारी-मार्च या कालावधीत मिळतात.

रोपवाटिका आणि लागवड ः
बिब्ब्यांची परिपक्व फळे झाडाखालून जमा करावीत. फळांचा आकार मोठा असतो. रंगाने गर्द काळी फळे रोपनिर्मितीसाठी वापरावीत. सुप्तावस्था मोडण्यासाठी बी 10 ते 15 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवून दोन दिवस कोमट पाण्यात ठेवावे. त्यानंतर ओल्या गोणपाटात बांधून ठेवावे. या पद्धतीने संस्कार केल्यानंतर बी पिशवीत पेरावे. 5 ु 8 इंच आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या पिशवीमध्ये उच्च दर्जाची रोपे तयार करता येतात. रोपे दोन ते चार फुटांची झाल्यानंतर ती 2 ु 2 ु 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन त्यात लावावी. लागवडीपूर्वी खड्डे भरतेवेळी मातीत सुपर फॉस्फेट, सेंद्रिय खत, शेणखत, हिरवळीचे खत आवश्‍यकतेनुसार टाकावे. लागवड मध्यम, हलक्‍या, निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. आवश्‍यकतेनुसार पाणी, खत, तण व्यवस्थापन करावे. पाच-सात वर्षांत झाडे फळे येण्यास सुरवात होते. सद्यःस्थितीत फळे 50 ते 60 रु. प्रति किलो दराने विकली जातात. लागवडीसाठी राष्ट्रीय औषधी अभियान, रोजगार हमी योजनांमधून अनुदान प्राप्त होते. यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव कृषी विभागाकडे देणे आवश्‍यक आहे.

बहुपयोग बिब्ब्याचे ः
बिब्बा फळांपासून काळा रंग मिळतो. तो कपड्यावर घट्ट बसतो. धोब्याकडे कपड्यांवर नावे टाकण्यासाठी आणि गोंदणासाठी हा रंग वापरला जातो. म्हणून यास इंग्रजीत "मार्किंग नट' म्हणून संबोधले जाते. पूर्वी कपड्यांना रंग देण्यासाठी वापर केला जात असे. सद्यःस्थितीत "वॉर्निश' "पेंट' बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये बिब्बा तेलाचा वापर केला जातो. बिब्बा फळात जे रसायन असते, त्याचा वापर वॉटर प्रूफिंग साहित्य, वेगवेगळ्या रंगनिर्मितीसाठी केला जातो. निवडणुकीत बोटावर मार्किंग करण्यात येणारी शाईही बऱ्याचदा बिब्ब्यापासून बनविली जाते. बिब्बा फळांत मोठ्या प्रमाणात "फिलॉल' रसायन असते. त्याचा वापर वॉटर प्रूफिंग साहित्य, रंगनिर्मितीसाठी केला जातो. अर्धवट वाळलेले तेल लाकूड पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी लाकडांना लावले जाते. गाड्यांच्या ऍक्‍सलला वंगणासाठी तेलाचा वापर होतो. या वृक्षांचा उपयोग लाखेचे किडे वाढविण्यासाठी केला जातो. टॅन, टॅनिन काढण्यासाठी फळांचा वापर केला जातो. आयुर्वेदासारख्या औषधी पद्धतीत अनेक औषधी बिब्बा फळांपासून बनविल्या जातात. बिब्बा वापरण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण करणे आवश्‍यक असते. फळांचा वापर अस्थमा, कफ, मेदूविकार, फीट, सांधेदुखी, घशाचे विकार, कुष्ठरोग, मूळव्याध इ. विकारात केला जातो. परंपरागत औषधी पद्धतीत मुळे, बिया, पाने वापरली जातात.

पूरक धंद्यासाठी पळस आहे उपयुक्त

पळस या वृक्षाचे अनेक उपयोग आहेत. ग्रामीण भागातील लोकांसाठी पूरक धंदे देणाऱ्या या झाडाची लागवड म्हणावी तशी केली जात नाही. या वृक्षाचा उपयोग द्रोण, पत्रावळी, बिडीनिर्मितीसाठी, फुलांचा उपयोग रंग काढण्यासाठी, मुळांचा वापर धागे मिळविण्यासाठी, तसेच खोडाचा उपयोग लाकूड म्हणून, तसेच या वृक्षापासून डिंक, लाख इ. उपयुक्त पदार्थ मिळत असल्याने या वृक्षांची लागवड पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात करणे आवश्‍यक आहे.
ग्रामीण भागातील लोकांना बचत गटामार्फत पत्रावळीनिर्मिती, रंग उद्योग, लाख उद्योग, दोरनिर्मिती उद्योग, औषधीनिर्मिती उद्योग या वृक्षामुळे सुरू करणे शक्‍य आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतः या झाडाची लागवड होणे आवश्‍यक आहे. "ल्यूटीया' या जातीची फुले केशरी लाल ऐवजी पिवळी असतात. ही झाडे बागेमध्ये मुद्दामहून लावली जातात. "पळस वेल' नावाची दुसरी प्रजाती आहे यास शास्त्रीय भाषेत "ब्युटीया सुपरबा' म्हणतात. याच्या फुलापासून पिवळा रंग मिळतो.

अढळ : "फाबेशिया' कुळातील या वृक्षाला शास्त्रीय भाषेत "ब्युटीया मोनोस्पर्मा' या नावाने ओळखले जाते. हा मध्यम उंचीचा पर्णझडी वृक्ष भारतातील उष्ण व समशीतोष्ण जंगलामध्ये मुख्य वृक्ष म्हणून विंध्य, सह्याद्री, हिमालय पायथ्याचे जंगल इ. ठिकाणी आढळतो. ब्रह्मदेश, श्रीलंकेतही हा वृक्ष आढळतो. फुले लाल, केशरी रंगाची आणि पाने गळून गेलेल्या झाडावर येतात. त्यामुळे जंगलात जाळ निघाल्याचा भास उन्हाळ्यात होतो म्हणून या वृक्षास इंग्रजीत "फ्लेमऑफ फॉरेस्ट' या नावाने ओळखले जाते. या वृक्षाचा डिंकाचा व्यापार "बेंगाल किनो' या नावाने चालतो म्हणून इंग्रजीत दुसरे नाव "बेंगाल किनो' असे आहे. हिंदीत ढाक, पलस, तेसू आणि संस्कृतमध्ये "पलाश' म्हणून पळसाच्या झाडाला ओळखले जाते. पळसाचे झाड 10-15 मीटरपर्यंत वाढते. पाने हिवाळ्यात गळून पडतात आणि वसंतात नवी येतात. ती येण्यापूर्वीच फुले येतात. फुले केशरी लाल गुच्छाने असतात. फुले पक्ष्यांच्या आकाराची दिसतात म्हणून यास "किंशुक' असेही म्हणता. शेंगांमध्ये एकच चपटे बी असते बीचा रंग काळसर बदामी असतो.
उपयोगी भाग ः पाने, फुले, बिया, मुळे आणि खोड.
रासायनिक घटक ः या वनस्पतीच्या भागामध्ये "बट्रीन', आयसोबट्रीन, कोरीओपोसीन, सल्फुरेन इ. ग्लायकोसाईड्‌स असतात.
उपयोग ः पानांचा उपयोग पुरातन काळापासून द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी होत आला आहे. पळसाची मुळे गरम पाण्यात उकळून सालीपासून धागे काढतात. त्यांचे दोरखंडे बनविली जातात. बियांपासून पिवळे तेल मिळते. तेही औषधात वापरले जाते. फुलापासून केशरी लाल रंग मिळतो त्याचा उपयोग कपड्यांना रंग देण्यासाठी होतो. खोडाचा उपयोग खोकी-फळ्या करण्याकरिता केला जातो. पळसाच्या खोडावर लाखेचे किडे चांगले वाढतात. खोडामधून डिंक मिळतो. तो लालसर रंगाचा असतो. डिंक आणि बियांचे चूर्ण पोटातील किडे पाडण्याकरिता केला जातो. महिलांमधील मासिक विकारात डिंकाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो म्हणून यास "कमरकस गोंद' असेही म्हणतात. गर्भाशयाचे टॉनिक म्हणूनही वापर केला जातो. मूत्राशयाचे विकार, किडनीचे विकार इ. मध्ये फुलांचा वापर केला जातो.

रोपवाटिका आणि लागवड ः
फळसाला फेब्रुवारी-मार्च महिन्यांत फुले येऊन बियाणे एप्रिल-जूनपर्यंत परिपक्व होते. जमा केलेले बियाणे एक वर्षापर्यंत उगवते. लागवडीपूर्वी नाण्यासारखे असलेले चपटे बियाणे दोन-तीन तास कोमट पाण्यात ठेवावे, यामुळे 73 ते 90 टक्के रुजवा मिळतो. बियाणे पेरल्यानंतर उगविण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो. चार महिन्यांच्या कालावधीत रोपे शेडनेटमध्ये केल्यास एक ते दोन फुटांची होतात. लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन वाढीसाठी अनुकूल असते. सुरवातीला वाढीचा वेग कमी असतो. खत, पाणी, तणनियंत्रण, आग व गुरे यापासून संरक्षण केल्यास झाडे चांगली वाढतात. लागवड 5 ु 5 मीटर अंतराने करावी. बागबगीचे, रस्ते, कार्यालये, गायराने, ग्रामपंचायतीच्या रिकाम्या जागा इ. ठिकाणी या वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे शक्‍य आहे.

...असे तयार करा पनीर

पनीर तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्यासाठी नवनवीन यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. परंतु या महागड्या यंत्रांशिवाय सुद्धा घरच्या घरी पनीर तयार करता येऊ शकते. पनीरसाठी म्हशीचे दूध उत्तम असते. कारण त्यात स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधाच्या तुलनेने अधिक असते. पनीरपासून अनेक उपपदार्थ उदा. पालक पनीर, मटार पनीर, आलू पनीर, पनीर टिक्का इ. तयार करता येऊ शकतात.
- डॉ. मोहम्मद रजिउद्दीन, डॉ. नरेंद्र खोडे

दूध हा अतिशय शीघ्रपणे खराब होणारा पदार्थ आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे दूध लवकरात लवकर बाजारात जाणे, त्यासोबतच ग्राहकांपर्यंत पोचणे आवश्‍यक असते. यामुळेच दुग्धोत्पादकाची दूधदराबाबत क्रयशक्ती शिथिल होते आणि बहुतांश वेळी मिळेल त्या दरात दूध विकणे क्रमप्राप्त ठरते. जेथे शीतकरण यंत्राची सुविधा आहे, सरकारी तत्त्वाखाली दुग्ध संस्थेमार्फत प्रामाणिकपणे राबत असलेली शाश्‍वत बाजारपेठ आहे, तेथे हा प्रश्‍न नाही; परंतु बहुतांश महाराष्ट्रात अशाश्‍वत बाजारभाव, ग्रामस्तरावर शीतकरण सुविधेचा अभाव, वाहन व्यवस्थेचा अभाव हे दुग्ध व्यवसायाकडे अनाकर्षक करणारे ठळक मुद्दे आहेत. उत्पादित झालेल्या दुधाचा टिकविण्याचा काळ वाढविण्यासाठी दूध उत्पादकांनी दुधापासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ उदा. पनीर, खवा, चीज, तूप इत्यादी तयार करणे या आवश्‍यक आहे. दुधापासून घरच्या घरी पनीर कसे करता येईल याबाबत माहिती करून घेऊ.

पनीर म्हणजे काय?
दुधाचे आम्ल साकळीत (रलळव लेरर्सीश्ररींशव) करून त्यातील जलतत्त्वाचे प्रमाण दाब देऊन कमी केलेला पदार्थ म्हणजे पनीर होय. पनीर हे सामान्य दुधापेक्षा जास्त काळ टिकून राहते म्हणून बाजारात पनीरला भरपूर मागणी आहे. शाकाहारी व्यक्तींना प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून पनीर देशात अतिशय प्रसिद्ध आहे. पनीरपासून अनेक उपपदार्थ तयार करता येऊ शकतात. उदाहरणार्थ पालक पनीर, मटार पनीर, आलू पनीर, पनीर टिक्का इ. पनीर तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्यासाठी नवनवीन यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत; परंतु पशुपालक या महागड्या यंत्राशिवाय सुद्धा घरच्या घरी पनीर तयार करू शकतो. पनीरसाठी म्हशीचे दूध उत्तम असते. कारण त्यात स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधाच्या तुलनेने अधिक असते.

