Tuesday, February 8, 2011

कलिंगड लागवड कधी करावी? योग्य जाती कोणत्या? कीड-रोग व काढणीविषयी मार्गदर्शन करावे.

बी. जी. इनामदार, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर
क लिंगडाची लागवड 17 अंश ते 18 अंश से. तापमानात थंडी कमी झाल्यावर करावी. फळ लागल्यापासून ते फळ विक्रीसाठी तोडेपर्यंत किमान 40 ते 45 दिवस तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे आवश्‍यक आहे. पिकाचा कालावधी जातीपरत्वे 90 ते 110 दिवसांचा असतो.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर व स्फुरद जिवाणू खताची 250 ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. लागवडीसाठी चार मीटर अंतरावर रुंद सऱ्या कराव्यात. सरीच्या दोन्ही बाजूंस 90 सें.मी. अंतरावर खड्डे करून त्यात दोन किलो चांगले कुजलेले शेणखत आणि दहा ग्रॅम कार्बारिल पावडर टाकून खड्डे भरून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात दोन ते तीन बिया एकमेकांपासून तीन ते चार सें.मी. अंतरावर दोन ते अडीच सें.मी. खोलीवर पेराव्यात. एक हेक्‍टर लागवडीसाठी साधारण अडीच किलो बियाणे लागते. माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 15 ते 20 टन शेणखत, 15 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. खते देताना संपूर्ण शेणखत, स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा व नत्राची 1/3 मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. उरलेले नत्र दोन समान हप्त्यांत लागवडीनंतर एक आणि दोन महिन्यांनी द्यावे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे फळे तडकतात. तेव्हा पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे. फळे काढणीस तयार झाली किंवा नाही हे ओळखण्यासाठी फळावर टिचकी मारल्यास तयार झालेल्या फळाचा बदबद असा आवाज येतो व अपक्व फळांचा टणटण असा आवाज येतो. तयार फळांचा जमिनीलगतचा रंग किंचित पिवळसर होतो. फळाच्या देठाजवळील लतातंतू सुकलेले असतात. काढणी सकाळी करावी. त्यामुळे फळांचा ताजेपणा व आकर्षकता टिकून राहते व ती चवीला चांगली रुचकर लागतात.
कलिंगड पिकावर भुरी, करपा व मर रोगांचा आणि तांबडे व काळे भुंगेरे, फळमाशी, मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची अथवा ट्रायकोडर्मा जैविक रोगनियंत्रकाची पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. किडींच्या नियंत्रणासाठी बिगर हंगामात शेतीची चांगली नांगरट व कुळवणी करावी. म्हणजे तांबडे भुंगेरे, फळमाशी इ. किडींच्या सुप्त अवस्था नष्ट होऊन त्याच्या बंदोबस्तासाठी मदत होईल.
ः प्रा. प्रभाकर रसाळ, 9766042997
विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे

शेतात फणसाची जुनी झाडे आहेत, त्यांचे व्यवस्थापन कसे करावे?

अमोल गणेश राऊत, मु.पो. ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद
जुन्या फणसाच्या झाडांची काळजी
घेण्याबाबत उद्यानविद्या विभाग, कृषी
महाविद्यालय, दापोली येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती ः फणसाचे मुख्य खोड व फांद्या सशक्त करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे. फणसाच्या फांद्या जाड करण्यासाठी संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा महत्त्वाचा आहे. एका पूर्ण वाढलेल्या फणसाच्या झाडाला सुमारे 20 ते 30 किलो शेणखत किंवा कंपोस्ट द्यावे. तसेच 500 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद व 250 ग्रॅम पालाश प्रति झाडाला द्यावे. फणसाच्या झाडाला खोडावर फुले व फळे लागतात, म्हणजेच झाडाच्या स्वतःच्या सावलीत लागतात. बऱ्याचदा असे आढळून येते, की फुले आल्यानंतर नर फुले काळी पडून गळून पडतात. नर फुलांच्या लगत असलेली किंवा नर फुलाला चिकटून असलेली मादी फुलेदेखील काळी पडतात. जर फणसाच्या खोडावर सावलीचे प्रमाण जास्त असेल, तर अशा ठिकाणी फळे काळी पडण्याचे प्रमाण वाढते. म्हणूनच फणसाच्या मधल्या खोडावर पडणाऱ्या सावलीचे नियोजन करावे. झाडाची सरसकट छाटणी न करता तुरळक प्रमाणात फांद्यांची विरळणी केली, तर झाडाच्या आत पडणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण वाढेल. ही विरळणी करताना कमकुवत फांद्यांची करावी. फणसाला साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांत फुले लागतात. फळधारणेनंतर फळ तयार होण्यासाठी सुमारे 130 ते 140 दिवसांचा कालावधी लागतो.
ः 02358 - 282415, 282130, विस्तार क्र. ः 250, 242
उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी

