Tuesday, February 8, 2011

नारळप्रक्रियेतून लघु उद्योगांची उभारणी शक्‍य

डॉ. दिलीप नागवेकर
नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होत असल्याने त्याला "कल्पवृक्ष' म्हणतात. या कल्पवृक्षाच्या विविध भागांवर प्रक्रिया केल्यावर खोबरे, डेसिकेटेड खोबरे, नारळ मलई, दूध, ऍक्‍टिव्हेटेड कार्बन अशी व्यापारी मूल्य असणारी उत्पादने तयार करता येतात. या उत्पादनातून निश्‍चित लघु उद्योगाची उभारणी करता येणे शक्‍य आहे.

कोकणातील महत्त्वाचे बागायती पीक म्हणजे नारळ. केवळ शहाळे आणि नारळ उत्पादन ही संकल्पना मागे पडत असून, नारळाची विविध उत्पादने तयार करण्यावर भर दिला जात आहे.

1) खोबरे ः नारळ 11 ते 12 महिन्यांचे पक्व झाल्यानंतर ते खोबरे तयार करण्यासाठी वापरतात. ताज्या खोबऱ्यात 50 ते 55 टक्के तसेच वाळलेल्या खोबऱ्यामध्ये पाच ते सहा टक्के पाणी असते. नारळ फोडून वाट्या उन्हामध्ये सात ते आठ दिवस वाळवाव्यात. खोबरे वाळविण्यासाठी सौर वाळवणी यंत्राचा वापर करता येतो.
2) गोटा खोबरे ः गोटा खोबरे 12 महिने पक्वतेच्या नारळापासून तयार करता येते. छपराखाली बांबूचे मचाण करून त्यावर 8 ते 12 महिने नारळ साठवितात. या कालावधीत सर्व पाणी आटते, असे नारळ हलविले असता गुडगुड आवाज येतो. नारळ फोडून करवंटीपासून खोबरे वेगळे केले जाते. अशा प्रकारे गोटा खोबरे तयार होते.
3) डेसिकेटेड खोबरे ः डेसिकेटेड कोकोनट बनविण्यासाठी परिपक्व नारळ सोलून, त्याचे दोन तुकडे करावे. खोबरे करवंटीपासून वेगळे करून, खोबऱ्यावर असलेली तपकिरी रंगाची साल वेगळी केली जाते. अशा पद्धतीने जवळपास 12 टक्के नको असलेला भाग काढून टाकला जातो. खोबऱ्याचे बारीक तुकडे करून स्वच्छ पाण्याने ते धुतले जातात. यामुळे खोबऱ्याला चिकटलेला नको असलेला भाग काढला जातो. हे तुकडे ठराविक तापमानाला उकळत्या पाण्यामध्ये ठेवतात. नंतर या तुकड्यांचा किस करून वाळवणी यंत्रामध्ये वाळविले जातात. वाळविलेला किस जशाच्या तसा प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये हवाबंद केला जातो किंवा त्याची भुकटी करून हवाबंद केला जातो. मिठाई, इतर खाद्य कारखाने, चॉकलेट, कॅन्डीमध्ये याचा वापर केला जातो.
4) नारळाचे दूध आणि दुधाचे पदार्थ ः पक्व नारळाच्या खोबऱ्यापासून दूध तयार करतात. डेअरी क्रीमला पर्याय म्हणून वापर होतो. गाईच्या दुधाच्या तुलनेत यात स्निग्धांश भरपूर असतात, परंतु प्रोटिन, साखर कमी असते.
5) नारळ मलई ः नारळाच्या दुधापासून घट्ट मलई तयार केली जाते. वेगवेगळ्या करी, गोड पदार्थ, पुडिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो, तसेच बेकरीचे पदार्थ तयार करण्यासाठीही याचा वापर केला जातो.
6) पक्व नारळातील पाणी ः या पाण्यात दोन टक्के साखर, 5.4 टक्के एकूण विद्राव्य घटक, 0.5 टक्का खनिजे, 0.1 टक्का प्रोटिन आणि 0.1 टक्का स्निग्धांश असतात. या पाण्यापासून व्हिनेगार तयार केले जाते.