लाकडी पेटी तयार करणे (पनीर दाब पेटी) -
यासाठी सर्वसाधारणपणे 45 सें.मी. लांब, 25 सें.मी. रुंद आणि 25 सें.मी उंच या आकाराची लाकडी पेटी तयार करावी, या पेटीसाठी वापरलेल्या लाकडी फळीला चारही बाजूने बारीक बारीक छिद्रे असावेत. पनीर तयार करताना दुधातील पाणी (व्हे) निघण्यासाठी ही छिद्रे आवश्‍यक असतात.

- डॉ. रजिउद्दिन, 7588062558
- डॉ. खोडे, 9421727911
(लेखक पशुजन्य पदार्थ प्रौद्योगिकी विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि.लातूर येथे कार्यरत आहेत.)

पनीर बनविण्याची पद्धत -
एका स्वच्छ पातेल्यामध्ये स्वच्छ, निर्भेळ आणि ताजे सहा ते आठ लिटर विशेषतः म्हशीचे दूध घ्यावे. हे दूध 82 अंश से. तापमानावर पाच ते आठ मिनिटे तापवावे. त्यानंतर दुधाचे तापमान 70 अंश से.पर्यंत कमी करावे. या तापमानावर दुधात एक किंवा दोन टक्के तीव्रता असलेले सायट्रिक आम्ल बारीक धारेने सोडावे. सायट्रिक आम्लाऐवजी लिंबाचासुद्धा उपयोग करता येतो. सायट्रिक आम्लामुळे दूध लगेच नासते. अशा फाटलेल्या किंवा नासलेल्या दुधातून बाहेर येणारे हिरवट निळसर पाणी जेव्हा दिसू लागेल, त्याक्षणी सायट्रिक आम्ल टाकणे बंद करावे. नंतर दुसऱ्या एका स्वच्छ पातेल्याच्या तोंडावर तलम किंवा मखमलीचे कापड बांधावे. त्यावर पहिल्या पातेल्यातील दूध ओतावे. कापडावर छन्ना (पाणी वगळता उरलेले घनपदार्थ) जमा होईल. वेगळा केलेला छन्ना लगेच लाकडी पेटीत (पनीर दाब पेटी) कापडासहित ठेवावा. त्यानंतर लाकडी पेटी वर हळूहळू 25 ते 30 किलोग्रॅम वजन 15 ते 20 मिनिटे ठेवावे. त्यानंतर तयार झालेले पनीर बाहेर काढून पाच ते आठ अंश से. तापमान असलेल्या थंड पाण्यात तीन ते चार तास ठेवावे. थंड पाण्यातून काढून लाकडी फळीवर पाणी निघण्यासाठी थोडा वेळ ठेवावे. म्हशीच्या दुधापासून (सरासरी स्निग्धांश सहा टक्के) दुधाच्या 20 ते 22 टक्के पनीर तयार होते. गाईच्या दुधापासून (सरासरी स्निग्धांश 3.5 ते 4 टक्के) सरासरी 16 ते 18 टक्के पनीर तयार होते, परंतु गाईच्या दुधापासून तयार केलेले पनीर मऊ असते, त्यामुळे त्या पनीरला बाजारात म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या पनीरच्या तुलनेत कमी मागणी असते.

नारळप्रक्रियेतून लघु उद्योगांची उभारणी शक्‍य

डॉ. दिलीप नागवेकर
नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होत असल्याने त्याला "कल्पवृक्ष' म्हणतात. या कल्पवृक्षाच्या विविध भागांवर प्रक्रिया केल्यावर खोबरे, डेसिकेटेड खोबरे, नारळ मलई, दूध, ऍक्‍टिव्हेटेड कार्बन अशी व्यापारी मूल्य असणारी उत्पादने तयार करता येतात. या उत्पादनातून निश्‍चित लघु उद्योगाची उभारणी करता येणे शक्‍य आहे.

कोकणातील महत्त्वाचे बागायती पीक म्हणजे नारळ. केवळ शहाळे आणि नारळ उत्पादन ही संकल्पना मागे पडत असून, नारळाची विविध उत्पादने तयार करण्यावर भर दिला जात आहे.

1) खोबरे ः नारळ 11 ते 12 महिन्यांचे पक्व झाल्यानंतर ते खोबरे तयार करण्यासाठी वापरतात. ताज्या खोबऱ्यात 50 ते 55 टक्के तसेच वाळलेल्या खोबऱ्यामध्ये पाच ते सहा टक्के पाणी असते. नारळ फोडून वाट्या उन्हामध्ये सात ते आठ दिवस वाळवाव्यात. खोबरे वाळविण्यासाठी सौर वाळवणी यंत्राचा वापर करता येतो.
2) गोटा खोबरे ः गोटा खोबरे 12 महिने पक्वतेच्या नारळापासून तयार करता येते. छपराखाली बांबूचे मचाण करून त्यावर 8 ते 12 महिने नारळ साठवितात. या कालावधीत सर्व पाणी आटते, असे नारळ हलविले असता गुडगुड आवाज येतो. नारळ फोडून करवंटीपासून खोबरे वेगळे केले जाते. अशा प्रकारे गोटा खोबरे तयार होते.
3) डेसिकेटेड खोबरे ः डेसिकेटेड कोकोनट बनविण्यासाठी परिपक्व नारळ सोलून, त्याचे दोन तुकडे करावे. खोबरे करवंटीपासून वेगळे करून, खोबऱ्यावर असलेली तपकिरी रंगाची साल वेगळी केली जाते. अशा पद्धतीने जवळपास 12 टक्के नको असलेला भाग काढून टाकला जातो. खोबऱ्याचे बारीक तुकडे करून स्वच्छ पाण्याने ते धुतले जातात. यामुळे खोबऱ्याला चिकटलेला नको असलेला भाग काढला जातो. हे तुकडे ठराविक तापमानाला उकळत्या पाण्यामध्ये ठेवतात. नंतर या तुकड्यांचा किस करून वाळवणी यंत्रामध्ये वाळविले जातात. वाळविलेला किस जशाच्या तसा प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये हवाबंद केला जातो किंवा त्याची भुकटी करून हवाबंद केला जातो. मिठाई, इतर खाद्य कारखाने, चॉकलेट, कॅन्डीमध्ये याचा वापर केला जातो.
4) नारळाचे दूध आणि दुधाचे पदार्थ ः पक्व नारळाच्या खोबऱ्यापासून दूध तयार करतात. डेअरी क्रीमला पर्याय म्हणून वापर होतो. गाईच्या दुधाच्या तुलनेत यात स्निग्धांश भरपूर असतात, परंतु प्रोटिन, साखर कमी असते.
5) नारळ मलई ः नारळाच्या दुधापासून घट्ट मलई तयार केली जाते. वेगवेगळ्या करी, गोड पदार्थ, पुडिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो, तसेच बेकरीचे पदार्थ तयार करण्यासाठीही याचा वापर केला जातो.
6) पक्व नारळातील पाणी ः या पाण्यात दोन टक्के साखर, 5.4 टक्के एकूण विद्राव्य घटक, 0.5 टक्का खनिजे, 0.1 टक्का प्रोटिन आणि 0.1 टक्का स्निग्धांश असतात. या पाण्यापासून व्हिनेगार तयार केले जाते.
7) शहाळ्याचे पाणी ः शहाळ्याच्या पाण्यात सर्वांत जास्त पालाश आणि खनिजे असतात. सात महिन्यांच्या शहाळ्याच्या पाण्यात साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. "चौघाट ऑरेंज ड्‌वार्फ' ही नारळाची जात शहाळ्याच्या पाण्यासाठी उत्कृष्ट आहे. अनेक आजारांत शहाळ्याचे पाणी रुग्णाला दिले जाते. विशेषतः हगवण, जुलाब, उलटी व पोटाचे विकार यांत मोठ्या प्रमाणात ते वापरले जाते.
8) स्नोबॉल टेंडर नट ः यामध्ये शहाळे नारळाचे सोडण, करवंटी आणि खोबऱ्यावरील लाल साल काढून टाकली जाते. आठ महिने वयाच्या नारळापासून स्नोबॉल टेंडर नट तयार केले जातात.
9) खोबरेल तेल ः सुक्‍या खोबऱ्यापासून 65 ते 70 टक्के (सरासरी 60.5 टक्के) खोबरेल तेल मिळते. भारतामध्ये तेलाचा उपयोग खाण्यासाठी - 40 टक्के, स्वच्छतागृह साफ करणारे पदार्थ/ सौंदर्यप्रसाधने - 46 टक्के, साबण तयार करणे - 14 टक्के एवढा केला जातो.
10) खोबऱ्याची पेंड ः सुक्‍या खोबऱ्यापासून तेल काढल्यानंतर सुमारे 35 ते 36 टक्के चोथा शिल्लक राहतो. त्याचा जनावरांचे खाद्य म्हणून वापर करता येतो, परंतु प्रत्येक जनावरास दिवसाला दोन ते अडीच किलोपेक्षा जास्त पेंड देऊ नये, त्यामुळे दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढते; तसेच कोंबडी खाद्यासाठीही याचा उपयोग होतो.
11) करवंटी ः देशात अंदाजे 1.7 दशलक्ष टन करवंटी दर वर्षी उपलब्ध होते. करवंटीपासून कोळसा, ऍक्‍टिव्हेटेड कार्बन, करवंटी भुकटी, भांडी, शोभेच्या वस्तू, आइस्क्रीम कप, बटण अशी विविध उत्पादने तयार केली जातात.
12) करवंटी कोळसा ः करवंटीपासून 30 टक्के म्हणजेच 1000 करवंट्यांपासून 30 किलो, तर 30,000 करवंट्यांपासून एक टन कोळसा मिळतो.
13) ऍक्‍टिव्हेटेड कार्बन ः करवंटी कोळशापासून ऍक्‍टिव्हेटेड कार्बन तयार केला जातो. तीन टन करवंटी कोळशापासून अंदाजे एक टन ऍक्‍टिव्हेटेड कार्बन मिळतो. याचा उपयोग वनस्पती तेल शुद्ध आणि साफ करण्यासाठी, पाण्याचे शुद्धीकरण, द्रावकाचा उतारा, सोन्याचा उतारा, विषारी वायूपासून संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस मास्कमध्ये केला जातो.
14) करवंटीची भुकटी ः स्वच्छ करवंटी दळून त्याची भुकटी तयार करतात. तिचा उपयोग लाकडाच्या भुश्‍शाऐवजी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, बकेलाइट कारखान्यात, फिलर म्हणून मच्छर अगरबत्ती आणि इतर अगरबत्ती, फिनॉलीन पावडरमध्ये आणि प्लायवूड लॅमिनेटेड बोर्डात वापरली जाते.
ः 02352-235077
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी
ः 02358-280233, 280338
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी

ज्वारीपासून बनवा रुचकर पदार्थ...

ज्वारीची भाकरी खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, भूक वाढते, ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी केला जातो. विशेषतः पचनसंस्थेतील वायुदोष, ऍसिडिटी शमविण्यासाठी, तसेच शौचास साफ आणि व्यवस्थित होण्यासाठी ज्वारीचे पदार्थ आपल्या आहारात असलेच पाहिजेत.