गावठी कोंबडीपालनात पक्षी व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या बाबी कोणत्या?

राजू सोनवणे, मेहकर, जि. बुलडाणा
क्रां तिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती ः गावठी कोंबड्यांमध्ये सुरवातीचे चार आठवडे पिल्लांची योग्य प्रकारे जपणूक करावी. पिल्ले आकाराने व वजनाने कमी (25 ते 27 ग्रॅम) असतील तर सुरवातीच्या काळात कृत्रिमरीत्या पुरविण्यात येणारी ऊब कमी पडू देऊ नये. नाहीतर पिल्लांमध्ये मरतूक होते. खासकरून नदीप्रवाहाच्या जवळचा भाग किंवा जास्त थंड हवेच्या ठिकाणी वीजकपातीच्या कालावधीमध्ये मरतुकीचे प्रमाण 50 टक्के अधिक असते. शेतकरी यावर उपाय म्हणून पेट्रोमॅक्‍सच्या साह्याने उष्णता देण्याचा प्रयत्न करतात; परंतु एकंदरीत सर्व विचार केला तरी 10 ते 15 टक्के मर पिल्लांमध्ये निश्‍चितच धरावी लागते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या कोंबड्या बंदिस्त पद्धतीने पाळताना, त्यांना देण्यात येणारी जागा, खाद्य, पाणी अपुरे पडल्यास कोंबड्यांमध्ये मूलतः असलेल्या विकृतीला चालना मिळते. शेडमध्ये प्रखर प्रकाश किंवा कोंबड्यांची गर्दी जास्त असल्यास कोंबड्या एकमेकांची पिसे उपटतात. काही वेळा एकमेकांना घायाळही करतात. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी पिल्ले 10 ते 12 दिवसांची असताना एकदा व त्यानंतर एक ते दीड महिने वयाच्या कालावधीत चोची बोथट करणे आवश्‍यक आहे. असे केल्यास बोचण्याचे प्रमाण कमी होते. कोंबडी घरात वायुविजन चांगले असणे आवश्‍यक आहे. वाढीच्या कालावधीत प्रखर उजेड येणार नाही, खाद्याची भांडी बराच काळ रिकामी राहणार नाहीत याची काळजी घेऊन योग्य व्यवस्थापन असल्यास या विकृतीवर पूर्णपणे मात करता येते. या प्रमाणात कोंबड्या पाळताना गॅस ब्रुडरचा वापर करणे व्यापारी तत्त्वावर अधिक योग्य होईल. अधिक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
ः 02169 - 244214
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा

परसबागेतील भाजीपाल्याला चव न्यारी...

मी लातूर शहरात बारा वर्षांपूर्वी घर बांधले. घराच्या बाजूला शिल्लक जागेत लॉन व भाजीपाला लागवडीचे नियोजन केले. बागेच्या दोन कोपऱ्यांत सेंद्रिय खताचे खड्डे घेतले. घरातील चौघांना पुरतील अशा पद्धतीने भाजीपाला लागवडीचे नियोजन केले. घर बांधण्याच्या काळात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष होते. त्या वेळी घेतलेली कूपनलिका कोरडी निघाली. पुढच्या काळातील पाण्याच्या संकटाची ही नांदी होती. म्हणून छतावरील सर्व पाणी व उघड्या प्लॉटमधील जादाचे पाणी बोअर भोवती मुरविण्यासाठी पाच ु चार फुटांचा फिल्टर खड्डा पाणी मुरण्यासाठी तयार केला. त्या खड्ड्यामध्ये लहान- मोठे दगड, वाळू भरून फिल्टर चेंबर बनविला. अशा तऱ्हेने पहिल्या पावसात बोअरचे पुनर्भरण झाले. त्यामुळे आजपर्यंत कूपनलिकेचे पाणी कमी झाले नाही.

