Friday, February 4, 2011

...अशी घ्या गुलाबाची काळजी

शरद गटणे
मागील दोन भागांत आपण छाटणी कशी करावी आणि छाटणीसाठी कोणती हत्यारे वापरतात याची माहिती घेतली. आज आपण छाटणीनंतर गुलाबाच्या झाडाची वाढ कशी होते ते पाहणार आहोत.

छाटणीपासून १५ दिवसांत झाडांवर नवीन जोमदार फूट दिसू लागेल. या वेळी जमिनीचा वरचा पाच सें.मी. थर खुरपून भुसभुशीत, मोकळा करावा. पुढे प्रत्येक दोन आठवड्यांतून एकदा जमीन खुरपून भुसभुशीत केली पाहिजे. कुंड्यांतील झाडांना मुळाच्या विस्तारासाठी सीमित जागा उपलब्ध असल्याने या वरच्या थरात मुळांचे जाळे झालेले असते. या परिस्थितीत ही मुळे खुरपणी करताना तुटून झाडांस इजा होऊ शकते. हलक्‍या हाताने कुंडीतील वरची माती भुसभुशीत करावी.

छाटणीनंतर लगेच पाणी न देता जमिनीतील झाडांना दोन दिवसांनी व कुंडीतील झाडांना एक दिवसानंतर गुलाबासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी. कुंडीतील झाडाला दोन सपाट चहाचे चमचे तर जमिनीतील झाडाला एक सपाट टेबल स्पून एवढी खतमात्रा द्यावी. त्यानंतर पाणी द्यावे. पाणी जास्त प्रमाणात देऊ नये, नाहीतर खते जमिनीत खोलवर झिरपून जातात. त्यामुळे झाडांच्या मुळांना खते योग्य प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. प्रत्येक खुरपीनंतर खत देण्याची जरुरी नाही.

नव्याने फुटणाऱ्या प्रत्येक डोळ्याकडे लक्ष ठेवायला हवे. कधी कधी एकाच डोळ्यातून दोन - तीन फुटवे निघतात. हे सर्व वाढू देणे इष्ट नसते, कारण त्यामुळे पोषण विभागले जाऊन सर्व फुटवे कुपोषित, अशक्त निपजतात. त्यावर फुले आलीच तर ती निकृष्ट दर्जाची येतात. अशी वाढ दृष्टोत्पत्तीस आल्यास ती कोवळी असतानाच त्यातील जोमदार कोंब ठेवून इतर कोंब खुडून टाकावेत. तसेच रानगुलाबाची जंगली फूट व वॉटरशूट्‌सही या कालावधीत येण्याची शक्‍यता असते. अशी अनुत्पादक फूट दिसताक्षणीच काढून टाकावी. उत्पादक भागाकडे पोषण एकवटण्याला, चांगली फुले मिळण्याच्या दृष्टीने फार महत्त्व आहे.

कीड, रोगनियंत्रण -
गुलाबावर रस शोषणाऱ्या किडी व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. याच्या नियंत्रणासाठी दर दोन आठवड्यांनी शिफारशीत बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची एका आड एक आठवड्याच्या अंतराने आलटून-पालटून तज्ज्ञांच्या सल्याने फवारणी करावी. फवारणी करताना सर्व पाने खालून वरून, सर्व शाखा व त्यावरील काटे नीट भिजले पाहिजेत. कारण कीटक पानांच्या खालच्या बाजूवरच मोठ्या प्रमाणावर आढळतात. फवारणी ऊन कमी झाल्यावर सायंकाळी करावी, कारण किडी दिवसा पानांखाली लपून असतात, ऊन कमी झाल्यावर झाडांवर उपद्रव सुरू करतात. मावा व फुलकिडे यांचा त्रास या काळात उद्‌भवतो. मावा झाडाच्या अग्रभागाच्या शेंड्याजवळ व कळीच्या देठाजवळ गर्दी करून असतात. पानांच्या खालच्या बाजूसही आढळतात. ही कीड पाने आणि देठांतील अन्नरस शोषतात. फुलकिडे पानांच्या खाली व कळ्यांवर आढळतात. ही कीड पानांतील पृष्ठभाग खरवडतात. या दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी दीड मि.लि. डायमिथोएट प्रति लिटर पाण्यात मिसळून दर १५ दिवसांच्या अंतराने प्रादुर्भाव लक्षात घेऊन फवारणी करावी.

भुरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने अर्धवट उलटी वळलेली दिसतात. पानांवर पांढरा थर दिसतो. हा रोग प्रथम शेंड्याकडच्या पानांवर दिसून येतो. या रोगामुळे झाडाची वाढ मंदावते, चांगली फुले मिळत नाहीत. या रोगाच्या बंदोबस्तासाठी अर्धा मि.लि. ट्रायडीमॉर्फ प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. प्रदर्शनासाठी फुले घेत असाल तर कळ्यांत रंग भरण्यास सुरवात झाली, की ट्रायडीमॉर्फची फवारणी करू नये, नाहीतर पाकळ्यांवर ठिपके पडू शकतात.

No comments:

Post a Comment