हुरडा -
रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत (सॉफ्ट डफ) असतात, त्या वेळेला भाजलेल्या (होरपळलेल्या) अवस्थेत अतिशय चवदार, मऊ आणि गोडसर लागतात, त्यास ज्वारीचा हुरडा असे म्हणतात. हिरव्या दाण्यांचा हुरडा अतिशय चांगला लागतो, कारण त्या वेळेला त्या दाण्यांमध्ये मुक्त अमिनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे असे दाणे गोवऱ्यांच्या उष्णतेवरती भाजले असता दाण्यांतील विविध रासायनिक घटकांची विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होऊन "कॅरमलायझेशन'मुळे दाण्यांस एक प्रकारची स्वादिष्ट चव प्राप्त होते. हुरड्यामध्ये लिंबू, मीठ, साखर, तिखट, मसाला यांसारखे पदार्थ वापरून त्याची चव द्विगुणित करता येते. खास हुरड्यासाठी गोडसर, रसाळ आणि भरपूर दाणे असणाऱ्या फुले उत्तरा या वाणाची शिफारस संशोधन केंद्रामार्फत करण्यात आलेली आहे. सध्या ज्वारीच्या हुरड्याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे, त्यामुळे हुरडा भाजण्याची शास्त्रीय पद्धत विकसित करणे, त्याचा साठवण कालावधी वाढविण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. त्यामुळे हुरड्याची उपलब्धता वर्षभर होईल.

बिस्कीट आणि कुकीज -
बिस्कीट आणि कुकीजची निर्मिती प्रामुख्याने गव्हाच्या मैद्यापासून केली जाते; परंतु काही प्रयोगाअंती असे दिसून आले आहे, की मैद्यामध्ये साधारणतः 20 टक्‍क्‍यांपर्यंत आपण ज्वारीचे पीठ वापरून बिस्किटे व कुकीज चांगल्या प्रतीची करू शकतो. लो कॅलरीज बिस्कीट किंवा कुकीज बनविण्यासाठी साखरविरहित, क्रीमविरहित, प्रथिनयुक्त असे घटक पदार्थ वापरता येतील, तसेच त्याची पौष्टिक मूल्ये वाढविण्यासाठी नाचणी, सोयाबीन, ज्वारीच्या माल्ट पिठाचा वापर करता येईल.

स्टार्च, ग्लुकोज, फुक्‍टोज -
काळ्या ज्वारीपासून मोतीकरणाऐवजी स्टार्चसारखे मूल्यवर्धित उपपदार्थ तयार करण्याबाबतही संशोधन झाले असून, आतापर्यंतच्या प्रयोगावरून असे दिसून आले आहे, की काळ्या ज्वारीपासून स्टार्च मिळविताना ज्वारीवर 0.2 टक्के सल्फ्युरिक आम्ल किंवा सोडिअम हायड्रॉक्‍साईडची प्रक्रिया करावी. एक किलो काळ्या ज्वारीपासून साधारणपणे 640 ग्रॅम स्टार्च तयार करण्याची प्रक्रिया प्रयोगशाळेत प्रमाणित करण्यात आलेली आहे; तसेच नवीन पद्धतीचा वापर करून ज्वारीपासून ग्लुकोज पावडर, डेकस्ट्रीन, फुक्‍टोज इत्यादी पदार्थ तयार करता येतात.

लाह्या -
ज्वारीपासून लाह्या बनविण्यासाठी प्रामुख्याने त्या ज्वारीच्या दाण्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे. कारण अशा प्रकारचे दाणे अति उच्च तापमानात एकदम गरम केले असता दाण्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते दाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे दाण्यातील स्टार्च फुलला जाऊन त्याचा बस्ट होतो व पुढे त्याची लाही तयार होते. जेवढ्या प्रमाणात स्टार्च दाण्यामध्ये अधिक असेल, त्या प्रमाणात लाहीचे आकारमान होते, त्यासाठी उच्च तापमानाची आवश्‍यकता असते. ज्वारीच्या लाह्या सध्या "लो कॅलरी हाय फायबर स्नॅक फूड' म्हणून लोकप्रिय आहेत. आपल्याकडे विकसित केलेल्या ज्वारीच्या जातीमध्ये "आर.पी.ओ.एस.व्ही.-3' या जातीपासून 98 टक्के लाह्या मिळाल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे; तसेच या लाह्या अधिक चवदार होण्यासाठी विविध मसाल्याचे पदार्थ वापरून चविष्ट लाह्या तयार करणे, तसेच या लाह्या अधिक काळ चांगल्या कुरकुरीत चवदार राहण्यासाठी व्हॅक्‍यूम पॅकेजिंग तंत्राचा वापर करण्याचे प्रयोग चालू आहेत. काही भागांमध्ये ज्वारीच्या लाह्यांचे पीठ करून ते ताकाबरोबर खाण्याची प्रथा आहे. मक्‍याच्या लाह्यांप्रमाणेच ज्वारीच्या लाह्या करून वर्षभर विकण्याचा व्यवसाय करणे शक्‍य होऊ शकते. त्यासाठी खास ज्वारीच्या लाह्यांसाठी जातीची उपलब्धता होणे आवश्‍यक आहे.

02426-243253
ज्वारी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

आरोग्यदायी ज्वारी...
ज्वारीची भाकरी गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक, पांढऱ्या रंगाची आहे. या भाकरीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक, शर्करा आणि खनिज द्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत अनेक भौतिक, रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबीवरती अवलंबून असते. आपल्याकडे प्रामुख्याने ज्वारीचा उपयोग ज्वारीची भाकरी म्हणूनच मोठ्या प्रमाणात करतात; तथापि काही वाणांचा उपयोग इतर अनेक खाद्यपदार्थांसाठी केला जातो. आहारदृष्ट्या ज्वारीच्या दाण्यांत ओलावा (आर्द्रता) आठ ते दहा टक्के, प्रथिने 9.4 ते 10.4 टक्के, तंतुमय घटक 1.2 ते 1.6 टक्के, खनिज द्रव्ये 1.0 ते 1.6 टक्के, उष्मांक 349 किलो कॅलरीज, कॅल्शिअम 29 मिलिग्रॅम, किरोटीन (प्रो-व्हिटॅमिन ए) 47, थायमिन 37 मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅममध्ये आढळतात. ज्वारीमध्ये लायसीन व मिथिलोअमाईन ही आवश्‍यक अमिनो ऍसिड्‌स मर्यादित प्रमाणात आढळतात. पांढऱ्या ज्वारीमध्ये टॅनिन नावाचा अँटी न्यूट्रिशनल (अपायकारी) घटक आढळत नाही, तो लालसर ज्वारीत भरपूर प्रमाणात असतो.

Friday, February 4, 2011

रबर लागवड करायची आहे, हवामान कसे हवे, चीक कसा गोळा करावा?

रबराची वाढ उष्ण व दमट हवामानात चांगली होते. रबर वृक्षांच्या जलद वाढीसाठी सरासरी 2000 ते 3000 मि.मी. पाऊस आवश्‍यक असतो. भरपूर सूर्यप्रकाश व 75 ते 95 टक्के आर्द्रता असलेल्या परिसरात वाढ चांगली होते. 21 ते 35 अंश सेल्सिअस तापमान मानवते. चांगला निचरा होणारी, आम्लधर्मीय, साधारण उताराची जमीन लागते. कोकणात या बाबींची अनुकूलता असल्याने तेथे रबर लागवड जास्त प्रमाणात होते. 5 ु 5 मीटर अंतरावर लागवड करावी. 75 ु 75 ु 75 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. दोन आठवडे खड्डे उघडे ठेवावेत. लागवड जून महिन्यात पहिला पाऊस पडल्याबरोबर करावी. झाडापासून चीक काढण्याच्या क्रियेला "टॅपिंग' असे म्हणतात. जमिनीपासून 125 सें.मी. अंतरावर जेव्हा खोडाची गोलाई 55 सें.मी. होते, त्या वेळी ही झाडे टॅपिंग करण्यास योग्य असल्याचे समजावे. कलमांना जमिनीपासून 125 सें.मी. उंचीवर 30 अंशांचा कोन करून उतरती खाच पाडून मर्यादित प्रमाणात क्रमशः साल काढली जाते. साल काढलेल्या ठिकाणी खाचेच्या खाली नारळाची करवंटी अथवा प्लॅस्टिक कप तारेने झाडाला बांधला जातो व त्यात चीक गोळा करण्यात येतो. रबर झाडाचे एक दिवसाआड टॅपिंग करण्यात येते. सूर्योदयापूर्वी टॅपिंग करावे लागते. साल काढल्यानंतर दोन ते तीन तास चीक गळून करवंटीत जमा होतो.

- 02358 - 282717
वनशास्त्र महाविद्यालय, दापोली

काऊ पॅट पीट (सी.पी.पी.) कल्चर कसे तयार करतात?

मंडळ कृषी अधिकारी एम. बी. कंबार यांनी दिलेली माहिती अशी आहे. बायोडायनामिक खत तयार करण्यासाठी सी.पी.पी. हे कल्चर लागते. सी.पी.पी. तयार करण्यासाठी बी.डी. प्रिपरेशन 502 ते 507 यांची गरज असते. हे प्रिपरेशन तयार करण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पती कुजवाव्या लागतात. या प्रिपरेशनातून विस्तारित कल्चर तयार केले जाते, यालाच सी.पी.पी. म्हणतात. सी.पी.पी. आपल्याला घरच्या घरी वर्षभरात केव्हाही तयार करता येते. सी.पी.पी. तयार करण्यासाठी लागणारे साहित्य - 1) 60 किलो गावरान दुभत्या गाईचे शेण, 2) 200 ग्रॅम अंड्यांचे पांढरे कवच, 3) 500 ग्रॅम बेसॉल्ट खडकाचा चुरा किंवा बोअरवेलची माती, 4) 200 ग्रॅम गुळाचे पाणी, 5) बी.डी. प्रिपरेशन 502 ते 506 मिश्रणाचे दोन संच आणि बी.डी. प्रिपरेशन 507 चे 20 मि.लि. द्रावण तयार करण्याची पद्धत ः जमिनीत 3 (लांबी) ु 2 (रुंदी) ु 1 (खोली) फूट आकाराचे विटांचे कुंड तयार करून जमिनीच्या वर अर्धा फूट व जमिनीच्या आत अर्धा फूट उंचीचे बांधकाम सर्व बाजूंनी शेणामातीने लिंपून घ्यावे. गावरान दुभत्या गाईचे 60 किलो शेण आणि 200 ग्रॅम गुळाचे पाणी यांचे मिश्रण दहा ते 15 मिनिटे एकजीव करून घ्यावे.

शेणामध्ये 200 ग्रॅम अंड्यांच्या कवचाची पावडर आणि 500 ग्रॅम बेसॉल्ट दगडाचा चुरा किंवा बोअरवेलची माती मिसळावी. सर्व मिश्रण खड्ड्यात टाकून शेणाच्या थरावर दोन ओळींत बोटाने छिद्र करून बी.डी. प्रिपरेशन 502 ते 506 चे दोन संच मिसळावेत आणि बी.डी. प्रिपरेशन 507 (20 मि.लि.) अर्धा लिटर पाण्यात 15 मिनिटे चांगले घोळून ते शेणावर शिंपडावे. नंतर खड्ड्याला ओल्या बारदानाने झाकावे. खड्ड्यामधील मिश्रणाला प्रत्येक आठ दिवसांनी पलटी घ्यावी. 45 ते 60 दिवसांत एका कुंडातून 30 किलो दाणेदार सी.पी.पी. कल्चर तयार होते.

- एम. बी. कंबार, 7588689953

धिंगरी अळिंबी उत्पादनाविषयी माहिती व प्रशिक्षण कोठे मिळेल?