भाजीपाल्याचे नियोजन :
घरातील तांदूळ, डाळी, भाज्या, धुतलेले पाणी परसबागेतील भाज्यांना वापरतो. तसेच भांडी धुतलेले पाणी देखील झाडांना वापरले जाते. सध्या माझ्याकडे जूनपासून भेंडी, वांगी, गवार, फुलकोबी, पत्ताकोबी, नवलकोल, चवळी या भाज्या दर महिन्याला थोड्या थोड्या लावल्या जातात. कंपाउंडवर कारले, तोंडले, दोडके, हिरवा भोपळा लागवड केली जाते. परसबागेत थोड्या भागात पालकाची दर महिन्याला नवीन लागवड करतो. कांदा, मेथी बरोबरीने वाफ्यामधील मधल्या मोकळ्या जागेत कोथिंबीरही वर्षभर ताजी मिळते.

बागेत एक लिंबाचे आणि कढीपत्त्याचे झाड आहे. आवळा, अंजिराचे झाड लावले आहे. परसबागेत भाजीपाला लागवड करण्यासाठी हंगामानुसार कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये रोपे करून घेतो. रोपे योग्य कालावधीची झाल्यावर बागेतील वाफ्यात लावतो.

थोड्या सावलीच्या कोपऱ्यात आले, पुदिना, गवती चहा लागवड केली आहे. सांडपाण्याचा वापर अळूसाठी केला आहे. भाजीपाल्याच्या बरोबरीने निशिगंध, अबोली, मोगरा, सदाफुली, जास्वंद, शेवंती लागवड केली आहे. कुंड्यांत गुलाब व इतर फुलांची शोभेची झाडे लावली आहेत. कंपाउंडच्या कडेने तुळशीची रोपे, कोरफड, गुळवेल, अश्‍वगंधा लागवड केलेली आहे. टोमॅटो, मिरची, झेंडू, शेवगा, स्वीट कॉर्न, मका याचीही लागवड बागेत केली आहे. फुलझाडे, भाजीपाला आणि फळझाडांना मी रासायनिक खतांचा वापर करीत नाही.

हंगामी भाज्या काढल्यानंतर राहिलेली खोडे, पानांचे तुकडे करून सेंद्रिय खतनिर्मितीच्या खड्ड्यात टाकतो. तसेच शेणखत, खरकटे अन्न खड्ड्यातच जिरविले जाते. खड्ड्यामध्ये गांडुळे सोडली आहेत, त्यामुळे खत लवकर तयार होते. हे तयार झालेले सेंद्रिय खत दर दोन महिन्यांनी भाजीपाला, फळझाडांना देतो. भाजीपाल्यावर सहसा कुठली रोग-कीड पडत नाही. कीड, रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर लिंबोळी अर्क फवारतो. रोगग्रस्त पाने पुरून टाकतो. दररोज बागेत झाडाचे निरीक्षण असते. त्यामुळे कोणाच्या शेजारी कोणती कीड येते. कशावरचा रोग दुसऱ्यावर पसरतो हे कळते.

आनंददायी बाग...
आपल्याला पुरेल व एकानंतर दुसरी भाजी उपलब्ध होईल अशा पद्धतीने भाजीपाला लागवड केली जाते. त्यामुळे फार फार तर महिन्यात एखादी दुसरी भाजी आणावी लागते. शिल्लक भाजी राहिली तर शेजाऱ्यांना देतो. असा वर्षभर मिळणारा सेंद्रिय ताजा भाजीपाला हा चवदार व पौष्टिक तर आहेच, त्याचबरोबरीने आर्थिक बचतही होते. फावल्या वेळेत बागेची मशागतही होते. परसबागेमुळे घराचा परिसर सुंदर राहतो. लॉन भोवती फुलझाडे असल्याने मुलांना खेळायला जागा झाली आहे. बागेतील झाडावर चिमण्या, कावळे वेगवेगळ्या हंगामांतले पाहुणे पक्षी चिवचिवतात, झाडावर त्यांच्यासाठी मडक्‍यात पाणी ठेवतो, तसेच पक्ष्यांना खाण्यासाठी दाणेही ठेवतो. त्यामुळे वेगवेगळे पक्षी बागेत पाहायला मिळतात.

