Friday, February 4, 2011

उत्तम व्यवस्थापन हीच दुग्ध व्यवरसायाची गुरुकिल्ली

कोल्हापूर जिल्ह्यातील नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील शिवाजी महादेव सूर्यवंशी यांनी दुधाळ जनावरांचे पालन यशस्वीरीत्या केले आहे. दहा वर्षांपूर्वी दोन गाईंपासून सुरू झालेल्या त्यांच्या गोठ्यात आता 125 जनावरे आहेत. जातिवंत जनावरांची निवड, दूध उत्पादनातील सातत्य आणि महत्त्वाचे म्हणजे घरच्या लोकांकडून चांगले व्यवस्थापन झाले, तर दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरतो असा त्यांचा अनुभव आहे.

कोल्हापूर हा ऊस व दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. येथील वारणानगर मार्गावर कोल्हापूरपासून तीस किलोमीटर अंतरावर नवे पारगाव आहे. वारणा खोऱ्यातील प्रगतिशील गाव म्हणून त्याची ओळख आहे. साखर कारखाना, दूध संघ व विविध शैक्षणिक संस्था या परिसरात आहेत. यामुळे गावाला सर्वच दृष्टीने महत्त्व आहे. याच गावात प्रयोगशील शेतकरी शिवाजी सूर्यवंशी यांचा एकशे वीस जनावरांचा गोठा शेतकऱ्यांचे आकर्षण ठरला आहे. गेल्या दहा वर्षांपासून श्री. सूर्यवंशी गाई, म्हैसपालन करीत आहेत. वेळापत्रकाप्रमाणे दररोज जनावरांचे होणारे संगोपन ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली म्हणावी लागेल. ठरलेल्या वेळेतच स्वच्छता, खाद्य, धारा आदी कामे होत असल्याने नियोजनात कोणतीही गडबड होत नाही. मजुरांना नेमून दिलेली कामे आणि घरच्या लोकांचाही दररोजच्या नियोजनातील सहभाग जनावरांच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा ठरला आहे.

...अशी झाली गोठा व्यवस्थापनाची सुरवात
दुग्ध व्यवसायाबाबत श्री. सूर्यवंशी म्हणाले, की आमची चार एकर शेती आहे. चार एकर क्षेत्रापैकी दोन एकरावर हत्ती गवत, मका, ज्वारी या चारा पिकांची लागवड आहे. उरलेल्या दोन एकर क्षेत्रावर ऊस व भाजीपाल्याची लागवड केली जाते. शेतीबरोबरीने जोडधंदा असावा म्हणून आम्ही सन 2000 मध्ये दोन होल्स्टिन फ्रिजीयन गाई आणल्या. सुरवातीला घरातील गोठ्यातच त्यांचा सांभाळ केला. योग्य व्यवस्थापनामुळे दुधातून चांगला पैसा मिळू लागल्याने पुढे टप्प्याटप्प्याने 16 होल्स्टिन फ्रिजीयन जातीच्या सोळा गाई बंगळूर परिसरातून खरेदी केल्या. सुरवातीला घराजवळच गोठा होता. माझी पत्नी, दोन मुले, एका मुलाची पत्नी आणि मी स्वत: असे पाच जण राबून जनावरांची निगा ठेवतो. पहाटे उठून एकाच वेळी शेण काढणे, धारा काढणे, वैरण घालणे आदी कामे कुटुंबातील सदस्य करतात. जनावरांची संख्या वाढत गेल्यानंतर 2002 मध्ये घरापासून एक किलोमीटर अंतरावर नवीन गोठा तयार केला आहे.
कामकाजाचे नियोजन
जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत श्री. सूर्यवंशी म्हणाले, की आमची गोठ्यातील दिवसाची सुरवात पहाटे तीन वाजता होते. जनावरांची संख्या मोठी असल्याने जनावरांच्या व्यवस्थापनासाठी सात मजूर कायमस्वरूपी आहेत. पहाटे पहिल्यांदा चारा दिला जातो. एका जनावराला एका वेळी दहा किलो हिरवा (हत्ती गवत, ऊस वाढे, मका) आणि कोरडा चारा कुट्टी करून दिला जातो. वैरण संपल्यानंतर प्रत्येक जनावराला त्याच्या गरजेनुसार एक ते दीड किलो या प्रमाणात पशुखाद्य दिले जाते. पशुखाद्य दिल्यानंतर शेण काढले जाते. साधारणपणे चारच्या सुमारास धारा सुरू होतात. धारा झाल्यानंतर गव्हाणी स्वच्छ करून त्याच गव्हाणीत पाणी सोडले जाते. दुपारी दोन वाजेपर्यंत गव्हाणीत पाणी असते. विहिरीतून टाकीत आणि टाकीतून प्रत्येक पाइपद्वारे प्रत्येक गव्हाणीत पाणी सोडण्याची तसेच बाहेर काढण्याची व्यवस्था केली आहे. पुन्हा दुपारी तीन वाजल्यानंतर जनावरांना चारा, पाणी, पशुखाद्य दिले जाते. त्यानंतर दूध काढले जाते. दररोज जनावरांना धुतले जाते. वारणा दूध संघ जवळच असल्याने संघाचे वैद्यकीय अधिकारी दररोज एकदा गोठ्याला भेट देऊन जनावरांच्या प्रकृतीची तपासणी करतात. गरज लागल्यास तातडीने औषधोपचार होतात. माझा मुलगा सर्जेराव याने पशुवैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याच्यादृष्टीने तातडीने उपचार होतात. शिफारशीनुसार लसीकरण केले जाते. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले आहे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक पद्धतीने रेतन केले जाते. सहा वेतांपर्यंत गाय, म्हैस गोठ्यात ठेवतो.