धिंगरी अळिंबीची लागवड शेतातील पिकांच्या मळणीनंतर उरलेल्या काडांवर व पालापाचोळ्यावर करता येते. त्यासाठी भात, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे व पाने, मक्‍याची कणसे, भुईमुगाच्या शेंगांची टरफले यांचा वापर करावा. लागवडीसाठी चालू हंगामातीलच काड वापरावे. ते पाण्याने भिजलेले नसावे. जुने तसेच भिजलेले काड वापरल्याने अळिंबीवर सूक्ष्म जिवाणूंची वाढ होऊन बुरशी लागते, त्यामुळे कमी उत्पादन मिळते. लागवडीच्या आदल्या दिवशी दोन ते तीन सें.मी. लांबीचे काडाचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात आठ ते दहा तास भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी काडाचे पोते पाण्यातून काढून काडातील जास्तीत जास्त पाणी काढावे, त्यानंतर भिजलेल्या पोत्याला 80 अंश से. तापमानाच्या वाफेवर एक तास ठेवून भिजवलेल्या काडाचे निर्जंतुकीकरण करावे. ही प्रक्रिया केल्यानंतर काड पोत्यातून बाहेर काढून त्यात असणाऱ्या पाण्याचा निचरा करावा. अळिंबी तयार करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या पाच टक्के फॉर्मेलीनमध्ये बुडवून निर्जंतुक कराव्यात. पिशवीत काड भरताना प्रथम आठ ते दहा सें.मी. जाडीचा थर द्यावा व त्यावर अळिंबीचे स्पॉन पसरावे. स्पॉनचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या दोन टक्के घ्यावे. पिशवीत काड व स्पॉन यांचे चार ते पाच थर भरताना तळहाताने दाबून भरावे. भरलेल्या पिशवीचे तोंड दोऱ्याने घट्ट बांधून पिशवीच्या पृष्ठभागावर सुई किंवा टाचणीने छिद्रे पाडावीत. पिशव्या निवाऱ्याच्या ठिकाणी ठेवाव्यात. 10 ते 15 दिवसांत पिशवीच्या आतील पृष्ठभागावर बुरशीची पांढरट वाढ झालेली दिसते, तेव्हा त्यावरील पिशवी काढून टाकावी. काडावर बुरशीची वाढ झाल्याने त्यास ढेपेचा आकार येतो, यास "बेड' म्हणतात. या बेडवर दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी. अळिंबीची चांगली वाढ होण्यासाठी खेळती हवा व भरपूर प्रकाश यांची गरज असते. त्यासाठी बेड ज्या खोलीत ठेवले असतील, त्या खोलीचे तापमान नियंत्रित करावे. तीन ते चार दिवसांत बेडच्या सभोवताली अंकुर दिसू लागतात व त्यापुढील तीन-चार दिवसांत अळिंबीची वाढ होऊन ती काढण्यासाठी तयार होते. प्रशिक्षणाच्या माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
- 020 - 25537033
अळिंबी प्रकल्प, कृषी महाविद्यालय, पुणे

चिंचेची लागवड कशी करावी?

मध्यम ते हलकी, डोंगर उताराची, मध्यम खोल जमीन चिंच लागवडीसाठी योग्य असते. चिंचेचे झाड विविध प्रकारच्या हवामानात चांगले वाढते; मात्र उष्ण व समशीतोष्ण हवामान उत्तम असते. अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून अथवा भेट कलम, शेंडा कलमे करून केली जाते. चिंचेची व्यापारी तत्त्वावर लागवड करताना कलमे वापरून करावीत. लागवडीसाठी 10 ु 10 मीटर अंतर ठेवावे. 1 ु 1 ु 1 मी. आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. खड्डा भरताना त्यामध्ये तळाला पालापाचोळा टाकून 15 ते 20 किलो चांगले कुजलेले शेणखत अधिक पोयटा माती व दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 100 ग्रॅम फॉलिडॉल किंवा कार्बारिल पावडर यांच्या मिश्रणाने भरावा. पूर्ण वाढलेल्या झाडास (पाच वर्षांनंतर) 500 किलो शेणखत, 500ः250ः250 ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड द्यावे. प्रतिष्ठान, नंबर 263, अकोला स्मृती, अजंठा गोडचिंच या लागवडीयोग्य जाती आहेत.

- 02426 - 243247
कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

अंजीर लागवड कधी व कशी करतात, लागवडीयोग्य जाती कोणत्या?

अंजीर फळपिकासाठी हलकी ते मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी, परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते. कोरडे व उष्ण हवामान या पिकास मानवते. हवेमध्ये जास्त आर्द्रता वाढल्यास अंजीर पानांवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो. फळधारणेच्या वेळी पाऊस, थंडी हानिकारक ठरते. अभिवृद्धी पक्व झालेल्या फांद्यांच्या छाट कलमापासून किंवा गुटी कलमाद्वारे करतात. त्यासाठी जून महिन्यामध्ये गुटी कलमे बांधावीत. सदरची कलमे दीड ते दोन महिन्यांनी मुळ्या फुटल्यानंतर काढणीस तयार होतात. अशी कलमे झाडापासून वेगळी करून प्लॅस्टिक पिशवीमध्ये लावावीत.

लागवडीपूर्वी जमिनीची उभी आडवी चांगली नांगरट करून घ्यावी. त्यानंतर कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन तणे, मागील पिकाचे अवशेष वेचून जाळून टाकावेत. हलक्‍या जमिनीत अंजीर फळझाडाची लागवड 4.5 ु 3 मीटर अंतरावर करावी, तर मध्यम ते भारी जमिनीत 5 ु 5 मीटर अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी मे महिन्यामध्ये 60 ु 60 ु 60 सें.मी. आकाराचे खड्डे खोदणे आवश्‍यक असते. म्हणजे खड्डे उन्हात चांगले तापतात. खड्डे भरण्यासाठी खड्ड्यांच्या तळाला पालापाचोळा, चांगली माती व शेणखत अथवा कंपोस्ट खत दोन्ही 1ः1 प्रमाणात घेऊन त्यामध्ये पाच ग्रॅम फोरेट आणि एक ते दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकून मिश्रण करून खड्डा भरून घ्यावा. वाळवीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक खड्ड्यात दहा टक्के कार्बारिल भुकटी किंवा फॉलिडॉल पावडर 100 ते 150 ग्रॅम मिसळावी. जून-जुलै महिन्यांमध्ये दोन-तीन पाऊस झाल्यानंतर खड्ड्यामध्ये पिशवीमधील रोपांची लागवड करावी. "पूना फिग' ही जात लागवडीसाठी चांगली आहे.

शिफारशीत जाती -
1) पूना अंजीर - या जातीच्या अंजिराच्या फळाचा रंग गडद किरमिजी लाल रंगाचा असतो. फळाचे सरासरी वजन 30 ते 60 ग्रॅमपर्यंत असते. फळामध्ये 18 ते 20 ब्रिक्‍सपर्यंत साखर असते. पाच वर्षांच्या झाडापासून सरासरी 25 ते 30 किलो फळाचे उत्पादन मिळते.
2) दिनकर - ही जात पूना अंजीर या जातीमधून निवड पद्धतीने निवडलेली असून, या जातीची फळे किरमिजी लाल रंगाची असतात. फळाचे सरासरी वजन 40 ते 70 ग्रॅमपर्यंत असते.

- 02426 - 243861
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

गांडूळ खताची निर्मिती कशी करावी? सविस्तर मार्गदर्शन हवे.

गांडूळ खताचे उत्पादन चार पद्धतीने उदा. : कुंडी पद्धत, टाकी पद्धत, खड्डा पद्धत आणि बिछाना पद्धतीने करतात. शेतावर मोठ्या प्रमाणावर गांडूळ खत तयार करण्यास खड्डा पद्धत अधिक सोयीची आहे.
गांडूळ खत तयार करण्याची पद्धत ः मोठ्या प्रमाणावर गांडूळ खत तयार करण्यासाठी पुढील पद्धतींचा वापर केला जातो :
1) खड्डा पद्धत (3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल)
2) सिमेंट हौद पद्धत (3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल)
3) बिछाना पद्धत (3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल)
वरील पद्धतींपैकी आपल्या सोयीनुसार एक पद्धत निवडावी. निवड केलेल्या पद्धतीसाठी लागणारी खड्ड्याची रचना ही गुरांच्या गोठ्याजवळ उंच जागेवर, योग्य निचरा असणाऱ्या ठिकाणी, मांडवाच्या किंवा झोपडीच्या सावलीत किंवा पत्र्याच्या शेडमध्ये करून घ्यावी. खड्डा भरताना सर्वच पद्धतींमध्ये थरांची रचना सर्वसाधारणपणे एकाच प्रकारे करावी. सुरवातीला तळाशी 15 सें.मी. जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा (उदा. : गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन, तूर, सूर्यफुलाचा भुस्सा, पालापाचोळा, चाऱ्याचा उरलेला भाग इ.) थर द्यावा. त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व चाळलेली माती 3ः1 या प्रमाणात मिसळून त्याचा 15 सें.मी.चा थर द्यावा. त्यावर ताज्या शेणाचा किंवा पाण्यामध्ये शेण कालवून त्याची रबडी करून दहा सें.मी.चा तिसरा थर द्यावा. शेवटी बिछान्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन घालावे. हा बिछाना पाण्याने ओला करावा. वातावरणानुसार व आवश्‍यकतेप्रमाणे पाणी द्यावे व खतामध्ये 50 टक्के ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. रचलेल्या थरांतील उष्णता कमी झाल्यावर एक ते दोन आठवड्यांनी वरील सेंद्रिय पदार्थांचा थर बाजूला सारून कमीत कमी एक हजार प्रौढ गांडुळे सोडावी. गांडुळांची संख्या कमी असेल, तर खत तयार होण्यास अधिक काळ लागतो, पण सर्वसाधारणपणे गांडुळांची संख्या दहा हजार झाली, की दोन महिन्यांत उत्तम असे एक टन गांडूळ खत तयार होते. गांडूळ खताचा रंग काळसर तपकिरी असतो. खत तयार झाल्यावर पाणी बंद करावे. वरचा थर कोरडा झाला, की पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे व त्याचा बाहेर सूर्यप्रकाशात ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकूच्या आकाराचा ढीग करावा. उन्हामुळे सर्व गांडुळे तीन-चार तासांनंतर तळाशी जाऊन बसतील. नंतर वरचा खताचा भाग हलक्‍या हाताने अलग करून घ्यावा. ज्यामध्ये कुजलेले गांडूळ खत, तसेच गांडुळांची अंडी असतील.
खाली राहिलेली गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात सोडावीत.
ः 02452 - 229000
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे, तांत्रिक मार्गदर्शन कोठे मिळेल?

कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याविषयीचे शास्त्रोक्‍त ज्ञान, तसेच त्यातील तांत्रिक गोष्टींची माहिती असणे आवश्‍यक आहे. साधारणपणे कुक्कुटपालन हे अंडी उत्पादनासाठी व मांसासाठी (ब्रॉयलर) करता येते. अंड्यासाठी कुक्कुटपालन करायचे असल्यास विविध जातींच्या कोंबड्या पाळता येतात. जसे- गावठी कोंबड्या, व्हाइट लेगहॉर्न, ऱ्होड आयलॅंड रेड इत्यादी.
अंड्यावरील कोंबड्यांचे वयोगटानुसार व्यवस्थापन करताना एक ते सहा आठवड्यांपर्यंत लहान पिल्लांची निगा राखणे, 6-20 आठवड्यांपर्यंत शरीरवाढीसाठी आणि 21 आठवड्यांपासून पुढे पक्ष्यांचा अंडी उत्पादनाचा काळ असतो. अशा पद्धतीने अंड्यावरील कोंबड्यांचे व्यवस्थापन करावे. कोंबड्यांना खाद्य व्यवस्थापन करताना वयोगटानुसार कोंबड्यांना चीक मॅश, ग्रोअर मॅश व लेअर मॅश द्यावे. कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी व सुव्यवस्थित व्यवस्थापनासाठी प्रत्येक पक्ष्याला वयानुसार साधारणपणे 1.5 ते 2.0 चौ. फूट जागा असावी. शहरी व ग्रामीण भागात कोंबडीच्या मांसासाठी (ब्रॉयलर कोंबड्यांसाठी) मागणी वाढत आहे. मांसासाठी कुक्कुटपालन करणे सोपे व फायदेशीर ठरते.
साधारणपणे पिल्ले जन्मल्यानंतर आठ आठवड्यांत विक्रीयोग्य होतात. पक्ष्यांची वाढ भराभर होत असल्याने असे पक्षी मांसासाठी वाढविणे किफायतशीर ठरते. कोंबडीच्या मांसासाठी विविध प्रकारच्या जातींचे पालन करता येते; परंतु भराभर वाढणाऱ्या व जास्त वजन देणाऱ्या जाती निवडाव्यात. मांसासाठी कोंबडीपालन करण्यासाठी व व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी शास्त्रोक्त व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, वेळच्या वेळी लसीकरण व बाजारपेठ महत्त्वाची आहे. साधारणपणे एका कोंबडीस एक चौ. फूट जागा पुरेशी होते.
कोंबडी फार्मची आखणी पूर्व-पश्‍चिम असावी. हवेशीर व आवाजापासून दूर असावी. कोंबड्यांना बसण्यासाठी खाली लाकडी भुस्सा किंवा शेंगांची टरफले यांचा पाच-दहा सें.मी.चा थर द्यावा. जेणेकरून जमिनीचा उबदारपणा टिकेल व कोंबड्यांची विष्ठा त्यात कालवली जाईल. कोंबडीघरात ऊब टिकण्यासाठी लाइटची व्यवस्था करावी. साधारणपणे दोन-तीन वॉट उष्मा प्रत्येक पक्ष्याला मिळावी, या दृष्टीने व्यवस्था करावी. कुक्कुटपालनासंबंधी तांत्रिक मार्गदर्शनासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा :
ः 022 - 24131180, 24137030, विस्तार क्र. 136
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई

केळीवर प्रक्रिया करून कोणकोणते पदार्थ तयार करता येतात?

दीपक फराटे, मौजे कसबे डिग्रज, जि. सांगली
के ळीवर प्रक्रिया केल्याने मूल्यवर्धन होऊन चांगला फायदा होतो. केळीपासून बनविता येणाऱ्या विविध पदार्थांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील काढणीपश्‍चात तंत्रज्ञान विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे :
पीठ ः केळीचे पीठ तयार करण्यासाठी कच्ची केळी वापरली जातात. एक किलो पीठ तयार करण्यासाठी साधारणपणे साडेतीन किलो गर लागतो. यासाठी प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन, साल काढून त्याच्या चकत्या किंवा बारीक तुकडे करून सुकवतात. सुकविण्यासाठी सूर्याच्या उष्णतेचा किंवा वाळवणी यंत्राचा वापर करतात. केळीच्या चकत्या वाळवून त्याच्यातील पाण्याचे प्रमाण आठ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आणले जाते. नंतर या चकत्यांपासून दळणी यंत्राचा वापर करून पीठ तयार करतात. हे पीठ जर काळे पडत असेल तर पोटॅशिअम मेटाबायसल्फाईटच्या 0.05 ते 0.06 टक्का तीव्रतेच्या द्रावणात 30 ते 45 मिनिटे केळ्याच्या चकत्या बुडवून वाळवतात व नंतर पीठ तयार करतात. तयार झालेले पीठ प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरून कोरड्या व थंड जागी साठवितात.
भुकटी ः यासाठी पूर्ण पिकलेली केळी लागतात. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या साह्याने लगदा करून घ्यावा. स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर किंवा फोम मॅट ड्रायरच्या साह्याने केळीच्या गराच्या लगद्याची भुकटी करतात. तयार झालेल्या केळीच्या भुकटीला विशिष्ट गंध व चव असल्याने बाजारपेठेत वेगवेगळे पदार्थ (उदा. आइस्क्रीम) बनविण्यासाठी मोठी मागणी आहे. तयार झालेली भुकटी निर्जंतुक हवाबंद डब्यांत साठवून कोरड्या व थंड जागी साठवून ठेवावी.
चिप्स ः केळीचे चिप्स तयार करण्यासाठी हिरवी कच्ची केळी निवडावीत. ती स्वच्छ पाण्याने धुवावीत. त्याची साल काढून चिप्स (चकत्या) बनविण्याच्या यंत्राच्या (किसणी) साह्याने तीन मि.मी. जाडीच्या गोल चकत्या कराव्यात. या चकत्या 0.06 टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईटच्या द्रावणात दहा मिनिटे भिजवल्यानंतर वनस्पती तुपात तळाव्यात. तळलेल्या चिप्सवर दोन टक्के मीठ टाकून ते चिप्सला व्यवस्थित लावावे. चिप्स दीर्घकाळ टिकविण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांत व्यवस्थित साठवाव्यात. दुसऱ्या पद्धतीने चिप्स बनविताना 7.5 टक्के मिठाचे द्रावण तयार करून त्यात 0.05 टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट टाकावे. हे द्रावण व्यवस्थित उकळून, कोमट करून त्यात वरील पद्धतीने तयार केलेल्या चिप्स 30 मिनिटे बुडवाव्यात. नंतर द्रावणातून काढून वनस्पती तुपात तळून वरील पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशव्यांत साठवावे.
प्युरी ः पूर्ण पिकलेली केळी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन, साल काढून, पल्पर यंत्राच्या साह्याने लगदा तयार करून घ्यावा. हा लगदा निर्जंतुक करून निर्जंतुक डब्यात हवाबंद करावा. ही तयार झालेली प्युरी लहान मुलांना खाऊ देण्यासाठी, आइस्क्रीमला चव आणण्यासाठी, मिल्कशेक तयार करण्यासाठी किंवा बेकरी उद्योगामध्ये वापरतात.
वेफर्स ः चांगल्या प्रतीचे वेफर्स तयार करण्याकरिता पूर्ण वाढ झालेली, परिपक्व, कच्ची केळी निवडावी. केळी स्वच्छ पाण्याने धुऊन, साल काढून यंत्राच्या साह्याने साधारणपणे तीन ते पाच मि.मी. जाडीच्या चकत्या कराव्यात. या चकत्या 0.1 टक्का सायट्रिक आम्ल किंवा 0.05 टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईटच्या द्रावणात 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवाव्यात. यामुळे चकत्या काळसर न पडता पांढऱ्याशुभ्र राहतात. नंतर चकत्या उकळत्या पाण्यात तीन ते चार मिनिटे बुडवून, थंड करून प्रति किलो चकत्यांस चार ग्रॅम याप्रमाणे गंधकाची धुरी द्यावी. तयार झालेल्या चकत्या उन्हात किंवा वाळवणी यंत्रात सुकवाव्यात. जर चकत्या वाळवणी यंत्राच्या साह्याने सुकवायच्या असतील, तर तापमान 60 अंश से.पेक्षा जास्त नसावे. तयार झालेले वेफर्स प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून, कोरड्या व थंड जागी साठवावे. आवश्‍यकतेनुसार ते तेलात किंवा तुपात तळून, मीठ किंवा मसाले लावून खाण्यासाठी वापरावे.
ः 02426 - 243247
प्रा. व्ही. पी. कड, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

बागेत असावी क्‍लेरोडेन्ड्रॉनची वेल

नाजूक खोडाच्या, सुंदर आकर्षक पाने व फुले असणाऱ्या वेली व लता लावूनही बाग सुशोभित करता येते. अनेकदा तारेचे कुंपण झाकण्याकरिता ओबड-धोबड भिंतीवर वाढविण्याकरिता किंवा उंच भिंत तयार करण्याकरिता वेलींचा वापर करण्यात येतो. या वेलींमुळे नको असलेला भाग दडवणे व सुशोभीकरण असा दुहेरी फायदा होतो. क्‍लेरोडेन्ड्रॉन ही अशीच एक शोभिवंत फुले व पाने असणारी वनस्पती आहे.

क्‍लेरोडेन्ड्रॉन ही सर्वसामान्यतः बुटकी किंवा मध्यम प्रमाणात उंच वाढणारी वनस्पती आहे. वेलीला भरपूर फांद्या फुटतात, त्यामुळे अल्पावधीतच भिंत किंवा कुंपण झाकून टाकण्यासाठी ही वेल वापरावी. क्‍लेरोडेन्ड्रॉनची पाने गडद, काळपट-हिरव्या रंगाची, रुंद, साधारण अंडाकृती व चमकणारी असतात. वेलींवर पानेही भरपूर असतात. क्‍लेरोडेन्ड्रॉनची फुले गुच्छामध्ये येतात. फुले गडद केशरी - लाल रंगाची असतात. वेलीला हिवाळ्यात भरपूर फुले येतात.

वेलीची वारंवार छाटणी करून नवीन फुटीला चालना दिल्यास भरपूर फुलांनी वेल आकर्षक दिसेल. क्‍लेरोडेन्ड्रॉनची वेल निमसावलीत लावावी. याची अभिवृद्धी गुटी कलम किंवा मुळ्यांभोवती येणाऱ्या फुटव्यांद्वारे करता येते. असे फुटवे अलग करून कुंडीमध्ये किंवा जमिनीत लावावेत. क्‍लेरोडेन्ड्रॉनला सुरवातीला आधाराची आवश्‍यकता असते. कुंडीतील रोप हवे तेवढे उंच वाढताच त्याचा शेंडा छाटावा. कुंडी अगदी लहान न घेता किमान 30 सें.मी. व्यासाची 30-40 सें.मी. उंच घ्यावी. सुरवातीला काठीचा आधार देऊन वेल वाढवावी, ही कडक खोडाची वेल असल्याने एकदा खोड भक्कम वाढल्यावर आधार देण्याची गरज नसते.

छाटणी करून वेलीचा आकार आटोपशीर राखावा, वेल जेव्हा फुलांनी डवरते, त्या वेळी कुंडी दिवाणखान्यात ठेवावी. क्‍लेरोडेन्ड्रॉनची फुले पाच, गोलाकार, गडद केशरी, लाल रंगाच्या पाकळ्यांची असतात. फुलांतील पुंकेसर लांब असतात व फुलाच्या आकर्षकतेत भर टाकतात. फुलांच्या कळ्या व निदलपुंजदेखील गुच्छाची आकर्षकता वाढवतात. किंबहुना, फुलाच्या निदलपुंजाचा वापर ड्राय-फ्लॉवर ऍरेंजमेंट करताही होऊ शकतो. टेरेस गार्डनमध्ये भिंतीवर वाढविण्याकरिता क्‍लेरोडेन्ड्रॉन ही एक उत्कृष्ट वेल आहे. हिच्या शोभिवंत पाने व फुलांमुळे ती सहज बागेची शोभा वाढवते.

झाडा-फुलांनी नटलेली गच्चीवरील बाग

भरत मालुंजकर, जळगाव
कवी प्रभाकर महाजन हे जळगावातील एक पर्यावरणवादी व्यक्तिमत्त्व. बालगीतं, बडबड गीतं, निसर्गपर कवितांमधून ते निसर्गावर अपार प्रेम व्यक्त करीत असतात. काव्यातून त्यांनी ग्रामीण जीवनशैलीचा आलेख रसिकांपुढे मांडलेला आहे. या निसर्ग प्रेमातून त्यांनी घरच्या गच्चीवर लहानशी फुलबाग फुलविली आहे.

श्री. महाजन यांनी गच्चीमधील उपलब्ध जागेत कुंड्यांमध्ये विविध प्रकारचे गुलाब, शेवंती, जाई-जुई, जास्वंद, कन्हेर, निशिगंध, ब्रह्मकमळ, मोगरा, क्रोटॉन, तेरडा, जरबेरा, चांदणी ही फुलझाडे लावली आहेत. दररोज काही वेळ ते बागेत रमलेले असतात. फुलझाडे चांगल्या पद्धतीने फुलण्यासाठी वेळेवर पाणी देणे, अनावश्‍यक पानं, फांद्या काढून टाकणे, गरजेनुसार खते देणे, मातीची मशागत करतात. चहा पावडर, नारळाच्या शेंड्या, ओला कचरा कुंड्यांमध्येच ते जिरवितात. त्यामुळे सेंद्रिय खत चांगल्याप्रकारे तयार होते.