- रमेश चिल्ले, लातूर

शंका-समाधान

आम्हाला बागेच्या कडेने शोभेची झाडे लावायची आहेत, यासाठी कोणती झाडे निवडावीत? या झाडांची काय वैशिष्ट्ये आहेत?
तुषार पेटकर, धुळे
परदेशी शोभेच्या वनझाडांमध्ये प्रामुख्याने टॅबेबिया, कॅशिया, जॅकारंडा, कॉपर पॉड, गुलमोहर, पतंगी, पिचकारी, ब्ररदंडी, कैलासपती, काशीद, मलेशिया, चेंडूफळी, जंगली बदाम व कांचन इत्यादी लागवड केलेल्या आढळतात; परंतु या झाडांपेक्षाही सुंदर असलेली झाडे आपल्या जंगलांमध्ये आढळतात.

आपटा ः
हा मध्यम उंचीचा पर्णझडी वृक्ष असतो. याचे खोड वेडेवाकडे वाढलेले असते. खोडावर भरपूर फांद्या असून, त्या जमिनीच्या दिशेने झुकलेल्या असतात. पाने रुंद, पसरट, दोन खंडांत विभागलेली, सात ते नऊ मुख्य शिरायुक्त असतात. पानाच्या खालच्या भागावर लव असते. फांद्यांच्या शेंड्यात किंवा पानासमोर उन्हाळ्यात फुलांच्या मंजिऱ्या येतात. फुलांच्या पाकळ्यांचा रंग पांढरा असतो.

बहावा ः
मध्यम उंचीचा हा वृक्ष दहा मीटरपर्यंत वाढतो. पर्णझडी जंगलांत आढळणाऱ्या या वृक्षाची लागवड बियांपासून रोपे तयार करून करतात. लांबलचक मोठ्या पिवळ्या रंगांचे फुलांचे घोस व त्यानंतर येणाऱ्या दीड ते दोन फुटांच्या शेंगा यामुळे हा वृक्ष सर्वांना आकर्षून घेतो.


कांचन ः
मध्यम उंचीचा हा वृक्ष आहे. गुलाबी फुले व पानांचा आकार यामुळे सर्वांनाच मोहात टाकतो. या वृक्षाच्या पाकळ्या गुलाबी, पांढऱ्या व एक पाकळी थोडीशी तांबडी असते. कांचनचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो.

सोनचाफा ः
दिसण्यास अतिशय सुंदर असणारा हा मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष आहे. गुटी कलम पद्धतीच्या रोपांपासून किंवा बियांपासून रोपे करून लागवड केली जाते. सुंदर वासाची, शेंड्याला पिवळ्या रंगाची फुले या झाडाला येतात. देवळाच्या आवारात या झाडांची लागवड करतात.

बकुळ ः
सुमारे १० ते १५ मीटर उंच वाढणाऱ्या या सदाहरित वृक्षाची फुले माळा करण्यासाठी, सुगंधी द्रव्य काढण्यासाठी वापरतात. रस्त्याच्या दुतर्फा किंवा बागेत वृक्षाची लागवड केली जाते. चांगले गुणधर्म असलेल्या वृक्षांच्या बियांपासून रोपे तयार करून लागवड करावी. फुले उन्हाळ्यात येतात. फुले अतिशय सुवासिक असतात. लागवड ५ x ५ मी. अंतराने २ x २ x २ फुटांचे खड्डे घेऊन करावी. सुरवातीला हे झाड हळू हळू वाढते, त्यामुळे मोठी रोपे लावावीत.