घरच्यांची साथ मोलाची
श्री. सूर्यवंशी यांना शेती आणि जनावरांच्या व्यवस्थापनात सर्जेराव, बाजीराव या दोन्ही मुलांची मोठी मदत लाभते. तिघांनीही ठराविक कामे वाटून घेतली आहे. गोठ्याचे व्यवस्थापन स्वतः श्री. सूर्यवंशी करतात. जनावरांची खरेदी, औषधोपचार या बाबी त्यांची दोन्ही मुले सांभाळतात. चार, ऊस व्यवस्थापनासाठी स्वतंत्र सात मजूर काम करतात. हे मजूर पीक व्यवस्थापनाच्या बरोबरीने चाऱ्याची कापणी करून गोठ्यात चारा आणून कुट्टी करतात.
: शिवाजी सूर्यवंशी, 9766710532

..अशी आहे गोठ्याची रचना
जनावरांचा गोठा हवेशीर आणि योग्य पद्धतीने बांधला असेल तरच जनावरांचे आरोग्य चांगले राहते, दूध उत्पादनात सातत्य राहते. ही गोष्ट लक्षात घेऊन श्री. सूर्यवंशी यांनी 125 जनावरांसाठी सुधारित पद्धतीने गोठा बांधला आहे. सध्या गोठ्यात 70 होल्स्टिन फ्रिजीयन गाई आणि 30 मुऱ्हा म्हशी आहेत. त्याचबरोबरीने कालवडी, रेड्या आणि वासरांची संख्या 25 आहे. याबाबत माहिती देताना श्री. सूर्यवंशी म्हणाले, की मुख्य तीन भागांत गोठ्याची रचना आहे. पहिल्या भागातील गोठा 100 फूट ु 36 फूट आकाराचा आहे. या गोठ्यात 32 गाई व 16 म्हशी आहेत. दुसरा भागातील गोठा 60 फूट ु 36 फुटाचा आहे. यात 24 गाई आहेत. तिसऱ्या भागातील गोठा 50 फूट ु 12 फुटाचा आहे. यामध्ये भाकड म्हशी, रेड्या, कालवडी आणि वासरे बांधली जातात. गोठ्यामध्ये जनावरे डोक्‍याकडे डोके या पद्धतीने बांधली जातात. गव्हाणीची उंची साडेतीन फूट आणि रुंदी अडीच फूट इतकी आहे. दोन गव्हाणींमधील गाळा तीन फूट अंतराचा आहे. गोठ्याच्या भिंती तीन फूट उंचीच्या बांधल्या असून वरच्या बाजूला जाळी लावलेली आहे. त्यामुळे गोठा हवेशीर झाला आहे. उन्हाळ्यात गाई, म्हशींनी उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून गोठ्यात फॅन लावले आहेत. गव्हाणीमध्येच पाणी देण्यासाठी पाइप लावलेले आहेत. खाद्य खाऊन झाले, की जनावरांना गव्हाणीत पाणी सोडले जाते. जनावरांना पुरेसे पाणी मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे. गोठ्यामध्ये कडेला नाली बनवलेली आहे. त्यामुळे जनावरे धुतलेले पाणी, शेण, मूत्र नालीतून गोठ्याबाहेर वाहून जाते. हे पाणी थेट शेतात सोडलेले आहे. त्यामुळे चारा पिके, ऊस शेतीला या पाण्याचा फायदा होतो.