फुलबागेबरोबरच त्यांनी लहानशी रोपवाटिका उभारलेली आहे. या रोपवाटिकेत चिंच, आंबा, निंब, करवंद, सीताफळ, जांभूळ, खिरणी, औदुंबर अशा बहुवर्षायू टिकाऊ, पर्यावरणास पोषक अशा रोपांचे संवर्धन केले आहे. श्री. महाजन या रोपवाटिकेतून गरजूंना मोफत रोपे उपलब्ध करून तर देतातच त्याच बरोबर विविध संस्थांमधून वृक्षारोपण करतात.


निसर्गसंवर्धनाच्या कामात श्री. महाजन ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर वृक्षारोपण, पर्यावरणविषयक भित्तिचित्रांचे प्रदर्शनाचे आयोजन ते करीत असतात. सकाळ वृत्तपत्राच्या सातपुडा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून श्री. महाजन यांनी पर्यावरणविषयक भित्तिचित्रांचे प्रदर्शन भरवले होते.


त्यांच्या कार्याची विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नोंद घेतलेली आहे. सन २००४ चा भारत सरकारचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सेवानिवृत्तीनंतरही महाजनांनी पर्यावरणविषयक चळवळीत आयुष्य झोकून दिले आहे.

बोन्सायचे प्रकार

औपचारिक /अनौपचारिक उभे - सर्वसाधारणपणे निसर्गात वाढणारे वृक्ष सरळ उभ्या बुंध्याचे व चारही बाजूंनी फांद्यांचा समतोल असणारे असतात, याला औपचारिक असे म्हटले जाते; तसेच ज्या झाडांचा बुंधा वाकडा आहे, त्यांस अनौपचारिक म्हटले जाते. या पद्धतीकरिता गोल कुंडी वापरावी.

तिरकस उभे - आपण एखाद्या उघड्या रानात किंवा समुद्रकाठी गेलो, तर आपल्याला सगळी झाडे वाऱ्यामुळे एका बाजूला झुकलेली दिसतात. अशी बोन्साय करताना रचना असते. या पद्धतीचे बोन्साय अंडाकृती कुंडीत चांगले दिसते. रोपटे लावतानाच तिरपे लावावे.


उतरती पद्धत - एखाद्या डोंगराळ ठिकाणी आपण गेलो, तर अशा प्रकारची झाडे हमखास आढळतात. झाडांचे मूळ फांद्यांच्या पातळीपेक्षा वरती व पाहताच एखादा झरा वाहत असल्याचा भास होतो, यालाच उतरती पद्धत म्हणतात. ही अतिशय वेगळी पण तेवढीच देखणी पद्धत आहे. या पद्धतीला मात्र कुंडी उंच वापरतात, जुनिपर्स हे झाड या पद्धतीसाठी उत्तम आहे.


जंगल - एका पसरट कुंडीत अनेक झाडे लावली जातात. बहुखोडेप्रमाणे झाडांची संख्या तीन, पाच, सात अथवा नऊ असावी. झाडे ओळीत नसून पुढे-मागे लावण्यात येतात. हे पाहताच एक जंगल आहे असा भास होतो. एकाच जातीची झाडे किंवा दोन-तीन वेगवेगळ्या जातीची झाडे एकत्र करता येतात.


खडकावरील बोन्साय - नदीकाठी जी झाडे वाढतात ती वरच्यावर पाहिले, तर त्यांचा शेंडा सर्वसाधारणपणे वृक्षाप्रमाणे दिसतो; पण जेव्हा आपण त्यांच्या मुळांकडे पाहतो, तेव्हा मुळांचे विलक्षण चित्र डोळ्यांसमोर येते. नदीच्या प्रवाहामुळे माती वाहून जाते व केवळ खडकाचा आधार असलेले हे वृक्ष आहेत हे आपल्याला दिसते. बोन्साय करताना झाडाची मुळे उघडी करून दगडावर मांडणी जरी आकर्षक दिसत असली, तरी प्रत्यक्ष ते करणे अवघड आहे.

...अशी घ्या गुलाबाची काळजी

शरद गटणे
मागील दोन भागांत आपण छाटणी कशी करावी आणि छाटणीसाठी कोणती हत्यारे वापरतात याची माहिती घेतली. आज आपण छाटणीनंतर गुलाबाच्या झाडाची वाढ कशी होते ते पाहणार आहोत.

छाटणीपासून १५ दिवसांत झाडांवर नवीन जोमदार फूट दिसू लागेल. या वेळी जमिनीचा वरचा पाच सें.मी. थर खुरपून भुसभुशीत, मोकळा करावा. पुढे प्रत्येक दोन आठवड्यांतून एकदा जमीन खुरपून भुसभुशीत केली पाहिजे. कुंड्यांतील झाडांना मुळाच्या विस्तारासाठी सीमित जागा उपलब्ध असल्याने या वरच्या थरात मुळांचे जाळे झालेले असते. या परिस्थितीत ही मुळे खुरपणी करताना तुटून झाडांस इजा होऊ शकते. हलक्‍या हाताने कुंडीतील वरची माती भुसभुशीत करावी.

छाटणीनंतर लगेच पाणी न देता जमिनीतील झाडांना दोन दिवसांनी व कुंडीतील झाडांना एक दिवसानंतर गुलाबासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी. कुंडीतील झाडाला दोन सपाट चहाचे चमचे तर जमिनीतील झाडाला एक सपाट टेबल स्पून एवढी खतमात्रा द्यावी. त्यानंतर पाणी द्यावे. पाणी जास्त प्रमाणात देऊ नये, नाहीतर खते जमिनीत खोलवर झिरपून जातात. त्यामुळे झाडांच्या मुळांना खते योग्य प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. प्रत्येक खुरपीनंतर खत देण्याची जरुरी नाही.

नव्याने फुटणाऱ्या प्रत्येक डोळ्याकडे लक्ष ठेवायला हवे. कधी कधी एकाच डोळ्यातून दोन - तीन फुटवे निघतात. हे सर्व वाढू देणे इष्ट नसते, कारण त्यामुळे पोषण विभागले जाऊन सर्व फुटवे कुपोषित, अशक्त निपजतात. त्यावर फुले आलीच तर ती निकृष्ट दर्जाची येतात. अशी वाढ दृष्टोत्पत्तीस आल्यास ती कोवळी असतानाच त्यातील जोमदार कोंब ठेवून इतर कोंब खुडून टाकावेत. तसेच रानगुलाबाची जंगली फूट व वॉटरशूट्‌सही या कालावधीत येण्याची शक्‍यता असते. अशी अनुत्पादक फूट दिसताक्षणीच काढून टाकावी. उत्पादक भागाकडे पोषण एकवटण्याला, चांगली फुले मिळण्याच्या दृष्टीने फार महत्त्व आहे.

कीड, रोगनियंत्रण -
गुलाबावर रस शोषणाऱ्या किडी व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. याच्या नियंत्रणासाठी दर दोन आठवड्यांनी शिफारशीत बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची एका आड एक आठवड्याच्या अंतराने आलटून-पालटून तज्ज्ञांच्या सल्याने फवारणी करावी. फवारणी करताना सर्व पाने खालून वरून, सर्व शाखा व त्यावरील काटे नीट भिजले पाहिजेत. कारण कीटक पानांच्या खालच्या बाजूवरच मोठ्या प्रमाणावर आढळतात. फवारणी ऊन कमी झाल्यावर सायंकाळी करावी, कारण किडी दिवसा पानांखाली लपून असतात, ऊन कमी झाल्यावर झाडांवर उपद्रव सुरू करतात. मावा व फुलकिडे यांचा त्रास या काळात उद्‌भवतो. मावा झाडाच्या अग्रभागाच्या शेंड्याजवळ व कळीच्या देठाजवळ गर्दी करून असतात. पानांच्या खालच्या बाजूसही आढळतात. ही कीड पाने आणि देठांतील अन्नरस शोषतात. फुलकिडे पानांच्या खाली व कळ्यांवर आढळतात. ही कीड पानांतील पृष्ठभाग खरवडतात. या दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी दीड मि.लि. डायमिथोएट प्रति लिटर पाण्यात मिसळून दर १५ दिवसांच्या अंतराने प्रादुर्भाव लक्षात घेऊन फवारणी करावी.

भुरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने अर्धवट उलटी वळलेली दिसतात. पानांवर पांढरा थर दिसतो. हा रोग प्रथम शेंड्याकडच्या पानांवर दिसून येतो. या रोगामुळे झाडाची वाढ मंदावते, चांगली फुले मिळत नाहीत. या रोगाच्या बंदोबस्तासाठी अर्धा मि.लि. ट्रायडीमॉर्फ प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. प्रदर्शनासाठी फुले घेत असाल तर कळ्यांत रंग भरण्यास सुरवात झाली, की ट्रायडीमॉर्फची फवारणी करू नये, नाहीतर पाकळ्यांवर ठिपके पडू शकतात.

सोसायटीमध्ये शोभेची झाडे लावायची आहेत, कोणती झाडे निवडावीत?