7) शहाळ्याचे पाणी ः शहाळ्याच्या पाण्यात सर्वांत जास्त पालाश आणि खनिजे असतात. सात महिन्यांच्या शहाळ्याच्या पाण्यात साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. "चौघाट ऑरेंज ड्‌वार्फ' ही नारळाची जात शहाळ्याच्या पाण्यासाठी उत्कृष्ट आहे. अनेक आजारांत शहाळ्याचे पाणी रुग्णाला दिले जाते. विशेषतः हगवण, जुलाब, उलटी व पोटाचे विकार यांत मोठ्या प्रमाणात ते वापरले जाते.
8) स्नोबॉल टेंडर नट ः यामध्ये शहाळे नारळाचे सोडण, करवंटी आणि खोबऱ्यावरील लाल साल काढून टाकली जाते. आठ महिने वयाच्या नारळापासून स्नोबॉल टेंडर नट तयार केले जातात.
9) खोबरेल तेल ः सुक्‍या खोबऱ्यापासून 65 ते 70 टक्के (सरासरी 60.5 टक्के) खोबरेल तेल मिळते. भारतामध्ये तेलाचा उपयोग खाण्यासाठी - 40 टक्के, स्वच्छतागृह साफ करणारे पदार्थ/ सौंदर्यप्रसाधने - 46 टक्के, साबण तयार करणे - 14 टक्के एवढा केला जातो.
10) खोबऱ्याची पेंड ः सुक्‍या खोबऱ्यापासून तेल काढल्यानंतर सुमारे 35 ते 36 टक्के चोथा शिल्लक राहतो. त्याचा जनावरांचे खाद्य म्हणून वापर करता येतो, परंतु प्रत्येक जनावरास दिवसाला दोन ते अडीच किलोपेक्षा जास्त पेंड देऊ नये, त्यामुळे दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढते; तसेच कोंबडी खाद्यासाठीही याचा उपयोग होतो.
11) करवंटी ः देशात अंदाजे 1.7 दशलक्ष टन करवंटी दर वर्षी उपलब्ध होते. करवंटीपासून कोळसा, ऍक्‍टिव्हेटेड कार्बन, करवंटी भुकटी, भांडी, शोभेच्या वस्तू, आइस्क्रीम कप, बटण अशी विविध उत्पादने तयार केली जातात.
12) करवंटी कोळसा ः करवंटीपासून 30 टक्के म्हणजेच 1000 करवंट्यांपासून 30 किलो, तर 30,000 करवंट्यांपासून एक टन कोळसा मिळतो.
13) ऍक्‍टिव्हेटेड कार्बन ः करवंटी कोळशापासून ऍक्‍टिव्हेटेड कार्बन तयार केला जातो. तीन टन करवंटी कोळशापासून अंदाजे एक टन ऍक्‍टिव्हेटेड कार्बन मिळतो. याचा उपयोग वनस्पती तेल शुद्ध आणि साफ करण्यासाठी, पाण्याचे शुद्धीकरण, द्रावकाचा उतारा, सोन्याचा उतारा, विषारी वायूपासून संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस मास्कमध्ये केला जातो.
14) करवंटीची भुकटी ः स्वच्छ करवंटी दळून त्याची भुकटी तयार करतात. तिचा उपयोग लाकडाच्या भुश्‍शाऐवजी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, बकेलाइट कारखान्यात, फिलर म्हणून मच्छर अगरबत्ती आणि इतर अगरबत्ती, फिनॉलीन पावडरमध्ये आणि प्लायवूड लॅमिनेटेड बोर्डात वापरली जाते.
ः 02352-235077
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी
ः 02358-280233, 280338
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी

No comments:

Post a Comment