नागचाफा ः
"नागचंपा', "नागकेशर' या प्रचलित नावांनी हा वृक्ष ओळखला जातो. हा वृक्ष उंच वाढणारा, सदाहरित असून, याची साल राखाडी, गुळगुळीत असते. पाने वैविध्यपूर्ण असतात. फुलांमध्ये मोठ्या चार पाकळ्या, गुच्छात पिवळ्या रंगाचे पुंकेसर असतात. या वृक्षास फुले उन्हाळ्यात येतात. बियाणे परिपक्व झाल्यानंतर ते लगेच पिशवीत टाकून रोपे करावीत. बियाणे जास्त काळ काढून ठेवल्यास उगवणक्षमता नाहीशी होते. रोपे तीन ते चार फूट उंचीची करून लागवड करावी.

सुरंगी ः
"सुरंग', "सुरंगी', "सुलतान चाफा' इत्यादी प्रचलित नावांनी या झाडाला ओळखले जाते. हा सदाहरित असणारा वृक्ष हळूहळू वाढतो, त्यामुळे रोपवाटिकेत याची रोपे मोठी करूनच लागवड करावी. पाने जाडसर, दोही कडा सरळ रेषेत, टोकाला टोकदार किंवा बोथट असतात. फुले पांढरी असून, ती खोडावर फेब्रुवारीपासून येण्यास सुरवात होते. परिपक्व बियाणे पेरून रोपे पिशवीत करावीत. लागवड ५ x ५ मी. अंतराने करावी.

कदंब ः
या झाडाची साल बदामी, रखरखीत असते. पाने समोरासमोर मोठी असतात. वासाची छोटी फुले चेंडूसारख्या आकारात एकवटलेली असतात. बियांपासून रोपे तयार करून लागवड ५ x ५ मी. किंवा ७ x ७ मी. अंतराने करतात.

कुंडीतील झाडांसाठी खत मिश्रण

झाडांच्या वाढीसाठीचे खत मिश्रण वजनाने अतिशय हलके असावे. नाही तर विनाकारण कुंडीचे वजन वाढते. मिश्रणामध्ये झाडांच्या मुळांना गारवा आणि खेळती हवा राहील असे पाहावे. कडक उन्हामध्ये कुंड्या तापतात, त्यामुळे मुळांना चटके बसतात, त्यासाठी कोकोपीट, विटांचे बारीक तुकडे, शेंड्यांची टरफले, नारळाच्या शेंड्या, बारीक वाळू, गांडूळ खत, कुजलेला पालापाचोळा, नीम पेंड आणि माती याचा वापर करावा.

प्रथम कुंडी भरताना ड्रेनेजेस होल बंद नाही ना याची खात्री करावी. त्यावर कौलाचा किंवा कुंडीचा दोन इंचाचा तुकडा ठेवावा. त्यानंतर विटांचा बारीक थर एक ते दीड इंचाचा द्यावा. त्यानंतर पोयटा माती तीन इंच भरावी. चांगली दाबून भरावी. त्यानंतर तयार केलेले मिश्रण (मिश्रणाचे प्रमाण ः 30 टक्के माती + 30 टक्के कोकोपीट + 20 टक्के गांडूळ खत + 20 टक्के कंपोस्ट खत, दोन मुठी निंबोळी पेंड आणि थोडीशी गरजेपुरती बारीक वाळू.) तीन इंच दाबून भरावे. त्यानंतर रोपटे मधोमध ठेवून हलकेच दाबावे.

रोपाच्या मुळाभोवतीचा मातीचा गोळा फुटणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर कुंडीच्या कडेने नारळाच्या शेंड्या रचून घ्याव्यात, हे करीत असताना मिश्रण हलकेहलके दाबून भरावे. साधारणपणे वरती दोन इंच जागा शिल्लक राहील असे पाहावे. एक इंचाचा बारीक वाळूचा थर द्यावा. वाळूमुळे कुंडीतील माती पाणी देताना, उडून बाहेर येत नाही. वरती एक इंचाची जागा कुंडीतील पाणी साठून राहण्यासाठी ठेवावी. कुंड्यांच्या आकारानुसार खत मिश्रण भरावे.

रोपटे लावल्यानंतर हलकेच पाणी घालावे, त्यामुळे मिश्रणातील मोकळी जागा बंद होते. ड्रेनेज होलमधून पाणी झिरपते आहे ना याची थांबून खात्री करावी. गच्चीवरील कुंड्या आठ ते नऊ तास कडक उन्हात राहात असल्याने मिश्रण लवकर सुकते, म्हणून सर्वसाधारणपणे संध्याकाळी कुंड्यांना पाणी घालावे, त्यामुळे रात्रभर कुंडीत चांगला गारवा राहतो.

घराच्या बागेत लॉन करायचे आहे, याबाबत माहिती द्यावी.

ज्या जागेवर लॉन तयार करायचे, ती जागा चारही बाजूंनी मोकळी हवा येईल, जिथे नेहमी सूर्यप्रकाश येत असेल अशी निवडावी. ज्या ठिकाणी लॉन लावायचा आहे ती जमीन उत्तम निचरा करणारी पाहिजे. ज्या जागेवर लॉन लावायचे आहे, तेथे पाण्याची भरपूर उपलब्धता असावी. लॉन लागवडीपूर्वी जमीन कुदळ-फावड्याने खोदून तीन-चार वेळा माती खालीवर करावी. नंतर सपाट करून त्यावर भरपूर प्रमाणात शेणखत मिसळावे. रानटी गवत, अनावश्‍यक असलेली झुडपे तोडून टाकावीत. जमीन तयार करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कीडनाशके मिसळावीत, तसेच लॉनच्या जलद वाढीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा मातीत मिसळावी. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी हरळी गवत लॉनसाठी वापरले जाते. गवताच्या पात्याच्या आकारानुसार विविध प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये ऍग्रिटीस टिनीअस, ऍग्रिटीस कॅनीना, फिस्टूला ओव्हीना, किस्टूला रूबरा, पोरीनिअल रे ग्रास, मेक्‍सिकन गवत हे प्रकार आहेत. लॉन लागवड पेरणी पद्धत, टोकण पद्धत, गादी पद्धतीने केली जाते. पेरणी पद्धतीमध्ये गवताचे बी लागवडीसाठी वापरतात. टोकण पद्धतीमध्ये टोकणाच्या साह्याने छिद्र पाडून 5 ु 5 सें.मी. अंतरावर गवताची लागवड मुळासकट करतात. गादी पद्धतीने लागवड करताना गवताची विशिष्ट आकाराच्या गादीची लागवड करण्यात येते.

लॉन जिथे लावायचे असेल त्या जागेवर खत व माती यांचे मिश्रण जमिनीवर समांतर पसरावे व नंतर निवडलेल्या गवताचे छोटे छोटे हिस्से (मुळासकट) ठराविक अंतराने जमिनीत दाबून टाकावे. जवळ जवळ गवत लावल्याने लॉन लवकर तयार होते. गवत लावल्यानंतर पाणी शिंपडणे आवश्‍यक आहे. लॉनला रोज सायंकाळी पाणी द्यावे. पावसाळ्याच्या सुरवातीला लॉनची लागवड केल्यास वाढ झपाट्याने होते. लॉन लावल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी त्यावरून रोलर फिरविला, तर गवताची मुळे सगळीकडे सारख्या प्रमाणात जमिनीत जातील व समप्रमाणात रुजतील. शिवाय लॉन सर्वत्र सारखे होण्यास मदत होईल. तयार झालेले लॉन मशिनच्या साह्याने कापायला हवे, गवत कापताना मशिन एका बाजूने सरळ राहील, तसेच मध्ये कोणतीही जागा सुटणार नाही याची काळजी घ्यावी. गवत कापून झाल्यावर लॉनची कडा सुटणार नाही, याची काळजी घ्यावी. गवत कापून झाल्यावर लॉनच्या कडा खुरप्याने कापून टाकाव्यात. लॉनला नियमित सकाळ-संध्याकाळ पाणी द्यावे. हिवाळ्यात एक दिवसाआड, तसेच पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे.सुंदर लॉन तयार करण्यासाठी लॉनला लागणाऱ्या खताकडे वेळोवेळी लक्ष देण्याची गरज असते. त्यासाठी गवत कापणीनंतर शेणखत व मातीचे मिश्रण पसरविणे फायदेशीर असते. हे मिश्रण फेब्रुवारी-मार्च महिन्यात गवताला दिले पाहिजे. बाजारात लॉनसाठी लागणारी खते उपलब्ध आहेत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांचा वापर करावा.