श्रीरंग थोपटे, सांगली
कांचन -
मध्यम उंचीचा हा वृक्ष आहे. गुलाबी फुले व पानांचा आकार यामुळे सर्वांनाच मोहात टाकतो. या वृक्षाच्या पाकळ्या गुलाबी, पांढऱ्या व एक पाकळी थोडीशी तांबडी असते. कांचनचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. पाने दोन खंडांत विभागलेली असतात. फुलोऱ्याच्या मंजिरा मोठ्या असतात. कांचनची पाने आकाराने आपट्यापेक्षा मोठी असतात. या वनस्पतीच्या खोडाची साल व फुले औषधात वापरतात.
आपटा -
हा मध्यम उंचीचा पर्णझडी वृक्ष असतो. याचे खोड वेडेवाकडे वाढलेले असते. खोडावर भरपूर फांद्या असून, त्या जमिनीच्या दिशेने झुकलेल्या असतात. फांद्यांच्या शेंड्यांत किंवा पानांसमोर उन्हाळ्यात फुलांच्या मंजिरा येतात. फुलांच्या कळ्या टोकदार असतात. फुलांच्या पाकळ्यांचा रंग पांढरा किंवा किंचित पिवळा असतो. भारतात सर्वच जंगलांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हा वृक्ष आढळून येतो. दक्षिण भारतात या वनस्पतीचा डिंक औषधांत वापरतात. खोडाची साल टॅनिन आणि रंगनिर्मितीसाठी वापरतात. सालीपासून धागे काढले जातात. या वनस्पतीचे लाकूड पांढरट बदामी, गर्द रंगाचे, गाभ्याच्या भागात कठीण असून, ते इमारत, शेती उपयोगी साधने बनविण्यासाठी वापरतात.
सोनचाफा -
दिसण्यास अतिशय सुंदर असणारा हा मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष आहे. या वृक्षाच्या विविध जातीही प्रसारित करण्यात आल्या आहेत. गुटी कलम पद्धतीच्या रोपांपासून किंवा बियांपासून रोपे करून लागवड केली जाते. सुंदर वासाची, शेंड्याला पिवळ्या रंगाची फुले या झाडाला येतात. देवळाच्या आवारात या झाडांची लागवड करतात. फुलांपासून सुगंधी द्रव्य काढले जाते.
नागचाफा -
हा वृक्ष उंच वाढणारा, सदाहरित असून, याची साल राखाडी, गुळगुळीत असते. पाने वैविध्यपूर्ण असतात. फुलांमध्ये मोठ्या चार पाकळ्या, गुच्छात पिवळ्या रंगाचे पुंकेसर असतात. या वृक्षास फुले उन्हाळ्यात येतात. बियाणे परिपक्व झाल्यानंतर ते लगेच पिशवीत टाकून रोपे करावीत. बियाणे जास्त काळ काढून ठेवल्यास उगवण क्षमता नाहीशी होते. रोपे तीन ते चार फूट उंचीची करून लागवड करावी. बिया श्‍वसनाच्या विकारावरील औषधांत वापरतात.
सुरंगी -
हा सदाहरित असणारा वृक्ष हळूहळू वाढतो, त्यामुळे रोपवाटिकेत याची रोपे मोठी करूनच लागवड करावी. पाने जाडसर, दोही कडा सरळ रेषेत, टोकाला टोकदार किंवा बोथट असतात. फुले पांढरी असून, ती खोडावर फेब्रुवारीपासून येण्यास सुरू होतात. परिपक्व बियाणे पेरून रोपे पिशवीत करावीत. लागवड ५ ु ५ मी. अंतराने करावी. फुलांपासून सुगंधी द्रव्य काढले जाते.
भेरली माड -
"सुरमाड' या नावानेही या पाम वृक्षास ओळखले जाते. पाने माशाच्या शेपटीसारखी दिसतात म्हणून यास इंग्रजीमध्ये "फिशटेल पाम' असे म्हणतात. अतिशय सुंदर असणारा हा वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावतात.
बहावा -
मध्यम उंचीचा हा वृक्ष दहा मीटरपर्यंत वाढतो. पर्णझडी जंगलांत आढळणाऱ्या या वृक्षाची लागवड बियांपासून रोपे तयार करून करतात. लांबलचक मोठ्या पिवळ्या रंगांचे फुलांचे घोस व त्यानंतर येणाऱ्या दीड ते दोन फुटांच्या शेंगा यामुळे हा वृक्ष सर्वांना आकर्षून घेतो. याच्या खोडाच्या सालीपासून रंग काढतात.
बकुळ -
सुमारे १० ते १५ मीटर वाढणाऱ्या या सदाहरित वृक्षाची फुले माळा करण्यासाठी, सुगंधी द्रव्य काढण्यासाठी वापरतात. खोडाची साल व फळे दंतविकारात मोठ्या प्रमाणात वापरतात. या वनस्पतीपासून इमारती लाकूडही मिळते. रस्त्याच्या दुतर्फा किंवा बागेत वृक्षाची लागवड केली जाते. चांगले गुणधर्म असलेल्या वृक्षांच्या बियांपासून रोपे तयार करून लागवड करावी. फुले उन्हाळ्यात येतात. फुले अतिशय सुवासिक असतात. लागवड ५ ु ५ मी. अंतराने २ ु २ ु २ फुटांचे खड्डे घेऊन करावी. सुरवातीला हे झाड हळू वाढते, त्यामुळे मोठी रोपे लावावीत.
कदंब -
या झाडाची साल बदामी, रखरखीत असते. पाने समोरासमोर, मोठी असतात. वासाची छोटी फुले चेंडूसारख्या आकारात एकवटलेली असतात. बियांपासून रोपे तयार करून लागवड ५ - ५ मी. किंवा ७ - ७ मी. अंतराने करतात.

झाडांचे योग्य पोषण महत्त्वाचे

शरद गटणे
आपण छाटणीनंतर झाडांचे योग्य व्यवस्थापन केले असल्यास लवकरच झाडांवर लहानशा काळ्या दिसू लागल्या असतील. हायब्रीड टी वर्गातील गुलाबांवर बव्हंशी एका दांडीवर एकच फूल आढळते; परंतु कधी कधी एकाच दांडीवर तीन ते चार कळ्या समूहाने आढळतात. आपण बाजारात विकण्यासाठी वा प्रदर्शनामधील स्पर्धेत भाग घेण्यासाठी फुले घेऊ इच्छित असाल तर अशा समूहातील एकच जोरकस वाढणारी कळी ठेवून उर्वरित कळ्या खुडून टाकाव्यात. असे केल्याने त्या दांडीमधील पोषण एकाच कळीकडे एकवटून फुले मोठी मिळतील. या क्रियेला "डिसबडिंग' म्हणतात. कळ्या अगदी लहान असतानाच "डिसबडिंग' करावे नाहीतर त्याचे व्रण मागे राहतात. उशिरा डिसबडिंग केलेल्या फुलांचा दर्जा चांगला राहत नाही, त्यामुळे ही फुले स्पर्धेत मागे पडतात.
फ्लोरिबन्डा वा मिनिएचर वर्गातील गुलाबामध्ये डिसबडिंग करू नये. हायब्रीड टी वर्गातील गुलाब ताटव्यात लावले असतील तर अशा ठिकाणी डिसबडिंग करू नये. शोभेच्या ताटव्यातील फुले लांब दांडीवर न कापता, फक्त वाळल्यावर खुडून टाकावीत. यामुळे फुले जरी काहीशी लहान मिळाली तरी त्यांची संख्या कित्येक पटींनी वाढून शोभेत भरच पडेल. कारण एका दांडीवर एकच फूल १२ सें.मी. व्यासाचे मिळाले. डिसबडिंग न केल्यामुळे फुले जरी नऊ सें.मी. व्यासाचीच मिळाली तरी फुलांची संख्या चौपट तरी होईल.

आपण जेव्हा लांब देठावर फुले काढतो तेव्हा भविष्यात फुलू शकणारे निदान चार ते पाच डोळे दांडीवरून कमी करतो. असे न केल्यास फुलांची संख्या आणखी चौपटीने वाढू शकते. याबाबत साधक-बाधक विचार करूनच निर्णय करावा. असे न केल्यास फुलांची संख्या आणखी चौपटीने वाढू शकते. याच सुमारास एका लिटर पाण्यात पाच ग्रॅम पोटॅशिअम नायट्रेट विरघळवून झाडांवर फवारल्यास फुलांच्या रंगरूपात लक्षणीय सुधारणा होते. फुले अधिक रंगतदार व सतेज निपजतात.


अजूनही झाडांवर रसशोषक किडी वा भुरी रोग आढळल्यास शिफारशीत कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी.

झाडांचे व्यवस्थापन ः
झाडांच्या पानांकडे आपले बारीक लक्ष हवे. पाने झाडाच्या आरोग्याचे आरसेच असतात. पोषणात काही कमतरता वा त्रुटी असल्यास ती पानांत लगेच प्रतिबिंबित होते. त्यासाठी काही ठोकताळे मार्गदर्शक ठरतात. गुलाबाच्या झाडांना नत्र, स्फुरद व पालाश यांच्या बरोबरीने मॅग्नेशिअम, कॅल्शिअम व सल्फर तसेच लोह, जस्त, तांबे, बोरॉन, मॅंगेनीज, मॉलिब्डेनम व क्‍लोरिन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची चांगल्या वाढीसाठी गरज असते. ही खते संतुलित प्रमाणात मिळाल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतात. आपण खास गुलाबांसाठी तयार करण्यात आलेली मिश्रखते वापरीत असाल, तर आपल्या झाडांस सहसा कुपोषण होणार नाही, परंतु वेगवेगळी खते देणार असाल तर त्यांचे योग्य प्रमाण ठेवणे गरजेचे आहे. नेमके कुठले अन्नद्रव्य कमी पडत आहे त्याचे संकेत झाड देत असते, हे ओळखता येणे महत्त्वाचे आहे.

अन्नघटकांच्या कमतरतेची लक्षणे ः
१) नत्राची कमतरता ः शेंड्याकडची पाने खुरटी व पिवळी दिसू लागतात. झाडांची वाढ थांबते, फूट कमी येते.
२) स्फुरदाची कमतरता ः पानांचा रंग हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते. पानांच्या खालच्या पृष्ठभागावर कधी कधी जांभळट छटा दिसते. दोन पानांतील अंतर वाढल्यामुळे पाने विरळ दिसतात. जून पाने कारणाविना अकाली गळून जातात.
३) पालाशची कमतरता ः पानांच्या कडेच्या पेशी मृत झाल्यामुळे कडा सुकल्यासारख्या व जळाल्यासारख्या दिसू लागतात. पानांवर तांबडे व पिवळे ठिपके दिसतात.
४) मॅग्नेशिअमची कमतरता ः बऱ्याच वेळा मॅग्नेशिअमची कमतरता आढळते. पानांच्या मुख्य मध्यवर्ती शिरेलगतचा भाग पिवळा पडून सुकू लागतो. कारण तिथल्या पेशी मृत होतात. पिवळेपण हळूहळू कडांकडे सरकू लागते.
५) लोहाची कमतरता ः प्रथम पानांच्या कडा पिवळ्या पडतात व हे पिवळेपण पानाच्या मधल्या भागाकडे सरकू लागते.
६) इतर सूक्ष्म द्रव्यांची कमतरता ः पाने पिवळी पडतात, पण शिरा हिरव्याच राहतात.

थोडक्‍यात पण महत्त्वाचे...
गुलाबांना पालाशयुक्त खते मानवतात. हे लक्षात घेऊन पोटॅशिअम सल्फेट शिफारशीत प्रमाणात द्यावे. युरियाचा कमीत कमी मात्रेत वापर करावा. युरियात नत्राचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पानांची जास्त वाढ होते. त्यामुळे फुलांची संख्या कमी होते. पाने खूप मोठी व फुले त्यामानाने खूप लहान होऊन त्यांच्या आकारातील संतुलन बिघडते. वाढ फार भरभर होत असल्यामुळे झाडांचा कणखरपणा कमी होतो. झाड कीड व रोग यांना सहजगत्या बळी पडते.

दालचिनीची 'कोकण तेज' सुधारित जात

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत भाट्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने दालचिनीच्या "कोकण तेज' आणि "कोकण तेजपत्ती', तर जायफळाची "कोकण स्वाद' या जाती विकसित केल्या आहेत, अशी माहिती संशोधन केंद्राचे कृषिविद्यावेत्ता डॉ. दिलीप नागवेकर यांनी दिली.
दालचिनीच्या विशेष जाती नसून श्रीलंकेत पत किंवा मॅटपत आणि कुरूची या दोन जाती प्रसिद्ध आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने 1992 मध्ये "कोकण तेज' ही दालचिनीची जात निवड पद्धतीने विकसित करून लागवडीसाठी प्रसारित केली.
जायफळाची "कोकण स्वाद' ही जात देखील भरघोस उत्पन्न देणारी आहे. याची रोपेही भाट्ये नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत. दहा वर्षांनंतर या रोपाला पाचशेच्यावर फळे मिळतात. तर कोकण तेज आणि कोकण तेजपत्ता या जातीपासून प्रती हेक्‍टरी 200 किलो उत्पादन मिळू शकते, असे श्री. नागवेकर यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी, संपर्क क्रमांक : (02352) 235077