दूध उत्पादन
श्री. सूर्यवंशी यांच्या गोठ्यात सध्या 70 पैकी 50 गाई दुधात आहेत. एक गाय प्रति दिन सरासरी 20 लिटर दूध देते. रोजचे गाईचे दूध उत्पादन 600 लिटर आहे. 30 म्हशींपैकी 20 म्हशी दुधात आहेत. एक म्हैस प्रति दिन सरासरी सात ते दहा लिटर दूध देते. रोजचे दूध उत्पादन 100 लिटर आहे. एकूण दररोज 700 ते 750 लिटर दूध डेअरीला जाते. गाईचे फॅट 4 ते 4.1 इतके तर म्हशीचे फॅट सरासरी 7.5 ते 7.6 इतके आहे.
दूध फरक, शेणखत विक्रीतून मिळालेली रक्कमच नफा
गोठ्यात 125 जनावरे असल्याने त्यांचा व्यवस्थापन खर्चही मोठा आहे. याबाबत श्री. सूर्यवंशी म्हणाले, की दररोज सुमारे सात हजार रुपयांचा खर्च चारा, पशुखाद्य व मजूर आणि इतर व्यवस्थापनावर होतो. दहा हजार रुपयांचे उत्पन्न दररोजच्या दूध विक्रीतून मिळते. खर्च वजा जाता दररोज तीन हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळत असले, तरी एवढा मोठा व्याप सांभाळायचा तर दररोजचे अतिरिक्त खर्च ठरले आहेत. यामुळे ही रक्कम फारशी वापरता येत नाही. वर्षाला दोनशे ट्रॉली शेणखत निघते. त्यातले शंभर ट्रॉली शेणखत विकतो. ट्रॉलीला आठशे रुपये दर अपेक्षित धरला तर साधारणत: वर्षाला 80 हजार रुपये शेणखतातून मिळतात. आमच्याकडे व्यवस्थापन चांगले असल्याने जनावरांचे आरोग्य उत्तम राहते. तसेच दुधाचेही प्रमाण चांगले असल्याने अनेक शेतकरी आमच्याकडून कालवडी, रेड्या खरेदी करतात. यातून थोडेफार पैसे शिल्लक राहतात. पण मुख्य नफा मला दूध संघाकडून दिल्या जाणाऱ्या वार्षिक रिबेटमधून मिळतो. वर्षाला पाच लाख रुपये संघाकडून रिबेट दिला जातो. ही रक्कम मला गोठा व्यवस्थापन, जमीन व्यवस्थापन आणि इतर कामांसाठी वापरता येते. सध्या पशुखाद्य व इतर घटकांच्या वाढलेल्या किमती यामुळे जनावरांचे व्यवस्थापन खूप जिकिरीचे काम बनले आहे. पण पूर्ण क्षमतेने घरच्यांनी लक्ष घातल्यास दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरतो.

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. khup chan lekh vachun doodh vayvsayatil bharpur gosti samajlya tyacha aamhi aamchya gavi fayda nakkich karun ghyenar aamchya ghari pan gaai mhashi aahye dhanyavad suryavanshi saheb

    ReplyDelete