सामूहिक शेतीतून यांत्रिकीकरणास वाव

अकोला : मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्‍न हा जागतिक स्तरावर चिंतेचा असला तरी त्यावर यांत्रिकीकरण हा भक्‍कम पर्याय ठरेल. मात्र भारतात कमाल जमीनधारणा कमी असल्याने सर्वांनाच यांत्रिकीकरण परवडणारे नाही. तरी सामूहिक शेतीच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढता येईल, असा विश्‍वास अमेरिकन शेतकरी ऍरन ट्रोस्टर याने व्यक्‍त केला.
अमेरिका व भारतातील नागरिकांमध्ये सौहार्द वाढत त्यांच्यात सांस्कृतिक व परंपराविषयक बाबींचे आदान-प्रदान व्हावे. या हेतूने रोटरी क्‍लबच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या उपक्रमांतर्गत ऍरनसह त्यांचे सहा सहकारी महिनाभराच्या भारत भेटीवर आले आहेत. नागपूर, चंद्रपूर नंतर अकोल्यात आलेल्या या सहा जणांपैकी शेतकरी असलेले ऍरन यांनी मंगळवारी (ता. एक) पत्रकारांशी संवाद साधला.
अमेरिकेच्या सेंट्रल नेबासका प्रांतातील रहिवासी असलेल्या ऍरनकडे पाच हजार एकर शेतजमीन आहे. मका व सोयाबीन ही मुख्य पिके त्यात घेतली जातात. या शेतजमिनीचे व्यवस्थापन मजुरांकरवी शक्‍य नसल्याने यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून मशागत, पेरणी व कापणी अशी कामे पूर्ण केली जातात. भारतात सद्यःस्थितीत जास्तीत जास्त 65 हॉर्सपावरचा ट्रॅक्‍टर उपलब्ध असताना अमेरिकेत मात्र 200 ते 500 हॉर्सपावरचा ट्रॅक्‍टर शेतीकामी वापरला जातो. ऍरन यांच्या माहितीनुसार त्याच्याकडे 345 हॉर्सपॉवरचा ट्रॅक्‍टर आहे. यांत्रिकीकरणामुळे पाच हजार एकर जमिनी केवळ पाच व्यक्‍तींच्या भरवशावर कसणे शक्‍य होते. तीन कुटुंबातील सदस्यांसोबतच दोन मजूर प्रति 25 हजार डॉलर प्रमाणे शेतात राबतात. सद्यःस्थितीत शेतात मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. यांत्रिक अवजारांच्या दुरुस्तीसाठी मजूर मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीमाल विपणनाकरिता मुक्‍त अर्थव्यवस्था आहे, त्यामुळे दरातील चढ-उतार आम्ही दररोज अनुभवतो, असेही ते म्हणाले. चक्रीवादळ किंवा बर्फवृष्टीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसाठी शासनाकडून 25 डॉलर प्रति एकर प्रमाणे अनुदान मिळते. अमेरिकेत एक हजारपेक्षा अधिक जमीनधारणा असलेला शेतकरी सुखी-समाधानी समजला जातो, तर 500 एकर किंवा त्यापेक्षा कमाल जमीनधारणा असलेल्या व्यक्‍तीस अल्पभूधारक संबोधले जाते. अल्पभूधारक शेतकऱ्यांची गुजराण शेतीतून निघणाऱ्या उत्पादकतेतून शक्‍य नसल्याने त्यांना पूरक धंदे करावे लागतात. कर्जाची परतफेड शक्‍य नसल्यास प्रसंगी शेती देखील विकावी लागते.

काटेकोर शेती ठरली चांगलीच फायद्याची

राजमणी हा तमिळनाडू राज्यात कोइमतूर जिल्ह्यात पुल्लागौंदन पुडूर गावातील युवा शेतकरी आहे.
काटेकोर शेती पद्धतीतून त्याने आता चांगला नफा मिळवीत आर्थिक स्थैर्य कमावले आहे.
राजमणी पारंपरिक शेती करायचा, त्यातून मिळणारे उत्पन्न अगदी तुटपुंजे होते.
तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या विस्तार संचालनालयाने एकेदिवशी घेतलेल्या काटेकोर शेती (प्रिसिजन फार्मिंग) या विषयावरील प्रशिक्षणात त्याने भाग घेतला. त्यानंतर फलोत्पादन विभागाकडे त्याने पुढील सल्ल्यासाठी संपर्क केला. अधिक नफ्याची शेती करण्यासाठी ही शेती त्याला उपयुक्‍त वाटली. त्याने कांदा, टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, मिरची व हळद अशा पिकांचे नियोजन करायचे ठरवले.
शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनातून त्याने शेतीची आखणी केली.

दीड एकर क्षेत्रावर त्याने हळद घेतली. चांगली नांगरणी केल्यानंतर त्यामध्ये 25 टन प्रति हेक्‍टर शेणखत, तर 300 किलो डीएपी व 150 किलो पोटॅश यांचा बेसल डोस म्हणून वापर केला. हळदीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. धर्मपुरी व कृष्णगिरी येथील शेतकऱ्यांच्या पद्धतींचा अभ्यास करून त्यांचे अनुकरण आपल्या शेतात केले.

हळदीच्या शेतात त्याने कोथिंबीर घेतलीच, शिवाय हळदीच्या सहा ओळींनतर दोन ओळी कांदा हे देखील आंतरपीक घेतले. तणांच्या नियंत्रणासाठी तणनाशके, तसेच किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कीडनाशकांचा वापर केला.

लावणीनंतर 30 ते 35 दिवसांत त्याने कोथिंबिरीचे उत्पादन घेतले. कांदा, तसेच मिरचीचेही नियोजन केले असल्याने त्यांचेही उत्पादन मिळाले. या पीकपद्धतीत एक हेक्‍टर क्षेत्रात हळदीचे सात टन, कांद्याचे 13 टन, मिरचीचे दोन टन उत्पादन राजमणीला मिळाले. हळद 135 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकण्यात आली. कांदा 20 रुपये, तर मिरचीला 12 रुपये प्रति किलो दर मिळाला.

कोथिंबिरीची चार रुपये प्रति किलो या दराने विक्री झाली. खते, पाणी यांचा शिफारशीप्रमाणे योग्य वेळी योग्य वापर झाला. राजमणीला हेक्‍टरी तीन लाख 35 हजार 400 रुपये खर्च आला, तर नऊ लाख 66 हजार रुपयांचा नफा हळद, कांदा, मिरची, कोथिंबीर व कुंपण म्हणून घेतलेली तूर यापासून मिळाला. काटेकोर शेती पद्धतीचे महत्त्व त्याला पटले असून, या शेतीतून आर्थिक स्थैर्य मिळवणे त्याला शक्‍य झाले आहे.

आले मूल्यवर्धन आणि प्रक्रिया प्रशिक्षण

धियाना (पंजाब) येथील सिफेट या संस्थेने आले पिकातील मूल्यवर्धन व प्रक्रिया विषयावर नुकताच प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. आल्याचे वाढते व्यापारी मूल्य लक्षात घेता अशा स्वरूपाच्या प्रशिक्षणाची संधी शास्त्रज्ञांकडून इच्छुकांना दिली जात आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून (आयसीएआर) जागतिक बॅंकेच्या साह्याने राष्ट्रीय कृषी नवनिर्मिती प्रकल्प राबवला जात आहे. आयसीएआर तसेच राज्य कृषी विद्यापीठे यांनी विकसित केलेल्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या आधारे पोषणाने परिपूर्ण तसेच आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पिकांमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे. लुधियाना (पंजाब) येथील सिफेट या पीक काढणीपश्‍चात तंत्रज्ञान विषयातील संस्थेमध्येही या प्रकल्पाचे काम सुरू आहे. मूल्यवर्धन तसेच पीक काढणीपश्‍चात व्यवस्थापन या विषयासाठी ज्ञानाचे केंद्र म्हणून संस्थेचा सहभाग आहे.
सध्या हळद पिकाला चांगलेच भरभराटीचे दिवस आले आहे. हळदीचे वाढते व्यापारी मूल्य पाहता त्यावरील प्रक्रियायुक्त तंत्रज्ञानाच्या विकासाला अधिक संधी आहे. ही गरज ओळखून सिफेटतर्फे या पिकात याविषयी नऊ दिवसांचा तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम अलीकडेच घेण्यात आला. त्याला ओरिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
आले हे औषधी गुणधर्मासाठी तसेच मसालेवर्गीय पीक म्हणून लोकप्रिय आहे. देशातील दक्षिण व पूर्वेकडील राज्यांमध्ये त्याची प्रामुख्याने लागवड होते. देशातील 25 टक्के उत्पादनाचा हिस्सा या भागातील आहे. सध्या अन्नप्रक्रिया उद्योगाकडून आल्याच्या स्वादयुक्त घटकाला मोठी मागणी आहे. हे महत्त्व लक्षात घेऊनच प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. आल्याची साठवणूक क्षमता तसेच निर्यातमूल्य वाढविण्यासाठी या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभव मिळावा यासाठी मार्कफेड तसेच अमृतसर येथील एका कंपनीच्या भेटीचा लाभ घडविण्यात आला. आल्याची पावडर तयार करणे, त्यातील ओलेओरेझीन, लोणचेनिर्मिती, आले पॅकेजिंगसाठी नॅनो घटक, सुकवणी यंत्राचे कार्य व देखभाल, कमी खर्चातील साठवणूक आदींविषयी सविस्तर माहिती या वेळी प्रशिक्षणार्थींना मिळाली.
आल्याला दरही चांगला मिळू लागला आहे. साहजिकच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कलही या पिकाकडे चांगल्या प्रकारे वळतो आहे. आल्याच्या बेण्याची कमतरताही अनेक शेतकऱ्यांना भेडसावत असून केवळ बेणे विकूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न कमावण्याची संधी मिळत आहे. गादीवाफा पद्धत तसेच ठिबक किंवा तुषार सिंचन यांच्या वापराने आल्याचे उत्पादन व गुणवत्ता वाढविण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. शेतकरी गटांच्या माध्यमातून या पिकाच्या लागवडीसाठी प्रेरित झाले आहेत.

नियंत्रण आंब्याच्या मोहोरावरील तुडतुड्यांचे...

डॉ. उमेश बारखडे
तुडतुड्याची पिल्ले आणि प्रौढ मोहोराच्या वेळी कळ्या आणि फुलांमधून रस शोषण करतात, त्यामुळे कळ्या, फुले चिमटतात, गळून पडतात. तुडतुडे आपल्या शरीरातून चिकट गोड पदार्थ बाहेर सोडतात. तो मोहोरावर पडतो. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन मोहोर काळा पडतो. परिणामी फळधारणा कमी होऊन उत्पन्नात घट येते. हे लक्षात घेऊन वेळीच तुडतुड्याचे नियंत्रण करावे.

तुडतुडे ही आंब्याच्या मोहोरावर येणारी महत्त्वाची कीड आहे. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी-जास्त वर्षभर दिसून येत असला तरी मोहोर येण्याचे वेळी म्हणजे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान जास्त प्रमाणात असतो. मोहोर नसताना तुडतुडे पानावर जगतात. आंब्याच्या दाट बागा आणि निचरा होत नसलेल्या जमिनी यामुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे मोहोर येण्याच्या दरम्यान तुडतुड्यांचे निरीक्षण करून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

तुडतुडे अंडी पेशीमध्ये घालतात. नुकतीच अंड्यातून निघालेली पिल्ले, रंगाने पांढुरकी असून, पुढे ती पिवळी, हिरवट पिवळी आणि शेवटी हिरवट करड्या रंगाची होतात. प्रौढ तुडतुड्यांना पंख असतात. ही कीड आकाराने लहान व पाचरीच्या आकाराची असते. चालताना तिरपे चालणे ही तुडतुड्यांची प्रमुख ओळख आहे.

पिल्ले आणि प्रौढ तुडतुडे मोहोराच्या वेळी कळ्या आणि फुलांमधून रस शोषण करतात, त्यामुळे कळ्या, फुले चिमटतात व गळून पडतात. या शिवाय तुडतुडे आपल्या शरीरातून चिकट-गोड पदार्थ बाहेर सोडतात. तो मोहोरावर पडतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन तो काळा पडतो. परिणामी फळधारणा कमी होऊन उत्पन्नात घट येते.

प्रादुर्भाव ः साधारणपणे हिवाळा सुरू होताना, तसेच झाडावर मोहोर आल्यावर तुडतुड्यांची प्रौढ मादी कळ्या, फुले व कोवळी पाने यांच्या पेशीमध्ये जानेवारी ते मार्च या दरम्यान एक-एक करून 100 ते 200 अंडी घालते. चार ते सात दिवसांत अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले चार ते पाच अवस्था पूर्ण करून 10 ते 12 दिवसांत प्रौढ स्वरूप धारण करतात. जानेवारी ते एप्रिल दरम्यान तुडतुडे सक्रिय असतात. इतर वेळी प्रादुर्भाव कमी राहात असून, ते कोवळ्या पानातून रस शोषण करतात. साधारणतः थंड हवामानात अंडी घालण्याची प्रक्रिया जास्त असते. प्रौढ तुडतुडे काही काळ निष्क्रिय असतात, अशावेळी ते झाडाच्या खाच खळग्यात बसलेले असतात.

: 0724-2258050
कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
02358- 282415 (विस्तार क्र. 256)
कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली.